डिस्कळ, ता. खटाव येथील सुकन्या रुपाली दशरथ कर्णे हिने युपीएससी तर्फे घेण्यात आलेल्या भारतीय सांख्यिकी सेवा (आयएसएस) परीक्षेत देशात पाचवा क्रमांक तर महाराष्ट्रात प्रथम येण्याचा बहुमान मिळविला आहे. अत्यंत हालाखिची परिस्थिती असलेल्या व माध्यमिक शाळेतील शिपायाच्या या सुकन्येने हे अभूतपूर्व यश मिळवून ग्रामिण भागातील विद्यार्थ्यांपूढे आदर्श निर्माण केला आहे. रुपालीच्या या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.
पुसेगाव : डिस्कळ, ता. खटाव येथील सुकन्या रुपाली दशरथ कर्णे हिने युपीएससी तर्फे घेण्यात आलेल्या भारतीय सांख्यिकी सेवा (आयएसएस) परीक्षेत देशात पाचवा क्रमांक तर महाराष्ट्रात प्रथम येण्याचा बहुमान मिळविला आहे. अत्यंत हालाखिची परिस्थिती असलेल्या व माध्यमिक शाळेतील शिपायाच्या या सुकन्येने हे अभूतपूर्व यश मिळवून ग्रामिण भागातील विद्यार्थ्यांपूढे आदर्श निर्माण केला आहे. रुपालीच्या या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.
गावापासून केवळ आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या बुध येथील डॉ. पांडूरंग वासुदेव उर्फ पां. वा. सुखात्मे यांचा आदर्श घेऊन रुपालीने संख्याशास्त्रातील पदविका मिळविली. रुपालीचे वडील दशरथ कर्णे हे मुरगुड, ता. कागल येथील शिवराज विद्यालयात शिपाई म्हणून कार्यरत आहेत. तर आई वंदना गृहीणी आहेत. त्यांना दीपाली व रुपाली या दोन जुळ्या मुली आहेत. रुपालीचे प्राथमिक शिक्षण डिस्कळ येथे, बारावीपर्यंतचे शिक्षण मुरगुड येथे तर पदवीपर्यंतचे शिक्षण सातारा येथील यशवंतराव चव्हाण ज्युनिअर कॉलेजमध्ये झाले. या दोघी बहिणींनी एमएस्सी (संख्याशास्त्र) पर्यंत पद्युत्तर शिक्षण शिवाजी विद्यापीठातून पूर्ण केल्यावर दोघींनी स्पर्धा परिक्षांची तयारी सुरु केली.
भारतीय सांख्यिकी सेवा परीक्षेचे स्वरुप समजावून घेऊन दोघींनी अत्यंत नियोजनबध्दपणे दैनंदिन अभ्यासाचे वेळापत्रक तयार केले व त्यानुसार जून 2020 पासून अभ्यासाला सुरुवात केली. धाकटी बहिण दीपालीबरोबर ग्रुप स्टडी करुन दररोज अभ्यासाबरोबर या परीक्षेच्या प्रश्नपत्रिका सोडविण्याचा सराव केला. दीपालीने रुपालीच्या नियमितपणे मॉक इंटरव्ह्यू घेतल्यामुळे रुपालीला या परीक्षेचा आत्मविश्वास आला. त्यामुळेच आपल्या या यशाचे श्रेय दीपाली, आई, वडील व भाऊ योगेशचे असल्याचे रुपालीने सांगितले.
वृत्तपत्रांचे वाचन व दुरदर्शनवरील बातम्या पाहून ताज्या घडामोडींचे ज्ञानही पक्के झाले. एकंदरीत या परीक्षेसाठी कोणताही क्लास न लावता रुपालीने या परीक्षेला आत्मविश्वासाने सामोरे जाऊन घवघवीत यश मिळवले. कोरोनामुळे या परीक्षेच्या तयारीसाठी लागणारी पुस्तके मिळणे शक्य झाले नाही. परंतू, यामुळे नाऊमेद न होता, मोबाईलद्वारे इंटरनेटच्या माध्यमातून या परिक्षेसाठी पीडीएफ फाईल्स उपलब्ध केल्या. त्याद्वारे स्वतःच्या नोटस काढून रुपालीने दररोज दहा-बारा तास अभ्यास करुन या परीक्षेत अलौकिक यश प्राप्त केले. धाकटी बहीण दीपाली ही सुध्दा भारतीय सांख्यिकी परीक्षेची तयारी करत असून भाऊ योगेश हा एका महाविद्यालायत तासिका तत्वावर प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे. पावसाच्या लहरीपणामुळे शेतातून फारसे उत्पन्न मिळत नाही. त्यामुळे खटाव, माण या दुष्काळी तालुक्यातील जास्तीत जास्त विद्यार्थी स्पर्धापरीक्षांद्वारे आपली गुणवत्ता सिध्द करुन उच्चपदांवर कार्यरत आहेत. रुपालीनेही तोच कित्ता गिरवत मिळवलेले हे अभूतपूर्व यश अन्य विद्यार्थ्यांना प्रेरणादायी आहे.