maharashtra

दिल्लीश्वरांनी महाराष्ट्र सरकारला दिलेले गुंगीचे इंजेक्शन उतरायला तयार नाही

खासदार संजय राऊत यांची साताऱ्यामध्ये खरमरीत टीका

महाविकास आघाडीने काढलेल्या अतिविराट महामोर्चाला 'नॅनो मोर्चा' म्हणून हिणवणार्‍या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी सातारा येथे शेलक्या शब्दात वाभाडे काढले.

सातारा : महाविकास आघाडीने काढलेल्या अतिविराट महामोर्चाला 'नॅनो मोर्चा' म्हणून हिणवणार्‍या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी सातारा येथे शेलक्या शब्दात वाभाडे काढले. हा मोर्चा नॅनो होता की आणखी काय होता ते देशाने पाहिले. पण ज्यांना तो दिसला नाही, त्यांच्या डोळ्यांमध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या भाषेत सांगायचे तर, महाराष्ट्रद्वेषाचा वडस आलेला आहे. गेल्या ७० वर्षात ज्यांनी ज्यांनी महाराष्ट्रविरोधी भूमिका घेतली, ते कोणत्याही पक्षाचे असोत, ते राजकारणातून पाचोळ्यासारखे उडून गेले आहेत. देवेंद्रजी, स्वत:ची अवहेलना फार करून घेऊ नका, असे खडेबोल खासदार राऊत यांनी सुनावले. हे सरकारसुध्दा नॅनो बुध्दीचे आहे. ज्याप्रमाणे नॅनो गाडीचे प्रॉडक्शन बंद झाले, तसा यांचाही कारखाना बंद होणार आहे, असे चोख प्रत्त्युत्तर त्यांनी दिले.

संजय राऊत रविवारी एका खाजगी कार्यक्रमासाठी साताऱ्यात आले होते. त्यावेळी येथील शासकीय विश्रामगृहात त्यांनी पत्रकारांशी मनमोकळा संवाद साधला. यावेळी शिवसेना पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख नितीन बानुगडे - पाटील, जिल्हाप्रमुख सचिन मोहिते, माजी जिल्हाप्रमुख हणमंत चवरे, नरेंद्र पाटील, शहरप्रमुख बाळासाहेब शिंदे आदी उपस्थित होते.

देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अशा प्रकारच्या वक्तव्याची अपेक्षा नव्हती. अशा प्रकारचे वक्तव्य शिवसेनेतून फुटलेले ४० आमदार आणि त्यांच्या नेत्यांनी केले असते, तर समजू शकते. त्यांची बुध्दीही नॅनो आहे हे आम्हाला माहिती आहे. पण माजी मुख्यमंत्री व प्रदीर्घकाळ विरोधी पक्षात काम केलेले प्रगल्भ असे राजकारणी देवेंद्र फडणवीस यांना जर कालचा विराट मोर्चा दिसला नसेल, त्यांनी अनुभवला नसेल आणि तो मोर्चा नॅनो आहे, अपयशी आहे, फेल आहे अशी भूमिका जर त्यांनी घेतली असेल, तर मधल्या काळात मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री दिल्लीला गेले होते, तिकडे दिल्लीश्वरांनी त्यांना गुंगीचे इंजेक्शन दिलेले दिसते व त्यांची ती गुंगी उतरलेली दिसत नाही, अशी टीका खासदार राऊत यांनी यावेळी केली.

ते पुढे म्हणाले, खरे म्हणजे कालच्या मोर्चाचे स्वागत निदान देवेंद्र फडणवीस यांनी तरी करायला हवे होते आणि त्यांनी स्वत: मोर्चाला सामोरे जायला हवे होते. ही महाराष्ट्राची परंपरा आहे. कालचा मोर्चा सरकारविरोधी

नव्हे, तर महाराष्ट्राच्या दैवतांचा अपमान करणार्‍या प्रवृत्तींच्या विरोधात होता. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांचा अपमान करणार्‍या शक्ती या महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्र - कर्नाटक सीमाप्रश्नी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राचा अपमान केला. या सगळ््यांविरूध्द या मोर्चात महाराष्ट्रप्रेमी जनता एकवटली होती. तुम्ही त्यांच्या बाबतीत ज्या पध्दतीने भाषा वापरता आहात हे महाराष्ट्राचा राज्यकर्ता असल्याचे लक्षण नाही. इतका पराकोटीचा महाराष्ट्रद्वेष महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांमध्ये गेल्या ७० वर्षात आम्ही पाहिला नाही.

कालच्या मोर्चात शिवसैनिकांची संख्या लक्षणीय होती, याकडे पत्रकारांनी लक्ष वेधले असता, हा महाविकास आघाडीचा मोर्चा होता. त्यामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी, कम्युनिस्ट पक्ष, समाजवादी पार्टी, शेकाप अशा सर्वांचा

सहभाग होता. मुंबईवर शिवसेनेचा पगडा आहे. मुंबईमध्ये शिवसेनेच्या शाखांचे जे जाळे पसरलेले आहे. त्यामुळे आम्हाला मुंबई, ठाण्यातून लोकांना मोर्चासाठी आवाहन करणे सोपे असते. त्याप्रमाणे आघाडीतील अनेक पक्षांचा पगडा ग्रामीण भागात जास्त आहे. तिथूनसुध्दा लोक मोठ्या प्रमाणावर आले होते असे त्यांनी स्पष्ट केले.

तुम्ही शिवसेना फोडण्याचा, तोडण्याचा, चिन्ह - नाव गोठवण्याचा किती प्रयत्न केला, पण लोकांच्या मनात आणि मनगटात असलेली शिवसेना कशी काढणार ? ती काल तुम्हाला दिसली. हा द्वेष, ही जळजळ आणि मळमळ हे नॅनो बुध्दीचे लक्षण आहे. कालच्या मोर्चाचे पहिले टोक बोरिबंदरला होते आणि दुसरे टोक राणीच्या बागेपर्यंत पोहोचलेले होते. याला जर कोणी नॅनो मोर्चा म्हणत असतील, तर राजकारणात तुम्ही जितकी वर्षे काढली, ती वाया गेली.

विरोधकांच्या आंदोलनाचा सन्मान करणे ही लोकशाहीची पहिली पायरी आहे. या महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचे मोर्चे यापूर्वीसुध्दा निघाले. आणि आता अधिक प्रखरतेने निघतील. हा सरकारविरोधातील रोष आहे. तुम्ही लोकमताला अशाप्रकारे ठोकरून लावू शकत नाही, त्यांचा अवमान करू शकत नाही. तुमची अशी वृत्ती असल्यामुळेच शिवरायांचा अवमान करणार्‍या राज्यपालांचे तुम्ही आधी समर्थन करता हे आजपर्यंत दिसले, असे ते म्हणाले.

तोंडे न उघडण्याच्या अटीवर राज्यावर बसवले

हे सगळे गुंगाराम आहेत. महाराष्ट्राच्या स्वाभिमानाविषयी बोलायचे नाही, या अटीवर त्यांना राज्यावर आणले आहे. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांच्या अपमानाविषयी जनतेमध्ये कितीही उद्रेक असला तरी तुम्ही तोंडे उघडायची नाहीत, निषेध करायचा नाही या अटीशर्थीवर यांना राज्यावर बसवले आहे. म्हणून कालच्या मोर्चाची तुलना ते रत्नागिरीच्या सभेशी करत असतील, तर मी आनंद व्यक्त करतो की त्यांनी शिवसेना सोडली. महाराष्ट्राच्या स्वाभिमानासंबंधी अशी भूमिका घेणारे लोक आमच्या पक्षामध्ये कालपर्यंत होते हे आमचे दुर्दैव.

उदयनराजे यांनी लढत राहिले पाहिजे

छत्रपती उदयनराजे यांनी शिवरायांच्या अपमानासंदर्भात घेतलेल्या भूमिकेचे समर्थन सर्वात आधी शिवसेनेने केले होते. या प्रश्नावरती जेव्हा त्यांच्या डोळ्यातून अश्रू आले, तेव्हा त्यांचे अश्रू हे महाराष्ट्राचे अश्रू असल्याचे आपण शिवसेनेच्या वतीने सांगितले होते. कारण महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीला शिवरायांच्या अपमानाच्या प्रकारानंतर हुंदकाच फुटलेला आहे. याप्रश्नी सरकार काही करत नसेल, तर ते ज्या पक्षात आहेत, तो पक्षही

या अपमानावर मूकबधीर होऊन बसला असेल, तर तेही शेवटी माणूस आहेत. आम्हालाही वाईट वाटते. त्यांनी लढत राहिले पाहिजे, बोलत राहिले पाहिजे. ते परखड वक्तव्याबद्दल प्रसिध्द आहेत.

...हे तर हेलिकॉप्टर मुख्यमंत्री

राज्य सरकार फेब्रुवारी महिना बघू शकणार नाही, या वक्तव्याविषयी विचारले असता, ते म्हणाले, कारण हे नॅनो सरकार आहे. नॅनो गोष्टी फार काळ टिकत नाहीत. अशा फॅक्टर्‍या फार चालत नाहीत. उपमुख्यमंत्र्यांनी हा शब्द वापरून चूक केली आहे. जर ते म्हणत असतील हा नॅनो मोर्चा आहे, तर हे सरकारसुध्दा नॅनो बुध्दीचे आहे. ज्याप्रमाणे नॅनो गाडीचे प्रॉडक्शन बंद झाले, तसा यांचाही कारखाना बंद होणार आहे. जेव्हा मी सांगतो, तेव्हा त्यात तथ्य आहे. पडद्यामागे काय चालले आहे हे तुम्हाला माहिती नाही, असे सूतोवाच त्यांनी केले. मुख्यमंत्री सातारा जिल्ह्यातील आहेत, हो त्यांनी सातारा जिल्ह्यात स्वत:साठी दोन हेलिपॅड बांधल्याचे मी ऐकले आहे. त्यामुळे ते हेलिकॉप्टर मुख्यमंत्री आहेत असा टोला त्यांनी लगावला.

पवारांविषयी बोलणे शोभते का ?

मोर्चातील शरद पवार यांच्या भाषणाच्या अनुषंगाने भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेल्या वक्तव्याचाही खासदार संजय राऊत यांनी खरपूस समाचार घेतला. शरद पवारसाहेब हे टोलेजंग नेते आहेत. वर्षानुवर्षे महाराष्ट्राचे आणि देशाचे नेतृत्व ते करत आहेत. एका बाजुला मोदी त्यांना गुरू मानतात आणि त्यांच्यावर चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासारखे लोक बोलतात हे त्यांना शोभते का ? त्यांच्याकडे दुर्लक्ष करा. ही त्यांची तात्पुरती फडफड आहे.

जैसे थे परिस्थती ही मध्यस्थी नाही !

सीमाप्रश्नी अमित शहा यांनी मध्यस्थी केल्याचा डांगोरा पिटणार्‍यांची खासदार राऊत यांनी पिसे काढली. अमित शहा यांनी कुठे काय मध्यस्थी केली ? मध्यस्थी कशाला म्हणतात ? जैसे थे परिस्थती निर्माण करणे ही मध्यस्थी नाही. प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेल्यावर परिस्थिती जैसे थे च आहे. ती सर्वोच्च न्यायालयाची भूमिका आहे. त्यांना माहीत नसेल तर मी सांगतो. तुम्ही महाराष्ट्राला काय नॅनो बुध्दीचे समजलात ? हा ज्ञानदेवांचा महाराष्ट्र आहे, नॅनो बुध्दीचा नाही. ज्या शिवसेनेने सीमाप्रश्नासाठी ७० हुतात्मे दिले आहेत, त्यांना तुम्ही सांगता का 'जैसे थे'? जर परिस्थिती जैसे थे निर्माण करायची असेल, तर बेळगाव महापालिकेवरील कर्नाटक सरकारने उतरवलेला शिवरायांचा भगवा झेंडा परत लावा. मराठी लोकांवर मोठ्या प्रमाणात दाखल केलेले गुन्हे केले मागे घ्या. त्याला मी जैसे थे परिस्थिती म्हणेन. बेळगावचे दप्तर मराठी भाषेत व्हायला पाहिजे. कारण आमच्या वीस लाख लोकांना कानडी भाषा येत नाही. त्यांना सरकारी कागदपत्रे वाचता येत नाहीत. त्या शिकल्या सवरल्या लोकांना सरकारी कागदपत्रावर अंगठा लावावा लागतो. ही काय पध्दत आहे देशामध्ये? जर ते तुम्ही आधीप्रमाणे निर्माण केले तर ती जैसे थे परिस्थिती. तसे करताय का? सत्तर वर्षाचा प्रश्न आणि पंधरा मिनिटात बैठक संपवता कशी? संयुक्त महाराष्ट्र चळवळीत सर्व पक्ष एकवटले होते. त्यावेळी काँग्रेसच्या नेत्यांनीही पाठिंबा दिला होता. पण प्रथमच असे घडते की, महाराष्ट्र प्रेमी जनता एका बाजूला एकवटलेली असताना सरकार मात्र दुसऱ्या बाजूला गेल्याचे दिसत आहे. २०१८ च्या माझ्यावरच्या केसेस त्यांनी आता काढल्या आणि मला अटकेसाठी वॉरंट पाठवत आहेत. हे जैसे थे परिस्थितीचे लक्षण आहे का? अशी सरबत्तीच त्यांनी केली.

अडिच वर्षे सत्तेत असुनही हा प्रश्न सोडवला नाही अशी टीका होते, असे विचारले असता, अहो सत्तर वर्षे आम्ही लढत आहोत. ही लढाई आहे. २०१४ पासून तुम्ही सांगताय की पाकव्याप्त काश्मिर ताब्यात घेऊ. घेतलाच ? किती इंच जमीन ताब्यात घेतली ? तिथे चीन अरूणाचल प्रदेश ताब्यात घ्यायला निघाला आहे. त्याच्यावर बोला असे त्यांनी सुनावले.

राज्यपालांना केंद्राने मागे बोलावले नसले, तरी मोर्चाने त्यांना डिसमिस केले

हा मोर्चा नॅनो होता की आणखी काय होता ते देशाने पाहिले. माझे देवेंद्र फडणवीस यांना एवढेच सांगणे आहे, स्वत:ची अवहेलना फार करून घेऊ नका. आपले राजकीय भविष्य अजून खूप मोठे होणार आहे, होऊ शकते. आपल्याकडे ती क्षमता आहे. वास्तविक कालच्या मोर्चाचे तुम्ही कौतुक आणि स्वागतच करायला हवे होते. नंतर तुम्ही आमच्यावर टीका करा. पण काल जे लाखो लोक शिवरायांच्या, फुले - आंबेडकरांच्या जयजयकाराच्या घोषणा देत रस्त्यावर उतरले, त्याबाबत बोलणे म्हणजे तुम्ही एकप्रकारे हा सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न केला आहे. महाराष्ट्रातील जनतेला हे मान्य नाही. जरी केंद्राने राज्यपालांना मागे बोलवले नसले तरी कालच्या प्रचंड मोर्चाने राज्यपालांना डिसमिस केले आहे. हीच जनता उद्या या सरकारलाही डिस्मिस केल्याशिवाय राहणार नाही, असा जबरदस्त विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला.