ग्रामपंचायत निवडणूक 2022 : साताऱ्यात भाजपा एक नंबर
सातारा जिल्ह्यात राजकीय सत्तांतराचे हेलकावे; जिल्ह्यात शिंदे गटाची जोरदार मुसंडी
सातारा जिल्ह्यात झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने 318 पैकी एकहाती 98 ग्रामपंचायती जिकल्या आणि भाजपा सातारा जिल्ह्यात एक नंबरचा पक्ष ठरला आहे.
सातारा : सातारा जिल्ह्यात झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने 318 पैकी एकहाती 98 ग्रामपंचायती जिकल्या आणि भाजपा सातारा जिल्ह्यात एक नंबरचा पक्ष ठरला आहे.
भाजपा आणि बाळासाहेबांची शिवसेना (शिंदे गट) यांच्या युतीने एकूण 198 जागांवर विजय मिळवत महाविकास आघाडीला घोबीपछाड दिला. महाविकास आघाडीला तीन पक्ष एकत्र येऊनही फक्त 92 जागांवर समाधान मानावे लागले.
सातारा जिल्हा हा आता भाजपा चा बालेकिल्ला होत आहे, सातारा जिल्ह्यात निवडून आलेल्या भाजपा च्या कार्यकर्त्यांचे मी अभिनंदन करतो. अपक्ष आणि इतर निवडून आलेल्यांपैकी अनेक जण आगामी काळात भा ज पा मध्ये येण्यासाठी इच्छुक आहेत. इथून पुढेही प्रत्येक कार्यकर्त्याला पाठबळ दिले जाईल आणि येणाऱ्या जिल्हा परिषद, नगरपालिका निवडणुकीतही भाजपा एक नंबर चा पक्ष ठरेल, असा विश्वास भारतीय जनता पार्टीचे सातारा जिल्हाध्यक्ष आमदार जयकुमार गोरे यांनी व्यक्त केला.
सातारा जिल्ह्यात एकूण 259 ग्रामपंचायतीच्या मतमोजणी मध्ये सत्तांतराचे अनेक राजकीय साद पडसाद दिसून आले. या निवडणुकीत 60 ग्रामपंचायती यापूर्वीच बिनविरोध झाल्या होत्या. निवडणुकीसाठी 4542 उमेदवार रिंगणात होते. सुमारे चार लाख 50 हजार मतदारांपैकी तीन लाख 55 हजार 254 मतदारांनी हक्क बजावला. मंगळवारी ग्रामपंचायत निवडणुकांच्या झालेल्या मतमोजणीनंतर शिंदे गट आणि भाजपा युतीने राष्ट्रवादीला कडवी टक्कर दिल्याचे चित्र स्पष्ट झाले, तर सातारा जिल्ह्यात राष्ट्रवादीला बालेकिल्ला सांभाळताना प्रचंड कसरत करावी लागली. या धक्कादायक निकालांमध्ये कराड तालुक्यातील पश्चिम सुपने ग्रामपंचायत पालकमंत्री शंभूराज देसाई आणि ऍडव्होकेट उदयसिंह पाटील उंडाळकर यांच्या गटांनी चार जागांवर विजय मिळवला, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराने सरपंच पदावर विजय मिळवल्याने पालकमंत्री शंभूराजे यांच्या अवस्था गड आला पण सिंह गेला अशी झाली आहे. वडगाव हवेली, ता. कराड येथे ग्रामपंचायतीत सत्तांतर झाले असून याठिकाणी डॉ. अतुल भोसले समर्थक असलेल्या कृष्णा कारखान्याचे उपाध्यक्ष जगदीश जगताप यांच्या गटाने बाजी मारली आहे. जगताप याच्या गटाचे सरपंचासह 11 उमेदवार विजयी झाले. तर त्यांच्या विरोधात असलेल्या महाविकास आघाडी पुरस्कृत पॅनेलला केवळ 5 जागांवर समाधान मानावे लागले.
कराड तालुक्यातील 33 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची मतमोजणी मंगळवारी सुरळीत पार पडली. तालुक्यातील महत्वाची ग्रामपंचायत असलेल्या वडगाव हवेली ग्रामपंचायत निवडणुकीत जगदीश जगताप यांच्या गटाविरोधात विरोधी गटातून लोकशाही आघाडीतील उमेदवार राजेंद्र थोरात, जयवंत जगताप, प्रशांत काटवटे, शारदा पाथ सुपे आणि प्रकाश थावरे हे उमेदवार निवडून आले. तर या निवडणुकीत डॉ. इंद्रजित मोहिते समर्थक सुधीर जगताप पराभूत झाले. या ठिकाणी काँग्रेसचे नेते बंडानाना जगताप यांचे पुत्र सुरज जगताप सरपंच पदासाठी अपक्ष उभे राहिले होते मात्र, त्यांचा निवडणुकीत पराभव झाला आहे. कृष्णा कारखान्याचे उपाध्यक्ष जगदीश जगताप यांचे समर्थक राजेंद्र जगताप हे निवडणुकीत सरपंचपदी निवडून आले आहेत तर दादासो जगताप, भारती साळुंखे, सचिन चव्हाण, सुषमा मदने, सविता साळुंखे, वनिता जगताप, सूक्षम गोतपागर, कौसर शिकलगार, अनुराधा मुळे, अनिता जगताप हे उमेदवार सदस्यपदी निवडून आले आहेत.
महाबळेश्वर तालुक्यामध्ये शिंदे गटाने जोरदार मुसंडी मारली. महाबळेश्वरच्या लाखवड ग्रामपंचायतीत एकनाथ शिंदे गटाच्या रूपाली संकपाळ सरपंच पदी आल्याने राष्ट्रवादीचे आमदार मकरंद पाटील यांच्या गटाला धक्का बसला, तर महाबळेश्वर तालुक्यातील वेंगळ ग्रामपंचायतीवर एकनाथ शिंदे गटाच्या शोभा संकपाळ विजयी झाल्या. आमदार मकरंद पाटील यांचा हा राजकीय सेटबॅक मानला जात आहे. माळ्याची वाडी ग्रामपंचायत मध्ये अरुण कापसे यांना २५७ मते मिळाली. विशाल कापसे यांना ९१ मध्ये मिळाली. अरुण कापसे यांनी पुन्हा एकदा एकहाती सत्ता राखल्याने कापसे गटाचे वर्चस्व सिद्ध झाले आहे. अपशिंगे ग्रामपंचायत भाजप गटाकडे गेली असून भाजपच्या तुषार रिकाम्यांना 912, तर राष्ट्रवादीच्या संतोष निकम 832 मध्ये पडली. अपशिंगे ग्रामपंचातीमध्ये राष्ट्रवादीला हा मोठा धक्का मानला जात आहे. माण तालुक्यामध्ये महिमानगड ग्रामपंचायत शिंदे गटाकडे गेली असून धुळदेव ग्रामपंचायतीवर भाजपने वर्चस्व राखले आहे. सातारा तालुक्यातील देगाव ग्रामपंचायतीत 4653 मतदान होते. येथे महेश शिंदे गटाच्या सरपंच पदी वैशाली साळुंखे विजयी झाल्या आहेत. शिंदे गटाची सातारा तालुक्यातील एन्ट्री ही महत्त्वपूर्ण मानली जात आहे. राष्ट्रवादीच्या कांचन साळुंखे यांचा पराभव झाल्याने झाल्याने शिवेंद्रराजे गटाला येथे धक्का बसला आहे. पाटण तालुक्यातील नाटोशी ग्रामपंचायत देसाई गटाकडे कायम राहिली, तर पाटण तालुक्यातील म्हावशी ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीने नेहमीप्रमाणे वर्चस्व राखले. सातारा तालुक्यात काशीळ ग्रामपंचायत सत्तांतर झाले. भाजपने येथे आपली सत्ता राखली, तर राष्ट्रवादीला हा पराभव अत्यंत जिव्हारी लागला. कोरेगाव तालुक्यातील रामोशी वाडी ग्रामपंचायत राष्ट्रवादीकडे कायम राहिली. येथे शशिकांत शिंदे गटाने आठ शून्य असा एकतर्फी विजय मिळवला. पाटण तालुक्यातील निवकणे ग्रामपंचायतीत राष्ट्रवादीचे सर्व उमेदवार विजयी झाल्याचे स्पष्ट झाले, तर सातारा तालुक्यातील क्षेत्र माहुली या गावात आमदार महेश शिंदे यांनी केलेली राजकीय पेरणी यशस्वी ठरली आणि येथे शिंदे गटाची सत्ता कायम राहिली आहे. आमदार शशिकांत शिंदे यांच्या अनेक सत्ताकेंद्रांना महेश शिंदे यांनी धक्का दिल्याने पुन्हा एकदा शिंदे विरुद्ध शिंदे हा सातारा तालुक्यातील पण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील हाय व्होल्टेज ड्रामा चर्चेचा विषय ठरला आहे. कोरेगाव तालुक्यातील अंबवडे संमत कोरेगाव, जरेवाडी, शिरंबे, वडाचीवाडी, वाघजाईवाडी, कवडेवाडी, रामोशीवाडी, सांगवी, आसनगाव, चिमणगाव, धुमाळवाडी, एकंबे, गुजरवाडी, जांब खुर्द, खामकरवाडी, खेड, रुई, बनवडी आणि सायगाव या १९ ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसचेने आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. सातारा तालुक्यातील वडुथ, मर्ढे, रेणावळे, मालगाव, आसगाव, न्हाळेवाडी, खावली या ७ ग्रामपंचायतीसह खटाव तालुक्यातील ललगुण या ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसने आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. कराड तालुक्यातील मनव आणि जळगाव येथे उदयसिंह पाटील उंडाळकर यांची सत्ता कायम राहिली, तर दुशेरे ग्रामपंचायती भाजपच्या डॉक्टर अतुल भोसले यांनी राखल्या आहेत. अतुल भोसले यांनी या ग्रामपंचायत साठी प्रचंड मेहनत घेतली होती. राष्ट्रवादीचे दिग्गज नेते बाळासाहेब पाटील यांनी हिंगनोळी, हेळगाव, पाडळी, अंतवडी येथे पाटील गटाने सत्ता कायम राखली आहे. कराड तालुक्यातील अंतवडी ग्रामपंचायत सत्तांतर झाले असून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या गटाला जोरदार धक्का बसला आहे. येथे बाळासाहेब पाटील यांच्या पॅनलचा दणदणीत विजय झाला.
सातारा जिल्हा -
एकूण ग्रामपंचायती 318
भाजप 98
भाजप +शिंदे गट 32
शिंदे गट 69
एकूण भाजप,शिंदे गट युती 198
राष्ट्रवादी 78
काँग्रेस 7
ठाकरे गट 7
एकूण महविकास आघाडी 92
अन्य 28