‘कोरोनाचा संसर्ग वाढत असला तरी लोकांनी स्वत:ला शिस्त लावून घेतल्यास या संकटावर मात करणे अवघड नाही. ग्रामस्तरावर लोकांनी स्वत:हून पुढाकार घेतल्यास संसर्गाची चेन ब्रेक होण्यास मदत होईल. परंतु, हे काम करत असताना कोणी गावचे राजकारण पुढे आणू नका, असे करणार्याला पाप लागेल,’ असे मत खटावचे तहसीलदार किरण जमदाडे यांनी व्यक्त केले.
‘जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर रुग्ण उपचारापासून वंचित राहणार नाही, यासाठी जिल्ह्यातील आरोग्य सुविधा वाढवाव्यात तसेच ज्या रुग्णांना ऑक्सिजनची गरज आहे, असा रुग्ण ऑक्सिजनपासून वंचित राहणार याची खबरदारी घ्यावी,’ अशा सूचना विधान परिषदेचे सभापती ना. रामराजे नाईक-निंबाळकर यांनी केल्या.
‘जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. वाढत्या कोरोना संसर्गावर मात करण्यासाठी व्यापारी, किराणा दुकानदार, भाजी विक्रेते यांना टेस्ट करून घेऊनच दुकानात बसावे, अशा टेस्ट करण्यासाठी प्रशासनाकडून मिशन मोडवर काम केले जावे तसेच लस देण्याचा वेग वाढवावा,’ अशा सूचना पालकमंत्री ना. बाळासाहेब पाटील यांनी केल्या.