maharashtra

कास जंगलाच्या नाईट सफारीस निसर्गप्रेमी सातारकरांचा विरोध

वनविभाग व राजकीय कार्यकर्त्यांच्या आर्थिक फायद्यासाठी सफारी असल्याचा आरोप

Nature lovers Satarkars oppose the night safari of Kaas forest
पावसाळ्यात रंगबेरंगी फुलांची उधळण करत असलेले कास पठार जागतिक वारसा स्थळ असून आता विद्यमान उपवन संरक्षक महादेव यांच्या संकल्पनेतून कासच्या जंगलात नाईट सफारी सुरु करण्यात येणार असून दि. 19 रोजी या नाईट सफारीला सुरवात होणार असल्याचे वृत्त प्रसिध्द झाल्यानंतर या निर्णयाला निसर्गप्रेमी सातारकरांमधून विरोध होवू लागला आहे.

सातारा : पावसाळ्यात रंगबेरंगी फुलांची उधळण करत असलेले कास पठार जागतिक वारसा स्थळ असून आता विद्यमान उपवन संरक्षक महादेव यांच्या संकल्पनेतून कासच्या जंगलात नाईट सफारी सुरु करण्यात येणार असून दि. 19 रोजी या नाईट सफारीला सुरवात होणार असल्याचे वृत्त प्रसिध्द झाल्यानंतर या निर्णयाला निसर्गप्रेमी सातारकरांमधून विरोध होवू लागला आहे. हा निर्णय अत्यंत चुकीचा असून तो कासच्या जंगलात रात्री मुक्तपणे संचार करुन त्यांची जीवनशैली जगणाऱ्या मुक्या प्राण्यांसह निसर्गाला घातक ठरेल, अशी प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र चोरगे यांनी व्यक्त केली आहे.
कासचे जंगल अगदी 20 ते 22 वर्षांपूर्वी तसेच दुर्गम ठिकाण मानले जायचे. जायला छोटा आठ फुटी रस्ता. कास रस्त्यावर तुरळक असलेली छोटी गावे आणि कास तलाव परिसरात निसर्ग सहल करुन पार्ट्या करण्यासाठी हे कास प्रसिध्द होते. निसर्गरम्य कास परिसरात चांगला एकांत असल्याने मग प्रेमी युगलांसाठी हे हक्काचे ठिकाण होते. तरीही कास परिसरातील घनदाट जंगलात एकट्याने फिरणे तसा भीतीदायक अनुभव असायचा. कारण वर्दळ खूपच कमी असली तरी या रस्त्यावर प्रेमी युगलांना लुटणाऱ्या टोळ्याही कार्यरत होत्या. प्रेमी युगलांना लुटले तरी बिंग फुटेल या कारणातून पोलिसात तक्रारी देखील होत नव्हत्या.
असा हा कास परिसर कास पठारावर पावसाळ्यात फुलणाऱ्या फुलांच्या गालिच्यामुळे जगभरातील निसर्गप्रेमींचे आवडते ठिकाण बनला आहे. फुलांच्या हंगामातच नव्हे तर गेल्या काही वर्षांपासून कास परिसर हा पर्यटकांनी नेहमीच फुललेला दिसून येतो. ज्या कास तलाव परिसरात फक्त भूतबंगला होता तिथे आता असंख्य स्टॉल्स, हॉटेल्स थाटली गेलेली आहेत. दिवसभर व रात्रीपर्यंत कास रस्त्यावर पर्यटकांचा वावर असतोच त्यामुळे कास परिसरातील प्राणी जीवनाला दिवसा बिळात लपून बसण्याशिवाय पर्याय उरत नाही. रात्री उशिरा पर्यटकांची वर्दळ कमी झाल्यावर त्यांचे प्राणीजीवन सुरु होते. मग रात्रीच्या वेळी कास रस्त्यावर बिबट्यासह अनेक जंगली प्राण्यांचे दर्शन होते. त्यामुळे रात्रीच्या वेळी पर्यटकांची पावले घराकडे वळत असतात.
आता खुद्द उपवनसंरक्षक मोहिते यांच्या संकल्पनेतून कासच्या जंगलात नाईट सफारी सुरु करण्यात येणार असल्याची माहिती कास कार्यकारी समितीचे माजी अध्यक्ष सोमनाथ जाधव यांनी दिल्यानंतर त्याबाबतचे वृत्त प्रसिध्द झाले आहे. कास पठार कार्यकारी समिती व वनविभागाच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबवण्यात येत असला तरी या नाईट सफारीला सातारकरांसह निसर्गप्रेमींमधून विरोध होवू लागला आहे. एकीकडे वनविभाग वन्यप्राण्यांचे जीवन साखळी विस्कळीत होवून नये, निसर्गाची हानी होवू नये म्हणून कार्यरत असताना दुसरीकडे कास परिसरात नाईट सफारी सुरु करुन जंगलाचे व प्राण्यांचे कोणते हित साधले जाणार आहे ? असा सवाल निसर्गप्रेमी नागरिकांमधून विचारला जात आहे.
ताडोबा व्याघ्र प्रकल्पासारखी ही कास जंगलातील नाईट सफारी असणार असल्याचे सांगण्यात येत असून यामुळे पर्यटकांना जैवविविधता पाहण्याचा योग लाभणार असल्याचे सांगण्यात येत असले तरी हा प्रकार निसर्गप्रेमींना आवडलेला नाही. मुळात कास परिसरात मोठया प्रमाणात पर्यटकांची वर्दळ अगोदरच वाढली असल्याने निसर्गसंपदेला हानी पोहोचतच आहे. कास परिसरात असंख्य दारुच्या बाटल्या, प्लास्टिकच्या पिशव्या, टाकलेले खरकटे, जेवण तयार करण्यासाठी तोडलेली झाडे यामुळे प्रदुषणात व नुकसानीत भरच पडत असताना आता हा नाईट सफारीचा उद्योग सुरु झाल्यावर त्याचा परिणाम कास परिसरातील गावांवर, निसर्गावर व महत्वाचे जंगली मुक्या प्राण्यांच्या जीवनशैली होणार आहे. त्यामुळे हा सरकारी अधिकारी व काही राजकीय हितसंबंधींच्या फायद्यासाठी सुरु करण्यात येत असलेला नाईट सफारीचा प्रयोग रद्द करावा, अशीही मागणी होत आहे.
 
नाईट सफारी मुक्या प्राण्यांना, निसर्गाला घातक ठरेल : राजेंद्र चोरगे
हा निर्णय फार चुकीचा आहे. अगोदरच प्राण्यांची संख्या कमी झाले आहेत आणि आता त्यांच्या स्वातंत्र्यावर गदा येणार हे दुर्दैव आहे. जंगलातील 80 टक्के प्राणी आपले जिवन रात्रीचे जगत असतात. या नाईट सफारी मुळे प्रदूषण तर वाढणारच व प्राणी संख्या आणखीन कमी झाल्यावर थोडे फार शिल्लक निसर्ग चक्र पण बिघडणार हे नक्की. निसर्ग चक्र बिघडउन पैसे कमविणे आणि या मुळे पर्यटकांना आनंद मिळेल असे सांगणे म्हणजे जनतेला मूर्ख बनविणे. काही सरकारी आणि काही राजकीय लोकांच्या आर्थिक फायद्यासाठी निसर्गाचि वाट लागली जात आहे हे आपण दुर्दैवाने उघड्या डोळ्याने पहात आहे. जनतेला विश्‍वासात न घेता नाईट सफारी चा घेतलेला निर्णयाला आमचा नक्कीच विरोध असेल. कारण निसर्ग आणि प्राणी याचे नुकसान कधीच न भरून येणारे असेल, अशी प्रतिक्रिया व्यक्त करत साताऱ्यातील बालाजी चॅरिटेबल स्ट व सवयभान या संस्थांचा या निणर्याला विरोध असल्याचे सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र चोरगे यांनी सांगितले.

...तर ‘त्या’ जिवितहानीला जबाबदार कोण?
वन्यप्राण्यांचा मुक्तसंचार हा त्यांच्या अधिवासातच म्हणजे जंगलात असतो. जंगल सफारीच्या नावाखाली त्यांच्या अस्तित्वाचा प्रश्‍न निर्माण झाल्यास हे वन्यप्राणी इतरत्र स्थलांतर करु शकतात. कास पठारावर बिबट्यांबरोबर कोल्हे, गवे यांचेही अस्तित्व अधोरेखित झाले आहे. ही हिंस्त्र वन्यप्राणी जर त्यांचा अधिवास सोडून लोकवस्तीत आले तर आपले अस्तित्व जपण्यासाठी कोणावरही जिवघेणा हल्ला करु शकतात. त्यामुळे जिवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे होणार्‍या या जिवितहानीला जबाबदार कोण? याचाही धांडोळा वनविभागाने घ्यावा. काहीतरी ऍडव्हेंचर करावे म्हणून वनविभागाने घेतलेला हा जंगल सफारीचा निर्णय मनुष्यसृष्टीसाठी खचितच हितावह नाही. प्रशासनाने प्राणी व निसर्ग संपदा जपण्यासाठी अनेक उपाययोजना राबविल्या. मग असली निसर्ग विरोधी योजना राबविताना निसर्गप्रेमी व प्राणीमित्रांना विचारात न घेता कशी राबविली? याचा विचार होणे गरजेचे आहे. त्यामुळे हा जंगल सफर कार्यक्रम वनविभागाने त्वरित रद्द करावा. अन्यथा वनविभाग व जिल्हा प्रशासनास सातारकर निसर्गप्रेमी व प्राणीमित्रांच्या रोषास सामोरे जावे लागेल.
- महारुद्र तिकुंडे (माहिती अधिकार) संस्थापक अध्यक्ष, युवा राज्य फौंडेशन.