केर, ता. पाटण येथील विवाहितेचा प्रसूतीनंतर वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू झाला. या संतापजनक घटनेने पाटण तालुक्यातील आरोग्य सेवेचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. दरम्यान, या हलगर्जीपणा जबाबदार असेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
पाटण : केर, ता. पाटण येथील विवाहितेचा प्रसूतीनंतर वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू झाला. या संतापजनक घटनेने पाटण तालुक्यातील आरोग्य सेवेचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. दरम्यान, या हलगर्जीपणा जबाबदार असेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
सौ. रेश्मा जितेंद्र यादव (वय 25) रा. केर ता. पाटण या या घटनेत मृत झालेल्या विवाहितेचे नाव आहे.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, केर येथील विवाहिता सौ. रेश्मा यादव या गरोदर होत्या. प्रसूतीच्या वेदना चालू झाल्यानंतर त्यांना पाटण येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सायंकाळी ५ वाजेपर्यंत तुम्ही रुग्णालयात आला तरच पुढील उपचार करण्यात येतील, असे त्यांच्या नातेवाईकांना सांगितले. त्यानंतर संबंधित विवाहितेला त्यांनी उपचारासाठी मल्हारपेठ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. याठिकाणी संबंधित विवाहितेची नैसर्गिक प्रसूती होऊन तिने मुलाला जन्म दिला. मात्र, जास्त प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना कराडला जाण्याचा सल्ला दिला. त्यानुसार त्या विवाहितेला कराड येथे कृष्णा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी संबंधित विवाहितेला मृत घोषित केले.
दरम्यान, या घटनेने पाटण तालुक्यातील आरोग्य सेवेतील त्रुटी समोर आल्या असून विवाहितेच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.