maharashtra

भ्रष्टाचारी व्यक्तीने भ्रष्टाचारावर ओरडणे म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा

खासदार उदयनराजे भोसले यांचा आमदार शिवेंद्रसिंहराजे यांना अप्रत्यक्ष टोला

भ्रष्टाचारामध्ये अखंड बुडालेल्या भ्रष्टाचारी व्यक्तींनी भ्रष्टाचारावर ओरड करणे म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा आहेत, असा सणसणीत टोला खासदार उदयनराजे भोसले यांनी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे नाव न लगावता दिला आहे.

सातारा : भ्रष्टाचारामध्ये अखंड बुडालेल्या भ्रष्टाचारी व्यक्तींनी भ्रष्टाचारावर ओरड करणे म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा आहेत, असा सणसणीत टोला खासदार उदयनराजे भोसले यांनी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे नाव न लगावता दिला आहे. सातारा विकास आघाडीने आपल्या वचननाम्यातील सर्व कामे पूर्ण केली असून स्वतःच्याच कामाची ऑडिट करणारी सातारा विकास आघाडी ही एकमेव ठरली आहे, असे ठामपणे उदयनराजे यांनी प्रसिद्ध पत्रकात नमूद केले आहे.
जलमंदिर येथून प्रसिद्ध झालेल्या प्रसिद्धी पत्रकात पुढे नमूद आहे की, काहीजण स्वतः बाळबोध असल्याचे समजून सातारा विकास आघाडी, आम्ही, भ्रष्टाचार, कमिशन, टक्केवारी अशा गोष्टीं बोलत आहेत. जे भ्रष्टाचारी आहेत तेच भ्रष्टाचारावर बोलतात म्हणजे ह्या चोराच्या उलट्या बोंबा आहेत. त्यांच्या बेलगाम आणि बिनबुडाच्या आरोपांना आम्ही अजिबात किंमत देत नाही. नागरिकांनी ज्या विश्वासाने आम्हाला प्रेम दिले आहे त्याला तडा न जाऊ देता नगरपरिषदेचा कार्यकाल अतिशय संयमाने चालवण्यात सातारा विकास आघाडी यशस्वी ठरली आहे. सर्व नगरसेवकांची कामे समायोचित पद्धतीने मार्गी लावण्यात आली आहेत.
राज्याचे आणि केंद्राचे स्वच्छ संरक्षण अभियान, घरकुल योजना, प्रधानमंत्री आवास योजना, अमृत योजना, वित्त आयोग, सर्व केंद्राच्या योजना असून त्यामधून निधी प्राप्त करून घेण्यात आला आहे. कास धरणाची उंची वाढवणे, भुयारी गटार योजना, घनकचरा व्यवस्थापन, नवीन प्रशासकीय इमारत, ग्रेड सेपरेटर, आयुर्वेदिक गार्डन, उद्यानांचे नूतनीकरण, ज्येष्ठ नागरिक भवन, घरकुल योजना, शहीद कर्नल संतोष महाडिक यांचे स्मारक, हद्दवाढीसाठी भरघोस निधी, दैनंदिन दिवाबत्ती, रस्ते, पाणी, गटार इत्यादी सुविधा नागरिकांना देण्यात आल्या आहेत. पोवई नाका येथील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे नूतनीकरण करण्यात येत आहे. हा लेखाजोखा आम्ही जनतेपुढे मांडणार आहोतच.
मात्र आरोप करणारे ज्यांचा वारसा सांगतात ते सत्ताधिश असताना त्यांनी कचरा उचलण्याच्या पद्धतीत सुधारणा केली नाही. त्यांनी सुधारण्याच्या कोणत्याही मुद्द्याला हात घातला नाही. घंटागाड्यांच्या संदर्भात आरोप करताना ज्यावेळी आपण आरोप करतो तेव्हा पुराव्याशी बोलले पाहिजे अन्यथा सातारा विकास आघाडीची बदनामी करणे इतकाच प्रकार त्यांच्या कृतीतून दिसून येत आहे. हे त्यांच्या संकुचित स्वभावाचे आणि कर्मदरिद्रीपणाचे लक्षण आहे, अशा शब्दात उदयनराजे यांनी शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा नाव न घेता फटकारले आहे.
आम्ही यांना यापूर्वी समोर येण्याचे आव्हान अनेक वेळा दिले. परंतु त्यावेळी नसलेली शेपूट घालून कधी आव्हान यांनी स्वीकारलेच नाही आणि आता नवीन आव्हान देत आहेत. निधी किती आणला याबाबतचे त्यांचे आव्हान आम्ही नम्रपणे स्वीकारतो. त्याकरता गांधी मैदान येथे आमने-सामने झाले पाहिजे. वेळ व तारीख दोघांच्या सोयीच्या असावी. आम्ही तयार आहोत. कर नाही त्याला डर कशाला पाहिजे, असा थेट इशारा खा. उदयनराजे भोसले यांनी दिला आहे.