फलटणमध्ये लवकरच सुरु होणार जिल्ह्यातील दुसरे पासपोर्ट ऑफिस
केंद्रीय संचार मंत्र्यांची तत्वतः मान्यता : खासदार रणजितसिंह नार्इक-निंबाळकरांचा पाठपुरावा
पासपोर्ट काढण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून पुण्याला हेलपाटे मारण्याची सुरु असलेली पध्दत साताऱ्यातील मुख्य पोस्ट कार्यालयात पासपोर्ट कार्यालय सुरु झाल्याने बंद झाली. सातारा जिल्ह्यातील सर्वांना साताऱ्यात पासपोर्ट उपलब्ध होवू लागले. मात्र, इतर तालुक्यातून सातारला येणे देखील अनेकवेळा गैरसोयीचे ठरत असते.
सातारा : पासपोर्ट काढण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून पुण्याला हेलपाटे मारण्याची सुरु असलेली पध्दत साताऱ्यातील मुख्य पोस्ट कार्यालयात पासपोर्ट कार्यालय सुरु झाल्याने बंद झाली. सातारा जिल्ह्यातील सर्वांना साताऱ्यात पासपोर्ट उपलब्ध होवू लागले. मात्र, इतर तालुक्यातून सातारला येणे देखील अनेकवेळा गैरसोयीचे ठरत असते. या विचारातून माढा लोकसभा मतदार संघाचे खासदार रणाजितसिंह नार्इक-निंबाळकर यांनी खंडाळा, फलटण, माण तालुक्यांना मध्यवर्ती व सोयीचे ठिकाण म्हणून फलटणमध्ये पासपोर्ट कार्यालय सुरु करण्यासाठी पाठपुरावा केल्यानंतर लवकरच फलटणमध्ये जिल्ह्यातील दुसरे पासपोर्ट कार्यालय सुरु होणार असल्याने तिन्ही तालुक्यातील जनतेने खासदार रणाजितसिंह नार्इक-निंबाळकर यांचे अभिनंदन केले आहे.
फलटण येथे पासपोर्ट कार्यालय सुरु करावे यासाठी नुकतीच खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केंदीय संचार राज्यमंत्री ना. देवुसिंह चौहान यांची दिल्ली येथील त्यांच्या कार्यालयात भेट घेतली. यावेळी त्यांच्या समवेत आमदार राहूल कुल उपस्थित होते. यावेळी खासदार निंबाळकर यांनी माढा लोकसभा मधल्या मतदार संघाच्या सोयीसाठी फलटण तालुक्यामध्ये पासपोर्ट काढण्याचे केंद्र सुरु करण्याचे निवेदन दिले.
माढा मतदारसंघातील तालुक्यांतील नागरिकांनाही पूर्वी पासपोर्ट काढण्यासाठी पुण्याला जावे लागत होते. त्यानंतर वर्षभरापूर्वी साताऱ्यात जिल्ह्याचे ठिकाण म्हणून मुख्य पोस्ट कार्यालयात पासपोर्ट कार्यालय सुरु करण्यात आले. मात्र, तरी देखील खंडाळा, फलटण, माण तालुक्यातील नागरिकांना पासपोर्ट काढण्यासाठी 60 ते 80 कि. मी. अंतर पार करुन साताऱ्यातील पासपोर्ट कार्यालयात यावे लागत आहे. नागरिकांची ही अडचण दूर व्हावी यासाठी खासदार रणजितसिंह नार्इक निंबाळकर यांनी केंद्रीय संचार मंत्री सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असताना याबाबत चर्चा केली होती. ना. चौहान यांनी याबाबत सहकार्य करण्याचे तसे आश्वासन दिले होते.
त्यावर खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी दिल्ली येथे ना. देवूसिंह चौहान यांच्या कार्यालयात त्यांची भेट घेतली व फलटण येथे पासपोर्ट कार्यालय सुरु करण्याच्या मागणीचे निवेदन दिले. यावेळी ना. चौहान यांनी फलटणच्या पासपोर्ट कार्यालयास तत्वत: मान्यता दिली. त्यामुळे फलटण येथे पासपोर्ट कार्यालय सुरु करण्याचा मार्ग मोकळा झाला असून लवकरच फलटण येथे जिल्ह्यातील दुसरे पासपोर्ट कार्यालय सुरु होणार असल्याची माहिती खासदार रणजितसिंह नार्इक निंबाळकर यांनी दिली.
खासदार रणजितसिंह निंबाळकर यांचे अभिनंदन
फलटण येथे पासपोर्ट कार्यालय सुरु करण्यासाठी पाठपुरावा केल्याने फलटण तालुक्यानजिक असलेल्या खंडाळा, माण तसेच खटाव तालुक्यातील नागरिकांना पासपोर्ट काढण्यासाठी आता फलटणला जाण्यासाठी जवळचे अंतर कापावे लागणार आहे. माढा मतदार संघात असलेल्या या तालुक्यातील जनतेच्या सोयीसाठी खासदार रणजितसिंह नार्इक निंबाळकर यांनी विविध विकासकामे करतानाच पासपोर्ट कार्यालय सुरु करुन नागरिकांचा आणखी एक प्रश्न मार्गी लावल्याने जनतेतमधून खासदार रणजितसिंह नार्इक निंबाळकर यांचे अभिनंदन होत आहे.