मंदिरात येणाऱ्या भाविकांसाठी आता ड्रेस कोड असणार आहे. पुणे उपनगरातील मंदिर ट्रस्टने ड्रेस कोड लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे स्वागत नागरिकांनी अन् भाविकांनी केले आहे.
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या मंदिरात प्रवेशासाठी काही दिवसांपूर्वी नियमावली तयार केली होती. मंदिरात प्रवेशासाठी ड्रेस कोड लागू केला होता. परंतु त्यानंतर मंदिर संस्थानने यु टर्न घेत सात तासांत निर्णय फिरवला. तुळजापुरात हा निर्णय अयशस्वी झाला असला तरी पुण्यात ड्रेस कोडचा निर्णय घेण्यात आला आहे. आता पुणे शहरातील वाघेश्वर मंदिरासाठी ड्रेस कोडचा नियम केला गेला आहे. शॉर्ट कपडे परिधान करून दर्शनासाठी येणाऱ्यांची संख्या वाढत असल्याने मंदिरात ड्रेस कोड लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.
कशावर असणार निर्बंध
पुणे शहराच्या उपनगरातील वाघोली येथील वाघेश्वर मंदिराच्या गाभाऱ्यात दर्शनासाठी जाताना शॉर्ट कपड्यांवर बंदी घालण्यात आली आहे. महिलांना वन पीस, शॉर्ट स्कर्ट, शॉर्ट पॅन्ट घालून मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही. वाघेश्वर मंदिर हे पुरातन कालीन मंदीर आहे. येथे दर्शनासाठी भाविकांची गर्दी असते. मात्र शॉर्ट कपडे परिधान करून दर्शनासाठी येणाऱ्यांची संख्या वाढत आहे. यामुळे पावित्र्य भंग पावत आहे. अन्य भविकांचीही तशी ट्रस्टकडे तक्रार आहे. मंदिराचे पावित्र्य राखले जावे यासाठी वाघोली विकास प्रतिष्ठाणचे अध्यक्ष सातव व उपाध्यक्ष दाभाडे यांनी हा निर्णय यांनी घेतला आहे.
पुरुषांना देखील असणार नियम
मंदिरात ड्रेसकोड लागू करण्याचे फलक लावण्यात आले आहे. पुरुषांना देखील शॉर्ट पॅन्ट घालून मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही. वाघेश्वर देवस्थान ट्रस्टकडून नियमावली जाहीर केली आहे. या निर्णयाचे स्वागत वाघोलीतील नागरिकांनी व भाविकांनी केले.
या ठिकाणी आहेत नियम
मध्य प्रदेशातील गुना येथील जैन मंदिरात प्रवेशाचा नियम आहे. येथे पाश्चात्य कपडे परिधान करून कोणतीही महिला किंवा मुलगी प्रवेश करू शकत नाही. या मंदिराचे मूळ नाव श्री शांतिनाथ दिगंबर जैन अतिशय क्षेत्र आहे, जे १२३६ मध्ये बांधले गेले.
माँ कामाख्याचे मंदिरामध्ये ड्रेस कोडचा नियम आहे. विशेष बाब म्हणजे या मंदिरात मातेच्या पूजेसाठी कोणतीही मूर्ती स्थापित केलेली नाही, परंतु मंदिराच्या आवारात एक शिळा आहे ज्याची पूजा केली जाते. त्या ळेला काळभैरव असे म्हणतात.
केरळचे पद्मनाभस्वामी मंदिर देशभर प्रसिद्ध आहे. हे देशातील सर्वात श्रीमंत मंदिरांपैकी एक आहे. या ठिकाणी भगवान विष्णूची पहिली मूर्ती सापडल्याचे सांगितले जाते. असे म्हटले जाते की महिला येथे विष्णूची पूजा करू शकतात परंतु मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करू शकत नाहीत. महिलांसोबतच येथील पुरुषांनाही भारतीय ड्रेसमध्ये मंदिरात जावे लागते.