सातारा शहरातील अतिक्रमणांच्या विरोधात शिवसेना आक्रमक
इमारत बांधकामांमध्ये सेट बॅक का नाही ? सचिन मोहिते यांचा सवाल
सातारा शहरातील रस्त्यांवर नवीन इमारतीची बांधकामे सेटबॅक न सोडता झाली आहेत. शहराच्या पश्चिम भागात मंगळवार पेठेत काही बिल्डरांनी पालिकेच्या शहर विकास विभागाला हाताशी धरून वर्दळाचे रस्ते तीन मीटरनी गिळंकृत केले आहेत. ही बांधकामे तत्काळ हटवावीत अन्यथा शिवसेना तीव्र आंदोलन छेडेल, असा इशारा शहर संघटक प्रणव सावंत यांनी दिला.
सातारा : सातारा शहरातील रस्त्यांवर नवीन इमारतीची बांधकामे सेटबॅक न सोडता झाली आहेत. शहराच्या पश्चिम भागात मंगळवार पेठेत काही बिल्डरांनी पालिकेच्या शहर विकास विभागाला हाताशी धरून वर्दळाचे रस्ते तीन मीटरनी गिळंकृत केले आहेत. ही बांधकामे तत्काळ हटवावीत अन्यथा शिवसेना तीव्र आंदोलन छेडेल, असा इशारा शहर संघटक प्रणव सावंत यांनी दिला. जिल्हाप्रमुख सचिन मोहिते यांनी पालिकेला टाळे ठोकू, असा आक्रमक पवित्रा घेतला आहे.
ऑगस्ट २०२१ मध्ये शिवसेना साताराच्या वतीने ऐतिहासीक मंगळवार तळे, सोहनी गिरणी परिसर व डॉ.बोकील गोल मारुती मंदीर शेजारी केल्या गेलेल्या बांधकाम अतिक्रमणा विरोधात आंदोलन करुन नगरपालिकेला तक्रार अर्ज दिला होता. त्याबाबत नगरपालीकेने संबंधीत बांधकामाबाबत खुलासा मागविला होता व त्याचे स्पष्टीकरण अर्जदार अमोल गोसावी (उपशहर प्रमुख, शिवसेना) यांना दिले. परंतू वस्तुस्थिती पुर्णपणे लपविण्यात आली होती. त्यानंतर संपुर्ण वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी माहिती अधिकार अंतर्गत सदर तिन्ही बांधकामाची माहिती मागवली असता धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सोहनी गिरण येथिल ९ मीटर रस्ता अधिक दोन मीटर सेटबँक अंतर एकूण ११ मीटर जागा रस्त्याची अपेक्षित असतांना संपूर्ण रस्ताच ६ मीटर शिल्लक राहिला आहे. त्यामुळे ५ मीटर पेक्षा जास्त सरकारी हद्दीत अतिक्रमण केल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. तसेच ऐतिहासीक मंगळवार तळे येथे ४ मीटर रस्ता शिल्लक आहे. त्याचबरोबर गोल मारुती येथील बोकील डॉक्टर यांचे रस्त्यालगत ८ मीटर सलग अंतराचे बांधकाम असतांना अंतर्गत बांधकाम असे उत्तर दिले आहे. अशामुळे पदाधिकारी, अधिकारी आणि बांधकाम व्यावसायीक यांची असणारी भ्रष्ट युती दिसून येत आहे.
याबाबत प्रशासक असणारे मुख्याधिकारी यांनी त्वरीत निर्णय घेवून संबंधित अधिकारी यांना निलंबीत करुन अतिक्रमण काढले नाही तर येत्या काही दिवसात शिवसेनेच्या वतीने नगरपालिकेला टाळे ठोकण्याचा इशारा शिवसेनेच्या वतीने देण्यात आला.
आंदोलनाचे संयोजन शहर संघटक प्रणव सावंत यांनी केले. याप्रसंगी संजय पवार, ओंकार गोसावी, शब्बीर बागवान, सचिन सपकाळ, ब्रिजेश सावंत इ.शिवसैनिक उपस्थित होते.