maharashtra

दोन लाख रुपये गायब होवूनही पोलिसांत तक्रार नाही

जिल्हा बँकेच्या पोवईनाका शाखेतील प्रकार : महिला कॅशिअरकडून भरुन घेतली रक्कम

Despite the disappearance of Rs 2 lakh, no complaint has been lodged with the police
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही तशी नावाजलेली आणि अनेक पुरस्कार प्राप्त असलेली बँक आहे. मात्र, याच बँकेच्या पोवईनाका शाखेत गत आठवड्यात महिला कॅशिअरच्या केबीनमधून 2 लाख रुपये लंपास झाल्याचा प्रकार घडला आहे. त्यानंतर वास्तविक दोन लाख चोरीस गेल्याची वा अपहार झाल्याची तक्रार तरी देणे आवश्‍यक असताना शाखेच्या मॅनेजरने कॅशिअरकडून या रकमेची भरपाई करुन घेतल्याचा प्रकार घडला असून नोकरीच्या भीतीने त्या महिला कॅशिअरने देखील याची वाच्यता बाहेर केलेली नाही.

सातारा : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही तशी नावाजलेली आणि अनेक पुरस्कार प्राप्त असलेली बँक आहे. मात्र, याच बँकेच्या पोवईनाका शाखेत गत आठवड्यात महिला कॅशिअरच्या केबीनमधून 2 लाख रुपये लंपास झाल्याचा प्रकार घडला आहे. त्यानंतर वास्तविक दोन लाख चोरीस गेल्याची वा अपहार झाल्याची तक्रार तरी देणे आवश्‍यक असताना शाखेच्या मॅनेजरने कॅशिअरकडून या रकमेची भरपाई करुन घेतल्याचा प्रकार घडला असून नोकरीच्या भीतीने त्या महिला कॅशिअरने देखील याची वाच्यता बाहेर केलेली नाही. या प्रकारची चौकशी झाली तर सत्य समोर येईल, अशी माहिती एका नागरिकाने दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून सातत्याने आधुनिक तंत्रज्ञान वापरण्यात येत असल्याचे सांगण्यात येते. मात्र पोवईनाका शाखेत साधे सीसीटीव्ही बसवण्यात आलेले नाहीत. गत आठवड्यात शुक्रवारी पोवईनाका शाखेतील कामकाज नेहमीप्रमाणे सुरु होते. या शाखेत असलेली महिला कॅशिअरही काम करत होती. मात्र, काम संपण्याची वेळ झाली तेव्हा कॅशिअर महिलेची रक्कम टॅली झाली नाही. दोन लाख रुपयांचा घोळ समोर येत होता. ती कॅशिअर महिलाही तब्बल दोन लाख रुपयांचा घोळ समोर येत असल्याने घाबरुन, गोंधळून गेली.
आता काय करायचे ? असा प्रश्‍न समोर राहिला. तेव्हा मग पोवईनाका शाखेच्या मॅनेजरने मग रीतसर पोलिसात तक्रार देण्याची गरज होती. मात्र, त्याने जबाबदारी झटकली. कॅशिअर महिलेच्या केबिनमध्ये ये-जा करणाऱ्या शिपायांनी जबाबदारी झटकली. दोन हजारांचा दोन लाख रुपयांचा बंडल काही सापडला नाही. तो नेमका गायब झाला कसा ? महिला कॅशिअरने तर ते घेतले नव्हते. मग ते नेमके नेले कोणी ? अशा प्रश्‍नांचा गुंता निर्माण झाला तरी बँक मॅनेजरने कायदेशीर कृती न करता महिला कॅशिअरवरच ती दोषी नसताना तिच्यावर ठपका ठेवला आणि या पैशाची भरपाई महिला कॅशिअरकडून घेतल्याचे समोर येत आहे. वास्तविक दैनंदिन लाखो रुपयांचे व्यवहार बँकेत होत असल्याने सर्व यंत्रणा नेहमीच अलर्ट पाहिजे, सीसीटीव्ही तर आवश्‍यकच असतात. मात्र या शाखेत सीसीटीव्हीच नाहीत. त्यामुळे दोन लाख रुपये कसे गायब झाले हे गुढच राहिले.
पण याचा फटका महिला कॅशियरला बसला असून तिच्याकडून हे दोन लाख रुपये भरुन घेतल्याची माहिती समोर येत आहे. यापूर्वी देखील असे प्रकार घडलेले असून ते संगनमताने दडपले गेले आहेत. कर्मचारी दबावाखाली असल्याने तक्रारही होत नाही. मात्र, नुकत्याच घडून गेलेल्या प्रकारामध्ये महिला कॅशिअरवर अन्याय झाला असून यापूर्वीचेही काही प्रकार याची चौकशी होण्याची गरज व्यक्त होत असून चोर सोडून संन्याशाचा बळी घेणाऱ्या बँक व्यवस्थापनावर कारवाई करण्याची मागणी होत आहे.