maharashtra

पोवाडे आणि कवितांनी आंदोलनाचा तिसरा दिवस दणाणला

संपकर्त्यांना जिल्हा प्रशासनाकडून नोटीस देण्याची तयारी

जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी वर्ग तीन आणि चारच्या कर्मचाऱ्यांनी केलेल्या संपाच्या तिसऱ्या दिवशी पोवाडे, कविता आणि व्याख्यानांनी राज्य शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न झाला. संपामध्ये 6 हजार 9994 कर्मचारी सहभागी झाले आहेत.

सातारा : जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी वर्ग तीन आणि चारच्या कर्मचाऱ्यांनी केलेल्या संपाच्या तिसऱ्या दिवशी पोवाडे, कविता आणि व्याख्यानांनी राज्य शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न झाला. संपामध्ये 6 हजार 9994 कर्मचारी सहभागी झाले आहेत. महसूल विभागातील 845 कर्मचाऱ्यांचा यामध्ये समावेश होता. जुनी पेन्शन योजना निर्णय टप्प्यात येईपर्यंत हा संप सुरूच राहणार असल्याचे आंदोलकांच्या सुकाणू समितीने स्पष्ट केले आहे.
जुनी पेन्शन योजना लागू करणे तसेच इतर काही प्रमुख मागण्यासाठी शासकीय वर्गातील वर्ग ३ व ४ कर्मचाऱ्यांचा राज्यव्यापी संप 14 मार्चपासून सुरू झाला आहे. गुरुवारी संपाचा तिसरा दिवस होता. तिसऱ्या दिवशी जिल्ह्याच्या विविध शासकीय कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी तिसऱ्या दिवशी सहभाग घेतला होता. विविध संघटनांचे सुमारे 2000 प्रतिनिधी पोवई नाक्यावर जमले. त्यांनी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तेथून सर्व आंदोलक कर्मचारी चालत जिल्हाधिकारी कार्यालयावर आले. मग तेथे पोवाडे, कविता, व्याख्याने यांचा सलग दोन तास सिलसिला सुरू होता.
पोलिसांनी बंदोबस्त ठेवल्याने वाहतुकीची कोंडी झाली नाही. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोरील अर्धा रस्ता आंदोलकांनी अडवून धरला आणि जुन्या पेन्शन योजनेसाठी जोरदार घोषणाबाजी केली. संपामध्ये महसुली विभागाचे 845 कर्मचारी आज आंदोलनात सहभागी झाले होते. सातारा नगरपालिकेचे केवळ 8 कर्मचारी या संपात सहभागी झाल्याचे स्पष्ट झाले. मात्र नगरपालिका संघटनेने मुख्यमंत्र्यांशी झालेल्या चर्चेनंतर या संपातून माघार घेतली असल्याचे समोर आले आहे. जिल्हा प्रशासनाने या संपाच्या विरोधात कारवाई करण्याचे सूत्र आरंभले असून नोटीसा काढण्याची तयारी सुरू झाली असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सूत्राने सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये 236 कर्मचाऱ्यांची आज उपस्थिती होती, तर 106 कर्मचारी प्रशिक्षणासाठी रवाना झाले होते. त्यामुळे काही विभागांच्या कामांची अडचण झाली. मात्र आस्थापना, बारनिशी, महसूल, संजय गांधी निराधार योजना, पुनर्वसन तसेच इतर सर्व शासकीय विभाग नेहमीप्रमाणे सुरू होते. जुनी पेन्शन योजना लागू होईपर्यंत हा लढा असाच सुरू राहणार असल्याचे संपकर्त्यांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.