maharashtra

संघटनात्मक बांधणीची जिल्ह्यात शिवसेनेची रणनीती

नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्याकडून राजकीय आढावा

आगामी स्थानिक स्वराज्य संस्था व जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका डोळ्यासमोर ठेवून तसेच लोकसभा विधानसभा निवडणुकां लक्षात घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने संघटनात्मक बांधणीचे डावपेच सुरू केले आहेत.

सातारा : आगामी स्थानिक स्वराज्य संस्था व जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका डोळ्यासमोर ठेवून तसेच लोकसभा विधानसभा निवडणुकां लक्षात घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने संघटनात्मक बांधणीचे डावपेच सुरू केले आहेत. त्या तयारीचा एक भाग म्हणून राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष व सातारा सांगली जिल्हा संपर्कप्रमुख राजेश क्षीरसागर यांनी साताऱ्यात येऊन संघटनात्मक बांधणीचा आढावा घेतला. या आढाव्यात त्यांनी जिल्हा संघटक जयवंत शेलार, चंद्रकांत जाधव व पुरुषोत्तम जाधव यांच्याशी चर्चा करून शिवसैनिकांच्या अडीअडचणी समजावून घेतल्या.
त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते म्हणाले, मुख्यमंत्री शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर शिवसेनेचे बांधणीचे काम हाती घेण्यात आले आहे. माझ्याकडे सातारा लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली असून जिल्ह्याची शिवसेनेची भक्कम बांधणी आहे. हिंदुराव नाईक निंबाळकर हे शिवसेनेचे पहिले खासदार झाले होते. त्याच्यानंतर आता शंभूराजे व महेश शिंदे हे दोन आमदार जिल्ह्यात चांगल्या पद्धतीने काम करत आहेत. त्यामुळे संघटना बांधणी चांगल्या पद्धतीची होत असून सध्या व जिल्ह्याच्या आगामी राजकारणात शिवसेनेकडे चांगले इनकमिंग आहे. आगामी काळात देशाला महासत्ता बनवणे हे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे स्वप्न असून त्यासाठी त्यांनी निती आयोगाची स्थापना केली आहे. देशाची अर्थव्यवस्था 2024 पर्यंत एक लाख ट्रिलियन डॉलर करण्याचे ध्येय त्यांनी ठेवले आहे. सध्या जनता शिवसेनेच्या पाठीशी असून आगामी काळात शिवसेना व भाजप एकत्र काम करणार आहे. लोकसभेला उमेदवारी कोणाला द्यायची, हे मुख्यमंत्री- उपमुख्यमंत्री ठरवतील. माझे काम संघटना बांधण्याचे असून उमेदवार ठरवण्याचे नाही, असे सांगत त्यांनी देसाईंना उमेदवारी दिली जाणार का? या प्रश्नावर बोलणे टाळले.
जिल्हा नियोजन समितीचा शंभर कोटीचा निधी अखर्चिक असून पुढील पंधरा दिवसांमध्ये तो 100 टक्के कसा खर्च होईल यासाठी प्रयत्नरत राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आगामी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, असे भाजपचे जिल्हाध्यक्ष जयकुमार गोरे यांनी वक्तव्य केले आहे याबाबत त्यांना विचारले असतात ते म्हणाले, सध्या तरी एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री असून आगामी मुख्यमंत्री म्हणून आम्ही त्यांनाच पाहत आहोत. पुढचे पुढे पाहू. याबाबत भाजपकडून कोणताही दगाफटका होणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. शिवसेनेचे कुटुंब मोठे आहे. त्यामुळे पूर्वीचे संपर्कप्रमुख यांना एकत्र आणून त्यांना ताकद देण्याचे काम मी करणार असल्याचे क्षीरसागर यांनी सांगितले. आगामी काळात नितीन बानुगडे यांना शिवसेनेत घेतले जाणार का, या प्रश्नावर राजेश क्षीरसागर म्हणाले, व्याख्याने देऊन पक्ष वाढत नाही. जिल्ह्याला बानुगडे यांच्या व्याख्यानाची गरज नाही. कारण आज आमच्याकडे अनेक शिलेदार आहेत, असेही त्यांनी सांगितले.