maharashtra

शाहू क्रीडा संकुलातील समस्या संदर्भात वृषाली राजे यांनी घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेट

साताऱ्याच्या राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चा

साताऱ्याचे माजी नगराध्यक्ष श्रीमंत छ. शिवाजीराजे भोसले यांच्या कन्या वृषालीराजे भोसले (पवार) सध्या सातारा शहर व जिल्ह्याच्या समाजकारणात सक्रिय झाल्या आहेत. श्री.छ. शाहू क्रीडा संकुलातील विविध प्रश्नांबाबत त्यांनी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांना निवेदन देत याप्रश्नी तोडगा काढण्याची मागणी केली. त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी हे प्रश्न तातडीने सोडवण्याची ग्वाही दिली.

सातारा : साताऱ्याचे माजी नगराध्यक्ष श्रीमंत छ. शिवाजीराजे भोसले यांच्या कन्या वृषालीराजे भोसले (पवार) सध्या सातारा शहर व जिल्ह्याच्या समाजकारणात सक्रिय झाल्या आहेत. श्री.छ. शाहू क्रीडा संकुलातील विविध प्रश्नांबाबत त्यांनी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांना निवेदन देत याप्रश्नी तोडगा काढण्याची मागणी केली. त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी हे प्रश्न तातडीने सोडवण्याची ग्वाही दिली.
सातार्‍याचे माजी नगराध्यक्ष श्री.छ. शिवाजीराजे भोसले हे नेहमी समाजातील विविध अडचणी जाणून त्यावर मार्ग काढण्याचे काम करत आले आहेत. आता त्यांचा वारसा श्री.छ. वृषालीराजे भोसले पुढे चालवत असून त्यांनी सर्वांच्या जिव्हाळयाचा विषय असलेल्या श्री.छ.शाहू क्रीडा संकुलातील सुविधांबाबत जिल्हाधिकारी शेखरसिंह यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन दिले. यावेळी नगरपालिकेचे मुख्याधिकारी अभिजित बापट, सातारा जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचे खजिनदार मनोज कान्हेरे उपस्थित होते.
श्री. छ. शाहू जिल्हा क्रीडा संकुल येथील सुविधा व जागा मार्च 2020 पासून कोविड-19 सेंटर उभारण्याकरता व कोविड सेंटरमध्ये काम करणार्‍या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या निवास व्यवस्थेकरिता अधिग्रहित करण्यात आल्या होत्या. याबाबत 1 जून 2021 ते 31 मार्च 2022 या कालावधीतील संकुलातील सुविधांना आकारण्यात आलेला पूर्ण कर (सन 2021-22) नगरपालिकेकडून महाराष्ट्र नगरपरिषद अधिनियममधील तरतुदीनुसार कर माफ करण्यात यावा, अशी मागणी वृषाली राजे यांनी केली. श्री.छ. शाहू जिल्हा क्रीडा संकुल येथील क्रिकेट, बॅडमिंटन, फुटबॉल असोसिएशनचे कार्यालय यांची नगरपालिका कर आकारणी व्यावसायिक न करता रहिवासी म्हणून करण्यात यावी. तसेच क्रीडा संकुल येथील चौकामध्ये उभ्या असणार्‍या ट्रान्सपोर्टच्या खासगी बसेस पार्क केलेल्या असतात त्या काढून टाकण्यात याव्यात व तेथील जागा सुशोभिकरण करुन घ्यावी. या संकुलालगत असणार्‍या चायनीज गाडया, टपरी हटवण्यात याव्यात. जेणेकरुन क्रीडाप्रेमी, नागरिक आणि अधिकृत गाळेधारकांना त्रास होणार नाही, अशी मागणी केली. याबाबत जिल्हाधिकारी शेखरसिंह यांनी करआकारणीबाबात तातडीने कार्यवाही करण्याची ग्वाही दिली. तसेच अतिक्रमण लवकरात लवकर काढले जाईल. तसेच फुटबॉल मैदानाबाबत लवकरात लवकर जागा उपलब्ध करुन दिले जाईल, असे आश्वासन दिले.