पुणे विद्यापीठात चाललंय काय? मार्कशीटसाठी विद्यार्थ्याकडून घेतले पैसे; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
पुणे विद्यापीठातील परीक्षा विभागाचे कर्मचारी मार्कशीटसाठी विद्यार्थ्यांकडून पैशाची मागणी करत असल्याचं समोर आलं आहे. या सगळ्याचा व्हिडीओ देखील व्हायरल झाला आहे.
पुणे : ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट समजल्या जाणाऱ्या पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विद्यापीठातील परीक्षा विभागाचे कर्मचारी मार्कशीटसाठी विद्यार्थ्यांकडून पैशांची मागणी करत असल्याचं समोर आलं आहे. या सगळ्याचा व्हिडीओ देखील व्हायरल झाला आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. त्यामुळे विद्यापीठाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे
मार्कशीटसाठी चार हजार रुपये मागत असल्याची तक्रार एका विद्यार्थ्याने अखिल भारतीय विद्यार्थी संघटनेकडे केली होती. त्यानंतर विद्यार्थ्यांनी हा प्रकार उघडकीस आणण्यासाठी तीन हजार रुपये या कर्मचाऱ्याला दिले. ज्या नोटा दिल्या त्या नोटांच्या नंबरचा फोटो या विद्यार्थ्यांनी काढून ठेवला होता. हा सगळा प्रकार घडल्यानंतर कर्मचाऱ्याकडून त्याच लाच म्हणून घेतलेल्या नोटा परत मागितल्या आणि याचा व्हिडीओ व्हायरल केला.
या व्हिडीओत विद्यापीठातील कर्मचारी संबंधित विद्यार्थ्यांनेच मला पैसे दिले, अशी कबुलीही देताना दिसत आहे. पुणे विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांमधून उत्तीर्ण झालेल्या अनेक विद्यार्थ्यांना विविध कागदपत्रांसाठी विद्यापीठाच्या परीक्षा विभागात यावे लागते. त्यांना कागदपत्र देण्यासाठी अनेकदा हेलपाटे घालावे लागतात. यापूर्वीही अशा घटना समोर आल्या आहेत. आता मात्र या व्हिडीओच्या माध्यमातून परीक्षा विभागातील कर्मचारी पैसे घेत असल्याचा पुरावा तयार केला आहे. मार्कशीट मागणारा प्रथम भंडारी हा विद्यार्थी बीएचं शिक्षण घेत आहे. याच विद्यार्थ्याकडून नेवासे नावाच्या कर्मचाऱ्याने पैसे घेतले असल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. विद्यार्थ्याकडे चार हजार रुपये मागितले होते मात्र तीन हजार रुपये घेतल्याचं समोर आलं आहे.
विद्यार्थ्यांचे वेगवेगळे आरोप
विद्यापीठातील विद्यार्थी मार्कशीट किंवा अन्य कोणत्याही कागदपत्रासाठी विद्यापीठातील संबंधित विभागाकडे जात असतात मात्र या विद्यार्थ्यांना टोलवाटोलवीचे उत्तरं दिले जातात किंवा त्यांना रोज चकरा मारायला लावत असल्याचं आतापर्यंत अनेकदा समोर आलं आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना बराच त्रास सहन करावा लागतो आणि त्यांचा वेळही वाया जातो. त्यासोबतच पैशाचीही मागणी करुन विद्यार्थ्यांना मानसिक त्रास दिला जात असल्याचा आरोप विद्यार्थी करत आहेत.
व्हिडीओची सत्यता तपासणार
हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर परीक्षा विभागातील कर्मचाऱ्याच्या विरोधातील तक्रार आणि व्हिडीओचा तपास केला जाणार आहे. त्यानंतर विद्यापीठाकडून या व्हिडीओची सत्यता पडताळून दोषी असलेल्या कर्मचाऱ्यावर कारवाई करण्यात येईल, असं विद्यापीठ प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.