maharashtra

सातारा पोलिसाच्या सतर्कतेमुळे वाचले 21 विद्यार्थ्यांचे प्राण

खावली गावानजिकची घटना : स्कूल बसने घेतला होता अचानक पेट

सातारा ते कोरेगाव रस्त्यावर खावली गावनजिक स्कूल बसने अचानक पेट घेतला होता. मात्र, ही बाब बसचालकाच्या लक्षातही आली नव्हती. तो विद्यार्थ्यांना घेवून गाडी चालवत निघालाच होता. सुदैवाने सातारा पोलीस दलातील एक कर्मचारी डयुटी संपवून दुचाकीवरुन घराकडे निघाले होते. त्यांना बसमधून धूर येत असल्याचे दिसल्यानंतर मग पोलीस कर्मचाऱ्याने स्कूल बसचालकाला बस थांबवण्यास सांगितले आणि क्षणाचाही विलंब न करता बसमधील विद्यार्थी शालेय साहित्यासह बाहेर काढले.

सातारा : सातारा ते कोरेगाव रस्त्यावर खावली गावनजिक स्कूल बसने अचानक पेट घेतला होता. मात्र, ही बाब बसचालकाच्या लक्षातही आली नव्हती. तो विद्यार्थ्यांना घेवून गाडी चालवत निघालाच होता. सुदैवाने सातारा पोलीस दलातील एक कर्मचारी डयुटी संपवून दुचाकीवरुन घराकडे निघाले होते. त्यांना बसमधून धूर येत असल्याचे दिसल्यानंतर मग पोलीस कर्मचाऱ्याने स्कूल बसचालकाला बस थांबवण्यास सांगितले आणि क्षणाचाही विलंब न करता बसमधील विद्यार्थी शालेय साहित्यासह बाहेर काढले. त्यामुळे 21 विद्यार्थ्यांसह चालकाचे प्राण वाचले असून पोलीस कर्मचाऱ्याच्या सतर्कतेचे अभिनंदन होत आहे. त्या कर्मचाऱ्याचे नाव कळू शकले नाही.
शनिवारी सकाळी ही घटना घडली. एका खासगी शाळेतील विद्यार्थ्यांना घेवून स्कूल बस कोरेगावच्या दिशेने निघाली होती. त्यावेळी ही बस खावलीनजिक जात असताना त्यातून धूर निघत होता. ही बाब बसचालकाला समजली नव्हती. मात्र, डयुटी संपवून सातारा पोलीस दलातील एक कर्मचारी त्यांच्या गावी निघाला होता. त्यांना बसमधून धूर येत असल्याचे दिसताच दुचाकी जोरात दामटून त्यांनी स्कूल बसचालकाला बस थांबवण्यास सांगितले. बसमध्ये अचानक शॉर्टसर्किट झाल्यामुळे बसने खालील बाजूने पेट घेतला होता.
बस थांबवल्यावर पोलीस कर्मचारी व बस चालकाने तातडीने गाडीतील 21 विद्यार्थ्यांना शालेय साहित्यासह सुखरुप बाहेर काढले. तोपर्यंत परिसरातील ग्रामस्थही घटनास्थळी जमा झाले होते. पोलीस कर्मचाऱ्याने ग्रामस्थांच्या मदतीने पेटलेली बस विझवण्यासाठी प्रयत्न केले. त्यानंतर काही वेळात बसला लागलेली आग विझवण्यात यश आले. या घटनेते स्कूल बसचे नुकसान झाले आहे. मात्र, पोलीस कर्मचाऱ्याच्या सतर्कतेमुळे पुढील अनर्थ टळला. पोलीस कर्मचाऱ्याने दाखवलेल्या या प्रसंगावधनाचे उपस्थित ग्रामस्थ, नागरिकांनी अभिनंदन केले. तर बसचालकासह विद्यार्थ्यांनीही संकटातून वाचल्याने पोलीस कर्मचाऱ्याकडे कृतज्ञता व्यक्त करत आभार मानले.