maharashtra

युपीएससी परीक्षा कठीण हा गैरसमज : रुपाली कर्णे


Misconception that UPSC exam is difficult: Rupali Karne
युपीएससी परीक्षा कठीण आहे हा एक गैरसमज असून जिद्दीने व नियोजनबध्दपणे प्रामाणिक प्रयत्न केले तर यश हमखास मिळतेच. त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या परीक्षेला सामोरे गेले पाहिजे असे आवाहन युपीएससी द्वारे झालेल्या इंडियन स्टॅस्टिकल सर्व्हीसेस (केंद्रीय सांख्यिकी सेवा- आयएसएस) परीक्षेत देशात पाचवी व राज्यात प्रथम आलेली डिस्कळ, ता. खटाव येथील सुकन्या रुपाली कर्णे हिने केले.

पुसेगाव : युपीएससी परीक्षा कठीण आहे हा एक गैरसमज असून जिद्दीने व नियोजनबध्दपणे प्रामाणिक प्रयत्न केले तर यश हमखास मिळतेच. त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या परीक्षेला सामोरे गेले पाहिजे असे आवाहन युपीएससी द्वारे झालेल्या इंडियन स्टॅस्टिकल सर्व्हीसेस (केंद्रीय सांख्यिकी सेवा- आयएसएस) परीक्षेत देशात पाचवी व राज्यात प्रथम आलेली डिस्कळ, ता. खटाव येथील सुकन्या रुपाली कर्णे हिने केले.
चिमणगाव, ता. कोरेगाव येथील विवेकानंद ॲकेडमी ऑफ ह्युमन एक्सलन्समध्ये रुपालीच्या सत्कार कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ती बोलत होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थांनी शाळेच्या प्राचार्या रुपाली शहा, प्रा. योगेश कर्णे, व्यवस्थापक शांताराम निंबाळकर, पत्रकार प्रकाश राजेघाटगे व शिक्षक उपस्थित होते.
ग्रामीण भागातून शहरात उच्चशिक्षणासाठी गेल्यावर तेथे आपला अभ्यासात टिकाव लागेल का, यासारखे न्यूनगंड मनातून काढून अभ्यावर लक्ष केंद्रीत करावे. आपल्यातील उणीवा, आपल्यातील क्षमता व भविष्यात करीअरच्या संधी यांचे विश्लेषण करुन व्यक्तीमत्व विकासावर भर द्यावा. सर्वांच्याच वाट्याला अनुकुल परिस्थिती येत नाही. प्रतिकुल परिस्थितीवरही मात करुन ध्येयाकडे चिकाटीने वाटचाल करता आली पाहिजे.
अविनाश धर्माधिकारी यांचे नवा विजयपथ, राजेंद्र भारुड यांचे ताई मी कलेक्टर व्हयनू, मनोहर भोळे यांचे राजमुद्रा ही पुस्तके एमपीएससी, युपीएससी परीक्षार्थींना अत्यंत प्रेरणादायी आहेत. आपण इंडियन स्टॅस्टिकल सर्व्हीसेस परीक्षेची तयारी सुरु केली. पण लॉकडाऊनमुळे पुस्तकेही उपलब्ध होत नसल्याने गुगलवरुन पीडीएफ फाईल डाऊनलोड करुन अभ्यास केला. घरची कामे सांभाळून घरी राहून अभ्यास करण्यासाठी मासिक, दैनंदिन व प्रत्येक तासाचे नियोजन महत्वाचे आहे. केवळ स्पर्धा परीक्षांसाठीच नव्हे तर शाळा कॉलेजच्या अभ्यासाच्या वेळेचेही नियोजन व प्राणाणिक प्रयत्न आपणास उज्वल यश मिळवून देते. पालकांच्या आवाहनापेक्षा स्वेच्छेने केलेला अभ्यास महत्वाचा आहे. आंतरीक उर्मी आपणास प्रामाणिक अभ्यासास प्रवृत्त करते. स्पर्धा परीक्षेतील अपयशाने खचून न जाता झालेल्या चुका सुधारुन सातत्याने प्रयत्न होणे आवश्यक आहे. प्रश्नपत्रिका सोडविण्याचा सराव प्रत्यक्ष परीक्षेत आत्मविश्वास मिळवून देतो. अभ्यासाबरोबरच कला, क्रिडा नैपुण्य व विविध छंद जोपासले पाहिजेत. स्पर्धापरीक्षा, उच्चशिक्षण, खेळ, कला अथवा क्रिडा या कोणत्याही क्षेत्रात असाल तर त्यात अव्वलस्थान मिळवण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन रुपालीने केले.
गरीबी अथवा प्रतिकूल परिस्थीतीवर मात करुन चिकाटीने मिळवलेल्या या यशाचा विद्यार्थ्यांनी आदर्श घ्यावा, असे आवाहन प्राचार्या रुपाली शहा यांनी केले. निर्मला वाघ यांनी प्रास्ताविक करुन आभार मानले.