maharashtra

कृषी साहित्य विक्री दुकानांचे साताऱ्यात बंद आंदोलन

राज्य शासनाच्या कृषी निविष्ठा कायद्याचा केला निषेध, कृषी डिलर असोसिएशनचा निर्णय

निविष्ठा उत्पादन, विक्री व पुरवठा या बाबत सध्याच्या कायद्यांमधील तरतुदी पुरेशा नसल्याचे सांगत राज्य सरकारने नवे कायदे करण्याची प्रक्रिया चालू केली आहे.

सातारा : महाराष्ट्र राज्य सरकारकडून कृषी निविष्ठाबाबत नवीन कायदे आणले जात आहेत. त्या कायद्यांना राज्यातील कृषी विक्रेते यांचा  तीव्र विरोध होत असल्याने कृषी खात्यासमोर पेच तयार झाला आहे. सरकारच्या या धोरणा विरुद्ध कृषी निविष्ठा विक्री दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय सातारा जिल्हा रासायनिक खते, बियाणे, कीटकनाशके डीलर असोसिएशनतर्फे घेण्यात आला आहे .दरम्यान ऐन रब्बी हंगामाच्या तोंडावर दुकान बंद ठेवण्यात येणार असल्यामुळे शेतकरी बांधवांची अडचण होणार आहे.
निविष्ठा उत्पादन, विक्री व पुरवठा या बाबत सध्याच्या कायद्यांमधील तरतुदी पुरेशा नसल्याचे सांगत राज्य सरकारने नवे कायदे करण्याची प्रक्रिया चालू केली आहे. त्यासंदर्भात तयार करण्यात आलेली विधयके क्रमांक ४०, ४१, ४२, ४३ व ४४ अद्याप मंजूर झालेले नाहीत.या प्रस्तावित पाचही कायद्यांना रद्द करण्याच्या मागणीसाठी येत्या २, ३ व ४ नोव्हेंबरला राज्यातील सर्व कृषी निविष्ठा विक्रीची दुकाने बंद ठेवण्याचे महाराष्ट्र फर्टिलायझर्स पेस्टिसाइड्‍स सीड्‍स डीलर्स असोसिएशनने (माफदा) घोषित केले आहे. याची माहिती संघटनेच्या वतीने साताऱ्यात देण्यात आली

राज्यातील कृषी विक्रेते हे कोणत्याही प्रकारच्या कृषी निविष्ठांचे उत्पादन करीत नाहीत. कृषी विभागाच्या मान्यता प्राप्त कंपनीच्या कृषी निविष्ठा ह्या सिलिबंद, पॅकिंग मध्ये खरेदी करून शेतकऱ्यांना सीलबंद, पॅकिंग मध्ये विक्री करीत असतात व कृषी विभाग मान्यता प्राप्त सीलबंद व पॅक मधील निविष्ठांच्या दर्जाबाबत कृषी विक्रेत्यांना दोषी समजण्यात येऊ नये.
नवे कृषी निविष्ठा कायदे पूर्णतः विक्रेत्यांच्या विरोधात आहेत. ते मागे घेण्यासाठी कृषी विक्रेते तीन दिवसीय बंद पुकारला आहे. येत्या ७ डिसेंबरला नागपूरला ठिय्या आंदोलन केले जाईल. त्यानंतरही सरकारला जाग न आल्यास बेमुदत बंद पुकारला जाईल.
- प्रशांत पोळ, वाई.
जिल्हा सचिव, सातारा जिल्हा रासायनिक खते, बियाणे, कीटकनाशके डीलर असोसिएशन.