sports

सुविधा उपलब्धतता, बेड वाढविण्याबाबत तत्काळ कार्यवाही करा

ना. रामराजे नाईक-निंबाळकर : सातारा जिल्हा कोरोना संसर्गाबाबत घेतला आढावा

‘जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्‍वभूमीवर रुग्ण उपचारापासून वंचित राहणार नाही, यासाठी जिल्ह्यातील आरोग्य सुविधा वाढवाव्यात तसेच ज्या रुग्णांना ऑक्सिजनची गरज आहे, असा रुग्ण ऑक्सिजनपासून वंचित राहणार याची खबरदारी घ्यावी,’ अशा सूचना विधान परिषदेचे सभापती ना. रामराजे नाईक-निंबाळकर यांनी केल्या.

सातारा : ‘जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्‍वभूमीवर रुग्ण उपचारापासून वंचित राहणार नाही, यासाठी जिल्ह्यातील आरोग्य सुविधा वाढवाव्यात तसेच ज्या रुग्णांना ऑक्सिजनची गरज आहे, असा रुग्ण ऑक्सिजनपासून वंचित राहणार याची खबरदारी घ्यावी,’ अशा सूचना विधान परिषदेचे सभापती ना. रामराजे नाईक-निंबाळकर यांनी केल्या.

कोरोना प्रतिबंधक उपाययोजना बैठक विधान परिषदेचे सभापती ना. रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली कोरेगाव पंचायत समितीच्या सभागृहत संपन्न झाली. यावेळी त्यांनी सूचना केल्या. 

या बैठकीला पालकमंत्री ना. बाळासाहेब पाटील, गृहराज्यमंत्री ना. शंभूराज देसाई, खा. श्रीनिवास पाटील, आ. शशिकांत शिंदे, आ. महेश शिंदे, आ. दीपक चव्हाण, जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, उपविभागीय अधिकारी ज्योती पाटील, तहसीलदार अमोल कदम, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता जिल्ह्यात बेडची संख्या वाढवा, अशा सूचना करून रामराजे म्हणाले, ‘18 वर्षांपुढील युवकांसाठी 1 मे पासून लसीकरणाची मोहीम राबविण्यात येणार आहे, ही मोहीम कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्ह्यात प्रभावीपणे राबवा, अशा सूचनाही त्यांनी या बैठकीत केल्या.

पालकमंत्री ना. पाटील म्हणाले, ‘लसीकरणाची मोहीम प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे. तसेच वाढती रुग्णांची संख्या पाहता आरोग्य सुविधा वाढण्यावर भर देण्यात येत आहे. जिल्हा क्रीडा संकुलातील बॅडमिंटन हॉलमध्ये 78 बेडचे कोविड सेंटरचे काम सुरू असून, हे कोविड सेंटर येत्या दोन ते तीन दिवसांत सुरू करण्यात येणार आहे. तसेच रुग्णांची वाढती संख्या पाहता रेमडेसिवीर औषधाचा अधिकचा पुरवठा जिल्ह्याला व्हावा यासाठीही प्रयत्न करीत आहोत. ग्रामीण भागातील नागरिक कोरोनाची लक्षणे असूनही घरातच उपचार घेत असून, शेवटच्य क्षणी ते रुग्णालयात येत आहेत. त्यामुळे मृत्युचे प्रमाण वाढले आहे.  हे मृत्युचे प्रमाण कमी करण्यासाठी घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्यात येणार आहे, यासाठी शिक्षकांच्या नेमणुकाही करण्यात येणार असल्याचे पालकमंत्री पाटील यांनी बैठकीत सांगितले.

शासनाने कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर जे निर्बंध घातले आहेत, त्याची जिल्ह्यामध्ये कडक अंमलबजावणी करण्याच्या सूचना पोलीस विभागाला दिल्याचे गृहराज्यमंत्री ना. देसाई यांनी या बैठकीत सांगितले.

या बैठकीमध्ये खा. श्रीनिवास पाटील, आ. शशिकांत शिंदे, आ. महेश शिंदे, आ. दीपक चव्हाण यांनीही उपयुक्त अशा सूचना केल्या.