पालखी सोहळ्यात सातारा पोलिसांची 66 इसमांवर कारवाई उपद्रवी इसमांचा तातडीने बंदोबस्त
सातारा : सातारा जिल्ह्यातील श्री संत ज्ञानेश्वर पालखी सोहळ्यामध्ये दिनांक 18 जून ते 23 जून या दरम्यान उपद्रव माजवणार्या तब्बल 66 इसमांवर सातारा जिल्हा पोलिसांनी कारवाई केली आहे. स्थानिक गुन्हे शाखा व अप्पर पोलीस अधीक्षक बापू बांगर यांच्या चोख बंदोबस्ताने ही कारवाई करणे शक्य झाले आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी पालखी सोहळ्यामध्ये चोख पोलीस बंदोबस्त ठेवून उपद्रवी प्रवृत्तींना प्रतिबंध करण्याचे थेट निर्देश दिले होते. त्यानुसार एलसीबीच्या निगराणी खाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र भोरे, महिला पोलीस निरीक्षक आरती नांद्रेकर, पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील, विश्वास शिंगाडे, मदन फाळके अशी सात पथके वारकरी वेषामध्ये तब्बल पाच दिवस दिवस-रात्र तैनात होती.
स्थानिक गुन्हे शाखेने सातारा जिल्ह्यातील वारीमध्ये चोरीच्या उद्देशाने पाकीट मारणे, बॅग चोरी, मौल्यवान वस्तूंची चोरी, गैरवर्तन करणार्या 66 इसमांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली. तसेच गंभीर स्वरूपाचा अपराध करण्यापासून या इसमांना प्रतिबंधित करण्यात आले. पालखी सोहळ्यामध्ये लोणंद मध्ये एका चैनचोरी खेरीज कोणताही अनुचित प्रकार घडला नाही व पालखी सोहळा शांततेत व निर्विघ्नपणे पार पडला. याबद्दल पोलीस अधीक्षक समीर शेख व अतिरिक्त पोलिस अधीक्षक बापू बांगर यांनी संबंधित पोलीस अधिकारी आणि पोलीस कर्मचार्यांचे अभिनंदन केले आहे.