फलटणला पासपोर्ट सेवा केंद्र सुरू करणार
केंद्रीय राज्यमंत्री देवुसिंह चौहान यांची ग्वाही; खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रयत्नांना यश
माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी फलटण येथे पासपोर्ट सेवा केंद्र सुरू व्हावे यासाठी वेळोवेळी मागणी केलेली आहे. त्यांच्या मागणीची दखल घेत आगामी काळामध्ये फलटणच्या पोस्ट ऑफिसमध्ये पासपोर्ट सेवा केंद्र सुरू करणार असल्याची ग्वाही केंद्रीय संचार राज्यमंत्री देवूसिंह चौहान यांनी दिली.
फलटण : माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी फलटण येथे पासपोर्ट सेवा केंद्र सुरू व्हावे यासाठी वेळोवेळी मागणी केलेली आहे. त्यांच्या मागणीची दखल घेत आगामी काळामध्ये फलटणच्या पोस्ट ऑफिसमध्ये पासपोर्ट सेवा केंद्र सुरू करणार असल्याची ग्वाही केंद्रीय संचार राज्यमंत्री देवूसिंह चौहान यांनी दिली.
शायनिंग महाराष्ट्र या महाप्रदर्शनाच्या समारोप समारंभामध्ये केंद्रीय राज्यमंत्री देवूसिंह चौहान बोलत होते. फलटणमध्ये ‘शायनिंग महाराष्ट्र’ चे भव्य प्रदर्शन माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी भरवले होते. यावेळी केंद्रीय दूरसंचार मंत्री देवूसिंह चौहान यांची प्रमुख उपस्थिती होती. या प्रदर्शनाच्या माध्यमातून केंद्र सरकारने सर्वसामान्यांसाठी राबविलेल्या शासकीय योजनांची माहिती सर्वसामान्यांना देण्यात आली.
प्रारंभी माजी खासदार लोकनेते स्व. हिंदुराव नाईक निंबाळकर यांच्या सिंहासनारूढ पुतळ्याचे अनावरण केंद्रीय राज्यमंत्री देवूसिंह चौहान यांच्या हस्ते करण्यात आले. माढा लोकसभा मतदार संघाच्या वतीने दमदार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व ॲड. सौ. जिजामाला नाईक निंबाळकर यांचा विशेष सत्कार केंद्रीय राज्यमंत्री देवूसिंह चौहान यांनी केला.
यावेळी माणचे आमदार व भारतीय जनता पार्टीचे नवनिर्वाचित सातारा जिल्हाध्यक्ष जयकुमार गोरे, माळशिरसचे आमदार राम सातपुते, फलटण तालुक्याचे ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे-पाटील, सातारा जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या ॲड. सौ. जिजामाला नाईक-निंबाळकर, सोलापूर भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख, स्वराज पतसंस्थेचे चेअरमन अभिजीत नाईक निंबाळकर, सातारा जिल्हा भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष जयकुमार शिंदे, फलटण तालुका भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष बजरंग गावडे, शहराध्यक्ष अमोल सस्ते, फलटण नगर परिषदेचे माजी नगरसेवक अनुप शहा यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी व केंद्र, राज्य सरकारच्या विविध खात्यांचे अधिकारी उपस्थित होते.
खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी देशांमधील आदर्श खासदारांमध्ये आपले एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना आदर्श खासदार म्हणूनच संपुर्ण देशामध्ये ओळखले जाते. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे माढा लोकसभा मतदार संघाच्या विकासासाठी कायम आग्रही असतात. रणजितसिंह हे खासदार म्हणून निवडून आल्यापासून ते कायमच जनतेच्या सेवेसाठी कार्यरत आहेत व आगामी काळामध्ये सुद्धा ते कार्यरत राहतील, अशी खात्री आम्हा सर्वांना आहे, असेही ना. देवूसिंह चौहान यांनी यावेळी स्पष्ट केले. कोरोना या वैश्विक महामारी मध्ये प्रतिबंधक लसीची निर्मिती करणे हे सोपे काम नव्हते. त्यातही आपल्या देशामध्ये लसीची निर्मिती करणे हे खूप मोठे काम होते. आमचे नेते व भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाची लस भारतामध्ये तयार व्हावी, यासाठी विशेष प्रयत्न केले व कोरोनाची लस म्हणजेच कोव्हीशिल्ड व कोव्हॅक्सीन या लसी भारतामध्ये तयार करण्यात आल्या. कोरोना या वैश्विक महामारी मध्ये देशामधील जनतेचे भुकेमुळे हाल होऊ नयेत, याचीही विशेष दक्षता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यावेळी घेतलेली होती, असेही ना. देवूसिंह चौहान यांनी यावेळी स्पष्ट केले.
केंद्र सरकारच्या विविध विभागांच्या विविध योजना ह्या सर्वसामान्य नागरिकांना कळाव्यात व त्याचा फायदा सर्वसामान्य नागरिकांना घेता यावा, यासाठी शाइनिंग महाराष्ट्र हे महा प्रदर्शन आयोजित केलेले आहे. माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केंद्र सरकारच्या विविध योजनांची माहिती फलटण तालुक्यासह सातारा व सोलापूर जिल्ह्यातील नागरिकांना कळावी यासाठी फलटण येथे सदरील प्रदर्शन आयोजित केलेले होते. या प्रदर्शनामध्ये कार्यरत असणाऱ्या सर्व पदाधिकाऱ्यांचे विशेष अभिनंदन करणे महत्त्वाचे आहे. सदरील महा प्रदर्शनामुळे केंद्रीय योजनांची माहिती सर्वसामान्य नागरिकांना कळलेली आहे व आगामी काळामध्ये सुद्धा अशाच विविध योजनांच्या द्वारे केंद्र सरकारची माहिती सर्वसामान्य नागरिकांना पोहोचवण्यात येईल, असेही केंद्रीय राज्यमंत्री ना. देवूसिंह चौहान यांनी यावेळी सांगितले.
शायनिंग महाराष्ट्र या महा प्रदर्शनाच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या विविध योजना तळागाळापर्यंत पोहोचविण्याचे काम स्वराज फाउंडेशन व खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या वतीने करण्यात आलेले आहे. त्यासोबतच भारतीय जनता पार्टीच्या सातारा जिल्हाध्यक्ष पदी आमदार जयकुमार गोरे यांची निवड झाल्याने सातारा जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकणार आहे. सातारा जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद, नगर परिषद किंवा विधानसभा लोकसभेवर सुद्धा भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकणार आहे, अशी खात्री सोलापूर जिल्ह्याचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष श्रीकांत देशमुख यांनी यावेळी व्यक्त केली.
केंद्र सरकारच्या विविध योजना या सर्वसामान्य नागरिकांना कळाव्यात व त्याचा फायदा सर्वसामान्य नागरिकांनी घ्यावा म्हणून शायनिंग महाराष्ट्र हे महा प्रदर्शन सातारा जिल्ह्यात विशेषतः फलटणमध्ये आयोजित केलेले आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वसामान्य जनतेला केंद्रबिंदू मानून विविध योजना सुरू केलेल्या आहेत. बऱ्याच योजना ह्या आमदार व खासदारांना सुद्धा माहित नसतात, त्यासाठीच हे प्रदर्शन आयोजित केलेले आहे. महाविकास आघाडीच्या सरकारने कोरोना काळामध्ये केंद्र सरकारच्या बाबत सर्वसामान्य नागरिकांच्या मनामध्ये गैरसमज पसरवण्याचे काम मोठ्या प्रमाणावर केले आहे, असे मत आमदार जयकुमार गोरे यांनी यावेळी व्यक्त केले. ते पुढे म्हणाले, जिहे कठापुर योजनेसाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंधरा मिनिटांमध्ये 700 कोटी निधीची तरतूद अर्थसंकल्पामध्ये केली आहे. अर्थसंकल्पाच्या आदल्या दिवशी त्यांना भेटल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी त्यांनी अर्थसंकल्पामध्ये 700 कोटी रुपयांची तरतूद ही जिहे कठापुर योजनेसाठी केली. एखाद्या योजनेसाठी एवढा निधी जर पंतप्रधान नरेंद्र मोदी देत असतील तर त्यांची कायमच भेट घ्यायला आवडेल. सातशे कोटी निधी म्हणजे नक्की सातशे वर किती शून्य हे रामराजेंना विचारा, असा टोलाही यावेळी आमदार जयकुमार गोरे यांनी लगावला.
यावेळी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर म्हणाले, फलटण तालुक्यासह माढा लोकसभा मतदार संघातील सर्वसामान्य नागरिकांची तहान भागवणे हे मी माझे परम कर्तव्य समजतो. फलटण तालुक्यामध्ये सुद्धा पाण्याला कमतरता आपण कधीही पडू दिली नाही. जरी सरकार बदलले असले तरीही आपण आपला कॅनॉल कधीही आटू देत नाही. माढा लोकसभा मतदार संघाचा सर्वांगीण विकास होण्यासाठी मी खासदार झाल्या पासून कार्यरत आहे. या सोबतच आगामी काळामध्ये मुंबईवरून हैदराबाद कडे जाणारी बुलेट ट्रेन फलटण व अकलुज मार्गे नेण्याचा माझा मानस असून त्यासाठी विशेष प्रयत्न सुरू आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली नक्कीच माढा लोकसभा मतदार संघाचा सर्वांगीण विकास होईल, यात कसलीही शंका नाही. सध्या राज्यामध्ये महाविकास आघाडीचे सरकार आहे. महाविकास आघाडीचे सरकार मला व भारतीय जनता पार्टीचे नवनिर्वाचित सातारा जिल्हाध्यक्ष व आमदार जयकुमार गोरे यांना अडचणीत आणण्यासाठी कायमच कार्यरत राहिलेले आहे. बारामतीचे पाणी माढा लोकसभा मतदार संघाकडे वळवल्याने महाविकास आघाडी सरकारमधील बडे नेतेही मला अडचणीत आणण्यासाठी प्रयत्नात असतात. परंतु खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हा काही कच्चा खेळाडू नसून तोही या सर्वांना पुरून उरणारा आहे; एवढेच या निमित्ताने सांगावेसे वाटते. आमचे मित्र व आमदार जयकुमार गोरे यांची भारतीय जनता पार्टीची सातारा जिल्हाध्यक्ष पदी निवड झाल्याने आगामी काळामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये ग्रामपंचायतीपासून ते विधानसभा असो किंवा लोकसभा असो या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचाच झेंडा फडकणार आहे. यामध्ये आता कसलीही शंका राहिलेली नाही. भारतीय जनता पार्टीला सातारा जिल्ह्यामध्ये दमदार असा जिल्हाध्यक्ष मिळाल्याने आगामी काळामध्ये भारतीय जनता पार्टी सातारा जिल्ह्यामध्ये सत्ता स्थापन करेल, यात कसलीही शंका नाही.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार व विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी वेळोवेळी अडचणीत आणण्याचे काम केलेले आहे. माढा लोकसभा मतदारसंघांमध्ये तर खासदार शरद पवार निवडून गेलेले होते. परंतु भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आपला टिकाव लागणार नाही हे कळल्यानंतर त्यांनीही माघार घेतली होती. त्यासोबतच विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी खेळलेल्या खेळांमध्ये कधीही हारलो नाही तर कोणत्याही आंडुपांडूच्या समोर सुद्धा आपण हरणार नाही, असे सूचक विधान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी यावेळी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार प्रा. सतीश जंगम यांनी केले. प्रास्ताविक जयकुमार शिंदे यांनी केले, तर आभार अनुप शहा यांनी मानले.