sports

दहिवडी कॉलेजमध्ये रक्तदान शिबिर संपन्न

शिबिराच्या यशस्वितेसाठी प्राध्यापक व एनएसएसच्या स्वयंसेवकांनी घेतले परिश्रम

रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, माजी केंद्रीय कृषिमंत्री खा. शरद पवार यांच्या 80व्या वाढदिवसानिमित्त दहिवडी कॉलेज व अक्षय रक्तपेढी, सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न झाले.

बिदाल : रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, माजी केंद्रीय कृषिमंत्री खा. शरद पवार यांच्या 80व्या वाढदिवसानिमित्त दहिवडी कॉलेज व अक्षय रक्तपेढी, सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न झाले.

या रक्तदान शिबिराचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. बी. एस. बळवंत यांच्या उपस्थितीमध्ये माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष, नंदकुमार खोत व महात्मा गांधी विद्यालय व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य डॉ. बी. एस. खाडे यांच्या हस्ते झाले.

राष्ट्रीय छात्र सेना व राष्ट्रीय सेवा योजनेच्या  स्वयंसेवकांनी यामध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवत हे शिबिर चांगल्या प्रकारे पार पाडण्यास फार मोठा हातभार लावला. रक्तदान शिबिरास अनेक मान्यवरांनी भेटी दिल्या. यामध्ये दहिवडी पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक प्रमोद दीक्षित यांनी उपस्थिती दर्शवत रक्तदात्यांचा उत्साह वाढवला. तसेच तरुणाईही यामध्ये मोठ्या संख्येने सहभागी झाल्याचे चित्र दिसत होते. 

हे रक्तदान शिबिर पार पाडण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. बी. एस. बळवंत तसेच ज्युनिअर कॉलेजचे पर्यवेक्षक प्रा. टी. एस. माने, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. के. एस. शिंदे व प्रा. कायंदे  त्याचप्रमाणे जिमखाना विभागाचे ज्युनिअर कॉलेज क्रीडा विभागप्रमुख प्रा. अमर जाधव, सीनियर कॉलेज क्रीडा विभागप्रमुख प्रा. यू. ई. शिंदे आदींनी नियोजनाची जबाबदारी स्वयंसेवकांच्या साथीने पार पाडली.

एक हात मदतीचा या वाक्याला सार्थ ठरवत या रक्तदान शिबिरात विद्यार्थ्यांच्या साथीनेच प्राध्यापकही सक्रिय सहभाग नोंदवताना दिसले. 

शिबिराच्या वेळी राज्यशास्त्र विभागप्रमुख प्रा. भारती पाटील, प्रा. मांजरे, ज्युनिअर कॉलेजचे राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. लोहार, इंग्रजी विभागाचे प्रा. डॉ. एन. डी. लोखंडे, अर्थशास्त्र विभागाचे प्रा. टोने उपस्थित होते.