maharashtra

विसापुर येथील जेष्ठ नागरीकांच्या दुहेरी खुनाचा गुन्हा उघड

स्थानिक गुन्हे शाखेची अप्रतिम कारवाई; पोलीस अधीक्षकांकडून बक्षिस जाहीर

Case of double murder of senior citizens in Visapur revealed
विसापुर येथे झालेल्या दुहेरी खुनाचा गुन्हा उघड करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. या गुन्ह्यातील दोघांना अटक करण्यात आली असून या गुन्ह्याचा यशस्वी तपास केल्याबद्दल जिल्हा पोलीस प्रमुख अजय बन्सल यांनी तपास पथकाला बक्षिसही जाहीर केले आहे.

सातारा : विसापुर येथे झालेल्या दुहेरी खुनाचा गुन्हा उघड करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. या गुन्ह्यातील दोघांना अटक करण्यात आली असून या गुन्ह्याचा यशस्वी तपास केल्याबद्दल जिल्हा पोलीस प्रमुख अजय बन्सल यांनी तपास पथकाला बक्षिसही जाहीर केले आहे.
या गुन्ह्यात सतीश शेवाळे (रा. शनिवार पेठ, सातारा) आणि सखाराम मदने (रा. पार्ले, ता. उत्तर कराड) यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, दि. 8 जुलै रोजी रात्रौ.19.00 ते दि. 9 जुलै दरम्यान पुसेगांव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विसापुर गांवातील हणमंत भाऊ निकम (वय 68) आणि कमल हणमंत निकम (वय 65) यांचा कोणीतरी अज्ञात आरोपीने अज्ञात कारणासाठी खून केला होता. याबाबत पुसेगांब पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
हा गुन्हा अतिशय संवेदनशील असल्याने या गुन्ह्याचा समांतर तपास करुन गुन्हा उघड करण्याबाबत पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल, अपर पोलीस अधीक्षक अजित बोर्‍हाडे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांना आदेश दिलेले होते. त्यानुसार या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेमार्फत सपोनि रमेश गर्जे, पोउनि अमित पाटील, पो.हवा. मंगेश महाडीक, पो.ना. अमोल माने, अजित कर्णे, शिवाजी भिसे यांचे पथक तयार करण्यात आलेले होते. हे पथक पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक व पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांच्या अधिपत्त्याखाली वेळोवेळी दिलेल्या सुचनाप्रमाणे गुन्हा घडल्यापासुन विसापुर - पुसेगांब येथे तळ ठोकून होते.
तसेच या गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास पथक तांत्रीक मुद्द्यांचे विश्‍लेषन देखील करीत होते. त्यामध्ये एका इसमाच्या हालचाली या संशयास्पद आढळुन आल्या म्हणुन स्थानिक गुन्हे शाखेच्या तपास पथकाने दिनांक 26 जुलै रोजी दुपारी गुन्ह्यातील संशयीतास गौरीशंकर कॉलेज जवळून ताब्यात घेवून त्याचीे विश्वासात घेवून विचारपुस केली असता त्याने संबंधित गुन्हा एका साथीदारासोबत केला असल्याबाबत सांगितले. त्यावरून कराड येथून एकास ताब्यात घेवून त्याच्याकडेही विचारपुस केली असता त्याने या गुन्हयात त्याचा सहभाग असल्याची कबुली दिली आहे.
पत्रकार परिषदेत जिल्हा पोलीस प्रमुख अजय बन्सल यांनी सांगितले, मृत कमल निकम यांना दागिने घालण्याची हौस होती. त्या नेहमीच दागिने घालूनच वावरत होत्या. या गुन्ह्यातील आरोपी सतीश शेवाळे याचे निकम यांच्याशी नात्याचे संबंध होते. शेवाळे याला काही कर्जे देणे होती. त्यामुळे मृत कमल निकम यांच्या दागिन्यांवर डोळा ठेवून शेवाळे याने या वृद्ध दाम्पत्याला संपविण्याचा घाट घातला. त्याने खुनाच्या रात्री आपला साथीदार सखाराम मदने याला बरोबर घेवून निकम यांचे घर गाठले. रात्री उशिरा सर्वांनी एकत्र जेवणही केले. यानंतर हणमंत भाऊ निकम यांना उशी तोंडावर दाबून एका खोलीत संपविण्यात आले. त्यानंतर दुसर्‍या खोलीत असणार्‍या कमल हणमंत निकम यांनाही त्याचप्रमाणे मारण्यात आले.
दोन्ही संशीयीत आरोपींकडे विचारपुस करून झाल्यानंतर त्यांना पुढील कार्यवाही करीता पुसेगांव पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आलेले आहे.
जेष्ठ नागरिकांचा दुहेरी खुनाचा हा अतिसंवेदनशिल व क्लिष्ट गुन्हा स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील व नेमलेल्या पथकाने अथक प्रयत्न करून आरोपीस व त्याच्या साथीदारास वेळीच ताब्यात घेवून गुन्हा उघडकीस आणल्याबद्दल पोलीस अधीक्षकअजय कुमार बंसल यांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले.
या गुन्ह्याच्या तपासामध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी सातारा ग्रामिण विभागाचे गणेश किंद्रे व सहायक पोलीस निरीक्षक संदीप शितोळे यांनी व त्यांच्या तपास पथकाने गुन्हा उघडकीस आणण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेतले आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल, अपर पोलीस अधीक्षक अजित बोर्‍हाडे यांच्या सूचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे, पोउनि अमित पाटील, पो.हवा. मंगेश महाडीक, साबीर मुल्ला, शरद बेबले, लक्ष्मण जगधने, प्रविण फडतरे, संतोष सपकाळ, पो.ना.अमोल माने, अजित कर्णे, शिवाजी भिसे, अमित सपकाळ, प्रविण कांबळे, स्वप्नील माने, गणेश कापरे, मुनिर मुल्ला, पो.कॉ.मयुर देशमुख, मोहसिन मोमीन, पृथ्वीराज जाधव, सचिन ससाने, रोहित निकम वैभव सावंत यांनी केलेली आहे. याचसोबत सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक एस.एस.शेळके, पो.कॉ.यशवंत घाडगे, सुशांत कदम यांनी गुन्ह्याच्या अनुषंगाने तांत्रीक माहिती वेळोवेळी तात्काळ पाठपुरावा करून तपास पथकास पुरविली आहे.
स्थानिक गुन्हे शाखेने या गुन्ह्याचा तपास करून जेष्ठ नागरीकांच्या दुहेरी खुनाचा अतिसंवेदनशिल गुन्हा उघडकीस आणल्याबद्दल कारवाईत सहभागी अधिकारी व अंमलदार यांचे पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल, अपर पोलीस अधीक्षक अजित बोर्‍हाडे यांनी अभिनंदन केलेले आहे. तसेच त्यांना बक्षिसही जाहीर केले.