प्राचीन काळापासून होळीचा सण हा लोकोत्सव म्हणून संपूर्ण भारतात साजरा होत असल्यामुळे त्या-त्या प्रांतात होळीला निरनिराळ्या नावाने ओळखतात. ही प्रथा शिवकाळापासून आहे, असे म्हटले जाते. असा हा प्राचीन काळापासून लोकोत्सव म्हणून मान्य पावलेला होळीचा सण शिवकाळात कसा साजरा होत होता. पाहूया सविस्तर..
प्राचीन काळापासून होळीचा सण हा लोकोत्सव म्हणून संपूर्ण भारतात साजरा होत असल्यामुळे त्या-त्या प्रांतात होळीला निरनिराळ्या नावाने ओळखतात. महाराष्ट्रात होळी, उत्तर प्रदेशात होरी, गोव्याला शिमगा. शालिवाहन शकाच्या मास गणनेप्रमाणे शेवटचा जो फाल्गुन महिना, त्या फाल्गुनोत्सव करावा असे भविष्यादी पुराणात कथन केले आहे. सामान्यत: शुक्ल नवमीपासून पौर्णिमेपर्यंत हा उत्सव सर्व लहानथोर मोठ्या उत्साहाने साजरा करतात. स्थानपरत्वे यास शिमगा, होलिकादहन, होळी, हुताशनी महोत्सव, उत्तरेत दोलायात्रा, तर दक्षिणेत कामदहन म्हणून होलिकोत्सव साजरा केला जातो.
हाराष्ट्रात शंकराच्या मंदिरासमोरील मोकळ्या जागेत १५ ते २० फुटाची होळी उभारली जाते. जंगम, गुरव वा ब्राह्मणाने गाव प्रमुखाच्या उपस्थितीत पूजाअर्चा केली की होळी पेटविली जाते. अर्वाच्च उच्चारण केले जाते. होळीसमोरील पटांगणात खेळे नाचतात, आट्यापाट्याचा डाव रंगतो. कोकणात काही ठिकाणी बाणाठीचे खेळ होतात. ही प्रथा शिवकाळापासून आहे, असे म्हटले जाते. असा हा प्राचीन काळापासून लोकोत्सव म्हणून मान्य पावलेला होळीचा सण शिवकाळात कसा साजरा होत होता. पाहूया सविस्तर...
शिवतीर्थ रायगडावरील होळीचा माळ
महाराष्ट्र संस्कृती, देव, देश आणि धर्म असा लयाला जात असताना शिवरायांच्या रूपाने महाराष्ट्राला तारणहार लाभला. रयतेला आपलासा वाटणारा राजा आणि राज्य नव्हे स्वराज्य. स्वराज्य व्हावे, हे तर श्रींच्या इच्छेनेच होणार आहे, असा विश्वास रयतेत निर्माण करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची राजधानी निर्माण केली ती अतिशय नियोजनपूर्वक.
असे म्हणतात की, त्याकाळी मंदिर ते बाजारपेठ या दरम्यान मोठे पटांगण केले गेले होते आणि त्याचे नाव ‘होळीचा माळ’ हे आहे. महाराष्ट्र संस्कृतीचे जीते-जागते प्रतीक. रायगडावरील शिर्काई माता ही प्रमुख देवता. तिच्या साक्षीने होळीच्या माळावर नवरात्र उत्सव, देवीची यात्रा शिवरायांनी सुरू केली. चैत्र पौर्णिमेचा उत्सव (वसंतोत्सव) आणि हुताशनी पौर्णिमा म्हणजे होळी पौर्णिमेचा उत्सव सुरू केला. आज या घटनेचा पूर्ण तपशील उपलब्ध नसला तरी राज्याभिषेक सोहळ्यावरून याची कल्पना यावी. शिवाजी महाराजांनी घालून दिलेला पायंडा पेशवाईच्या अखेरपर्यंत सुरू होता. हे त्यांनी केलेल्या रायगडावरील सण-उत्सवाच्या प्रत्येक वर्षीच्या जमा-खर्चाच्या नोंदीवरून लक्षात येते. यात हुताशनी पौर्णिमेच्या (होळीच्या) पूजेची दक्षिणा अर्ध्या रुपयाची दाखविली आहे. इ. स. १६७१ साली शिवाजी महाराजांनी रायगडावर शिमग्याचा सण साजरा केल्याची नोंद आहे. स्वराज्य कार्यात सतत लढाईच्या धामधुमीत मग्न असलेल्या शिवाजी महाराजांना मिळालेला हा दुर्मिळ क्षण म्हणजे दुग्धशर्करा योगच म्हणावयाचा.
तेव्हा होळीच्या माळावर खेळ्ये यायचे, सोंगे काढली जायची. हळगीच्या चढत्या सुरात दांडपट्टा, तलवारबाजी, बाणाठी, कुस्तीचे फड रंगायचे. समोर प्रत्यक्ष महाराज आहेत म्हटल्यावर हवसे, नवसे, गवसे सर्वच कलाबाजी दाखवत असतील. धर्म, संस्कृती आणि देश जागरणाचा होळीचा हा सण पंचमीपर्यंत मोठ्या उत्साहात होत असे.