sports

शितोळे कुटुंबीयांचा सिंगापूरमध्ये ‘गणपती बाप्पा मोरया’चा जयघोष

आठ वर्षांपासून गणरायासह गौरीची प्रतिष्ठापना : आरतीला प्रसिद्ध व्यक्ती उपस्थित : मराठी बाण्यामुळे सिंगापूरकर गहिवरले

मूळचे कसबा पुणे येथील नकुलराव नितीनराव शितोळे आणि त्यांच्या सुविद्य पत्नी अनुजा नकुलराव शितोळे या दाम्पत्याचा सिंगापूर येथे सुरू असलेला ’गणपती बाप्पा मोरया’चा जयघोष सिंगापूरवासियांना चांगलीच उर्जा देत आहे. हे दांपत्य गेली सलग आठ वर्ष आपल्या निवासस्थानी गणपती बाप्पासह गौरींची प्रतिष्ठापना करत आपला मराठी बाणा जपत आहे.

सातारा : मूळचे कसबा पुणे येथील नकुलराव नितीनराव शितोळे आणि त्यांच्या सुविद्य पत्नी अनुजा नकुलराव शितोळे या दाम्पत्याचा सिंगापूर येथे सुरू असलेला ’गणपती बाप्पा मोरया’चा जयघोष सिंगापूरवासियांना चांगलीच उर्जा देत आहे. हे दांपत्य गेली सलग आठ वर्ष आपल्या निवासस्थानी गणपती बाप्पासह गौरींची प्रतिष्ठापना करत आपला मराठी बाणा जपत आहे. परदेशात राहूनही या दाम्पत्याचे मराठी संस्कृतीप्रती असलेले प्रेम पाहून अक्षरशः सिंगापूरवासीय गहिवरून जात आहेत. विशेष म्हणजे त्यांच्या निवासस्थानी गणपतीबाप्पाच्या आरतीसाठी प्रसिद्ध व्यक्ती उपस्थिती लावतात.

सातारा येथील प्रगतशील शेतकरी अमर जाधव, सौ. अरुणा अमर जाधव यांची कन्या अनुजा आणि कसबा पुणे येथील नितीनराव शितोळे, सौ. निलीमा शितोळे यांचे चिरंजीव नकुलराव यांचा विवाह झाल्यानंतर सुमारे आठ वर्षांपासून हे दांपत्य व्यवसायानिमित्त सिंगापूर येथे वास्तव्य करीत आहे. मुळात जाधव आणि शितोळे या दोन्हीही कुटुंबीयांना महाराष्ट्रात फार मोठा वारसा आहे, इतिहास आहे. त्यामुळे सहाजिकच या दोन्ही कुटुंबामध्ये मराठी सण, संस्कृती, वैचारिक देवाण-घेवाण याला अनन्य साधारण महत्व आहे.

संपूर्ण देशामध्ये गणपती उत्सवाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. सर्वात मोठा उत्सव, मनाला भावणारा आणि शिवणारा उत्सव म्हणून याची ओळख आहे. विघ्नहर्ता अशी ओळख असणारा गणपती बाप्पा प्रत्येक मराठी माणसाच्या मनात वास्तव्य करतो हे एक त्रिकाल सत्य आहे. गणपती बाप्पाची मनोभावे प्रार्थना केल्यास सर्व विघ्ने दूर होतात अशी एक धारणा आहे. गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना म्हणजे मराठी बाण्याला बळ देणे, मराठी संस्कृतीचे संवर्धन करणे असे मानले जाते.

मराठी संस्कृतीचे संवर्धन करत कसबा पुणे येथील शितोळे दांपत्य गेल्या आठ वर्षापासून सिंगापूर येथील आपल्या निवासस्थानी बाप्पासह गौरींची प्रतिष्ठापना करत आहे. गणेशोत्सवापूर्वी कसबा पुणे येथील शितोळे सरकार यांच्याकडून गणरायाच्या मूर्तीची मागणी करून त्याचे मनोभावे प्रतिष्ठापना केली जाते. याच दरम्यान गौराई, त्यांचे दागिने, सजावटीचे साहित्य, फुलांचे हार हेसुद्धा पुणे येथून मागवले जाते. महाराष्ट्राच्या संस्कृतीप्रमाणे गणराय आणि गौरीची प्रतिष्ठापना केली जाते. गौरीची तीन दिवस तर गणरायाची अकरा दिवस मनोभावे पूजा केली जाते. सिंगापूर सारख्या प्रगत देशांमध्ये शितोळे दांपत्याने गेल्या आठ वर्षापासून राबवलेल्या या ’गणपती बाप्पा मोरया’ च्या जयघोषाने वर्षातील अकरा दिवस फार मोठ्या प्रमाणावर ऊर्जा मिळते असे ते स्वतः सांगतात. गणपतीच्या आरतीमध्ये ते स्वतः सहभागी होतात. एवढेच नव्हे तर गणरायाच्या आरती साठी सिंगापूरमधील अत्यंत प्रसिद्ध व्यक्ती उपस्थिती लावतात. उद्योजक, डॉक्टर, वकील, कलाकार यांचा त्यामध्ये समावेश असतो.

शितोळे दाम्पत्यांना राणा जयराज (वय 5 वर्ष), तुळजा (वय अडीच वर्ष) आणि जिवाजी (वय आठ महिने) अशी तीन मुले आहेत. सिंगापूर सारख्या प्रगत देशांमध्ये मराठी संस्कृतीचे जतन करत शितोळे दांपत्याने आपल्या तीन मुलांपुढे मराठी पाऊल पडते पुढे असा एक आदर्श घालून दिल्याचे मानले जाते. 


मन उधाण वार्‍याचे....
आज महाराष्ट्रातील देशातील विविध राज्यातील अनेक जण व्यवसाय व नोकरी निमित्त परदेशात वास्तव्य करीत आहेत. आपापले व्यवसाय आणि नोकरी करीत असताना ते प्रत्येक मराठी सण साजरे करीत असतात. कधी वैयक्तिक तर कधी समूहाने असे त्याचे स्वरूप असते. महाराष्ट्रामध्ये गणेशोत्सव, दिवाळी, दसरा या मराठी सणांना अनन्य साधारण महत्त्व आहे. यापैकी सर्वात प्रेरणा आणि उर्जा देणारा सण म्हणजे गणेशोत्सव. महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिक जगाच्या कोणत्याही कानाकोपर्यात असला तरी तो गणरायापुढे नतमस्तक होतोच. विघ्नहर्ता गणराया ही एक शक्ती आहे. त्यामुळे गणेशोत्सव आला की त्याप्रती आमचे मन उधाण वार्‍याचे अशी अवस्था होऊन जाते.
                                                                   - नकुलराव शितोळे, सिंगापूर.


 मराठी मुलांप्रति खूप अभिमान
मराठी मुले महाराष्ट्रात किंबहुना आपल्या भारत देशात शिक्षण, उच्च शिक्षण घेऊन परदेशांमध्ये नोकरी आणि व्यवसायामध्ये स्थिरस्थावर होत आहेत. करिअरमध्ये यशस्वी होत आहेत. याबद्दल अभिमान वाटतो किंबहुना त्यापेक्षा जास्त अभिमान महाराष्ट्रातील मुले परदेशात राहूनही मराठी संस्कृतीचे जतन करतात. प्रत्येक सण मनोभावे साजरा करतात याचा अभिमान खूप जास्त वाटतो. आज मराठी व्यक्ती जगाच्या कोणत्याही कानाकोपर्यात गेला तरी त्याठिकाणी तो मराठी संस्कृतीचा झेंडा अटकेपार फडकवत असतो. यापेक्षा आणखी मोठा कोणताही आनंद असू शकत नाही.
                                                                       - अमर जाधव, सातारा.