maharashtra

शिवसेनेचे चार भिंती परिसरात कंदिल आंदोलन

परिसरात पथदिवे उभारण्याची मागणी

Shiv Sena's Lantern agitation in Char Bhinti area
साताऱ्यात चार भिंती शिवसेना जिल्हा कार्यकारीणीच्या वतीने कंदिल आंदोलन करण्यात आले. या परिसरात पथदिवे लावून हा परिसर प्रकाशमान करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

सातारा : साताऱ्यात चार भिंती शिवसेना जिल्हा कार्यकारीणीच्या वतीने कंदिल आंदोलन करण्यात आले. या परिसरात पथदिवे लावून हा परिसर प्रकाशमान करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
यावेळी बोलताना शिवसेनेचे शहर प्रमुख निलेश मोरे म्हणाले, मराठ्यांची राजधानी असलेल्या सातारा शहरात विकासाचे नुसतेच गाजर सातारा विकास आघाडीकडून दाखवले जात आहे. प्रत्यक्षात ऐतिहासिक चार भिंती परिसर अंधारात आहे. अजिंक्यताऱ्याचा रस्ता अर्धवट निधीअभावी पडून राहिला आहे. अर्धवट राहिलेली कामे अगोदर सातारा विकास आघाडीने पूर्ण करावी, त्या विकासाचा प्रकाश पाडावा, अशी मागणी मोरे यांनी केली आहे.
या आंदोलनात शिवसेनेचे शहर प्रमुख निलेश मोरे, उपशहर प्रमुख गणेश अहिवळे, अभिजीत सपकाळ, विभाग प्रमुख अमोल खुडे, शाखा प्रमुख संतोष खुडे, अमोल खोपडे, प्रथम बाबर यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी सहभागी झाले होते.
यावेळी बोलताना गणेश अहिवळे म्हणाले, इथे पण काही तरी रचनात्मक होऊ द्या. बराच उजेड पडला आहे साताऱ्यात. बरीच उद्घाटने सातारा विकास आघाडीने केली. अस वाटायला लागले की, सातारा इनोव्हेंटटीव्ह कार्यक्रम झाला अन साताऱ्याचा शांघाय झाला. अहो चार भिंतीच्या हुतात्मा स्मारकाच्या ठिकाणी लाईट नाहीत. अजिंक्यतारा किल्ल्याचा रस्ता अर्धाच राहिला आहे. तिथं पडू द्या जरा उजेड तुमच्या आघाडीचा. होऊ द्या साताऱ्याचा विकास. नुसतं सातारा विकास आघाडी नाव ठेवलं म्हणून विकास होत नसतो. किंवा, सातारा विकास आघाडीन इनोव्हेंटटीव्ह कार्यक्रम घेतला म्हणजे विकास होत नसतो. वेब सिरीजचे चित्रीकरण सुरू झाले म्हणजे विकास होत नसतो. आम्हा सातारकराना दुधखुळ समजू नका.
गणेश अहिवळे पुढे म्हणाले, सातारा विकास आघाडीला पालिकेच्या सत्ताधारी मंडळींच्या डोक्यात प्रकाश पडावा म्हणून शिवसेनेच्यावतीने चार भिंतीवर कंदील लावत आहोत. या हुतात्मा स्मारकाच्या झालेली दयनीय अवस्था अगदी सातारा शहरासारखीच आहे. किल्ले अजिंक्यताऱ्याचा रस्ता तब्बल चार वर्ष झाला नाही. पंचवीस लाखाचा निधी नसल्याने काँक्रीटचा रस्ता होत नाही. म्हणे इनोव्हेंटटीव्ह साताऱ्याला सुरुवात झाली. सातारा पालिकेकडे आता अजिंक्यतारा आला आहे. रस्त्यासाठी काय पाठपुरावा केला ते सांगा?, कधी होणार रस्ता ते सांगा?, केवळ चित्रीकरण योग्य गावे झाली म्हणजे सातारा इनोव्हेंटटीव्ह होत नसतो, तर राजधानी सातारा ही राजधानी साताराच झाली पाहिजे. पालिका किती लक्ष देते हो सांगा.
चारभिंतीचे सुशोभिकरण करण्यात यावे. तेथे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत. दररोज स्वच्छता पालिकेच्यावतीने करण्यात यावी. किल्ले अजिंक्यताऱ्याचा राहिलेला रस्ता लवकरात लवकर करण्यात यावा. ग्रेड सेपरेटरवर पायी चालत जाणाऱ्यांना पदपथ करावा. पालिकेकडून किल्ले अजिंक्यताऱ्याची माहिती देणारे गाईड नेमावेत. हुतात्मा कर्नल संतोष महाडिक यांचे स्मारक लवकर उभे करावे. भुयारी गटरचे रखडलेले काम मार्गी लवकर लावावे. शहरातील कचरा वेळेवर उचलावा. तरुणांना रोजगार मिळण्यासाठी प्रत्यक्षात क्रिएटिव्ह स्वरूपात कार्यक्रम सुरू करावा. आदी मागण्यांकडे सातारा पालिकेच्या सत्ताधाऱ्यांनी लक्ष दिले नाही तर शिवसेना लक्षवेधी आंदोलन छेडेल. असा इशारा गणेश अहिवळे यांनी दिला आहे.