maharashtra

यादोगोपाळ पेठेमध्ये कमी दाबाने पाणी

पेठेतील नागरिकांचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

यादोगोपाळ पेठ येथे अत्यंत कमी दाबाने पाणी येत असून गोल मारुती मंदिर परिसरात पाण्याची प्रचंड टंचाई आहे. त्यामुळे वैतागलेल्या महिलांनी नगरपालिकेत धाव घेऊन मुख्याधिकारी अभिजीत बापट यांना निवेदन सादर केले.

सातारा : यादोगोपाळ पेठ येथे अत्यंत कमी दाबाने पाणी येत असून गोल मारुती मंदिर परिसरात पाण्याची प्रचंड टंचाई आहे. त्यामुळे वैतागलेल्या महिलांनी नगरपालिकेत धाव घेऊन मुख्याधिकारी अभिजीत बापट यांना निवेदन सादर केले.
या पेठेतील माजी नगरसेवक धनंजय जांभळे यांनी पाणीपुरवठा विभागात शहाजी वाठारे यांची भेट घेऊन त्यांना नागरिकांच्या व्यथा ऐकवल्या.
गोल मारुती मंदिर परिसर ते राजवाडा यादरम्यानच्या शंभर मीटरच्या परिसरात दस्तगीर कॉलनी येथील अडीच लाख लिटर क्षमतेच्या पाण्याच्या टाकीवरून पाणीपुरवठा होतो. मात्र गेल्या दोन महिन्यापासून गोल मारुती मंदिर परिसरात अत्यंत कमी दाबाने पाणी येणे, कधी-कधी 15 मिनिटेच पाणी येणे, किंवा कधी पाणीच न येणे अशा सातत्याने तक्रारी घडत आहेत. या संदर्भात नागरिकांनी वेळोवेळी पाणीपुरवठा विभागाला कळवूनही परिस्थितीमध्ये फारसा फरक पडला नाही. गोल मारुती मंदिर ते चांदणी चौक यादरम्यान माजी नगरसेवक धनंजय जांभळे यांच्या पाठपुराव्याने दोन-तीन वेळा जलवाहिनीची खुदाई करून तांत्रिक गळती काढण्याचा प्रयत्न झाला. मात्र अजूनही नक्की गळती आहे का कुठे जलवाहिनीला अडचण आहे, हे समजून आलेले नाही.
त्यामुळे सोमवारी सकाळी वैतागलेल्या महिलांनी धनंजय जांभळे यांच्या नेतृत्वाखाली थेट मुख्य अधिकारी अभिजीत बापट यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले. यासंदर्भात बापट यांनी पाणीपुरवठा विभागाच्या अभियंता शहाजी वाठारे यांना तत्काळ सूचना देऊन त्या परिसरातील लिकेज अथवा जी काही तांत्रिक अडचण आहे ती तात्काळ सोडवण्याचे सूचना दिल्या. पेठेतील महिलांनी घंटेवारी करणारे व्हॉल्वमन कमी वेळ पाणी सोडत असल्याची तक्रार केली आहे.