ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरचा ॲक्सेल तुटला
सातारा नजिक कृष्णा नदीवरील पुलावर वाहतुकीचा खोळंबा
ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरचा ॲक्सेल तुटल्याने मंगळवारी सकाळी १०.१५ वाजण्याच्या सुमारास सातारा नजीक असणाऱ्या कृष्णा नदीवरील पुलावर वाहतूकीचा चांगलाच खोळंबा झाला. या घटनेची माहिती मिळताच तात्काळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन काही वेळातच वाहतूक पूर्ववत केली.
सातारा : ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरचा ॲक्सेल तुटल्याने मंगळवारी सकाळी १०.१५ वाजण्याच्या सुमारास सातारा नजीक असणाऱ्या कृष्णा नदीवरील पुलावर वाहतूकीचा चांगलाच खोळंबा झाला. या घटनेची माहिती मिळताच तात्काळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन काही वेळातच वाहतूक पूर्ववत केली.
याबाबत अधिक माहिती अशी, काही दिवसांपूर्वी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोणत्याही शेतकऱ्याचा ऊस शिल्लक न ठेवता तो गाळपाला घेऊन जावा असा निर्णय झाल्यामुळे साखर कारखान्यांचा गळीत हंगाम लांबला आहे. सद्य परिस्थितीत सातारा- जावली आणि कोरेगाव विधानसभा मतदारसंघात चिमणगाव, ता. कोरेगाव येथील अजिंक्यतारा सहकारी साखर कारखाना आणि बीव्हीजी पूर्ण कार्यक्षमतेने उसाचे गाळप करीत आहे. त्यातच सातारा येथील बॉम्बे रेस्टॉरंट ते कृष्णानगर येथील कॅनॉलपर्यंत सातारा- सोलापूर राज्य मार्गावरील रस्त्याच्या एका बाजूच्या रस्त्याचे सिमेंट कॉंक्रिटीकरणाचे काम सुरू असल्यामुळे एकाच बाजूने वाहतूक सुरू असल्यामुळे त्या परिसरात सातत्याने वाहतुकीची कोंडी होत असतानाच कोरेगाव बाजूकडून आलेल्या ऊस वाहतूक करणाऱ्या एका ट्रॅक्टरचा ॲक्सेल आज सकाळी १०.१५ वाजण्याच्या सुमारास सातारा तालुक्यातील संगम माहुली आणि क्षेत्रमाहुली या दोन गावांना जोडणाऱ्या कृष्णा नदीच्या पुलावर तुटल्यामुळे काही वेळ वाहतुकीची मोठी कोंडी निर्माण झाली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक पूर्ववत केली.
गेल्या काही दिवसांपासून बॉम्बे रेस्टॉरंट ते कृष्णा नगर या रस्त्याच्या सिमेंट कॉंक्रिटीकरणाचे काम रखडल्याचे चित्र दिसून येत असून हे काम वेगात केल्यास वाहतुकीची कोंडी निर्माण होणार नाही, अशा प्रतिक्रिया अनेक नागरिकांनी व्यक्त केल्या.