आमदार जयकुमार गोरे यांचा फलटण शहरात असणार्या बाणगंगा नदीवरील पुलावरुन कार कोसळून अपघात झाला. या अपघातात त्यांच्यासह एक अंगरक्षक आणि दोन सहकारी गंभीर जखमी झाले. परंतु अशा परिस्थितीतही त्यांनी फोनद्वारे अपघाताची माहिती खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना दिली.
सातारा : माण- खटाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार जयकुमार गोरे यांचा फलटण शहरात असणार्या बाणगंगा नदीवरील पुलावरुन कार कोसळून अपघात झाला. या अपघातात त्यांच्यासह एक अंगरक्षक आणि दोन सहकारी गंभीर जखमी झाले. परंतु अशा परिस्थितीतही त्यांनी फोनद्वारे अपघाताची माहिती खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना दिली. यानंतर खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्यासह सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी तत्परता आणि समय सूचकता दाखवून आमदार गोरेंसह त्यांच्या सहकार्यांचे प्राण वाचवले.
नागपूर येथे सुरू असलेल्या अधिवेशनाचे काम संपवून आमदार गोरे काल दिनांक 23 रोजी पुणे येथे आले होते. काल रात्री उशिरा ते पुणे येथून दहिवडीकडे जाण्यासाठी मार्गस्थ झाले. शनिवार दि. 24 रोजी भल्या पहाटे म्हणजेच तीन वाजण्याच्या सुमारास त्यांची गाडी फलटण येथे आली असता, येथे असणार्या बाणगंगा नदी पुलावर चालकाला रस्त्याचा अंदाज न आल्याने गाडी तब्बल पन्नास फूट खोल नदीपात्रात कोसळली. चालक सोडून सर्वजण झोपेत असल्यामुळे नक्की काय झाले, याचे गाडीतील कोणालाच काही समजले नाही. गाडी अपघातग्रस्त झाल्यानंतर आमदार गोरे यांनी तत्काळ जखमी अवस्थेतही खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर, सातारा पोलीस अधीक्षक समीर शेख, फलटण येथील भाजपचे कार्यकर्ते सुशांत निंबाळकर तसेच कुटुंबीयांना तत्काळ अपघाताची माहिती दिली. यानंतर खासदार रणजितसिंह नाईक- निंबाळकर यांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे अपघातस्थळी धाव घेतली व घटनास्थळी उपस्थित असणार्यांसोबत बचाव कार्य सुरू केले. यानंतर सातारा पोलीस अधीक्षक समीर शेख यांनीही स्थानिक पोलीस अधिकार्यांना या अपघाताची माहिती देऊन घटनास्थळी पोहोचण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार फलटण येथील डीवायएसपी तानाजी बरडे यांच्यासह फलटण शहर व ग्रामीण विभागाचे पोलीस अधिकारी, कर्मचार्यांनी घटनास्थळी धाव घेतली. यानंतर नदीपात्रातून अपघातग्रस्तांना बाहेर काढून त्यांना फलटण येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले. प्रथमोपचार तसेच इतर वैद्यकीय उपचारानंतर आमदार गोरे यांना पुणे येथील रुबी हॉस्पिटलमध्ये अधिक उपचारासाठी दाखल करण्याचे आले. तर इतर तिघांना बारामती येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आमदार गोरे यांच्यासह इतर तिघांची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालयीन सूत्रांनी सांगितले आहे. आमदार गोरे यांचा ज्याठिकाणी अपघात झाला, ती जागा ’ब्लॅक स्पॉट’ म्हणून ओळखली जाते. या ठिकाणी काही वर्षांपासून नवीन पुलाचे काम सुरू आहे. परंतु ते काम काही पुढार्यांनी जाणीवपूर्वक अडकवून ठेवल्यामुळे ते अद्याप पूर्ण झाले नाही. त्यामुळेच या ठिकाणी सातत्याने छोटे-मोठे अपघात होत आहेत. या संदर्भात अनेक सामाजिक तसेच राजकीय संघटनांनी सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच सातारा जिल्हाधिकार्यांनाही पुलाचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे अशी मागणी केलेली आहे. असे असतानाही सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे कानाडोळा केला आहे. कदाचित निर्धारित वेळेमध्ये बाणगंगा नदीवरील पुलाचे काम पूर्ण झाले असते, तर आज हा अपघात घडला नसता, असे घटनास्थळी उपस्थित लोकांनी बोलून दाखवले आहे.
दरम्यान, इतर ठिकाणी अपघात झाल्यानंतर अपघातग्रस्तांना वेळोवेळी मदत न मिळाल्यामुळे जीवितहानी होण्याची शक्यता जास्त असते. त्यातल्या त्यात मध्यरात्री तसेच पहाटेच्या वेळी वाहतूक तसेच वर्दळ कमी असल्यामुळे मदतीचीही शक्यता कमीच असते. असे असताना आ. गोरे यांनी जखमी असतानाही धीरोदात्तपणा दाखवून खा. रणजितसिंह नाईक- निंबाळकर तसेच सातारा पोलीस अधीक्षक समीर शेख यांना फोन करून अपघाताची माहिती दिली. त्यामुळेच आमदार गोरे यांच्यासह त्यांच्या सहकार्यांना वेळेत वैद्यकीय उपचार मिळाले. अपघाताची माहिती मिळताच खा. नाईक-निंबाळकर यांच्यासह सातारा पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी तत्परता आणि समय सूचकता दाखवून आमदार गोरे यांस व त्यांच्या सहकार्यांना जीवनदान दिले. याबद्दल त्यांचे सातारा जिल्ह्यासह राज्यातील विविध मान्यवरांकडून कौतुक केले जात आहे.
खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर तसेच पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्याप्रमाणेच तत्परता आपणा सर्वांनीच दाखवली तर आपल्या अवतीभोवती होणार्या अपघातग्रस्तांनाही जीवनदान मिळणार आहे. खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर व एसपी समीर शेख यांनी या अपघाताच्या निमित्ताने एक नवीन आदर्श समाजापुढे घातलेला आहे.