sports

कोरोना नियंत्रणासाठी सर्व यंत्रणांनी प्रभावीपणे काम करावे 

शेखर सिंह यांच्या सूचना : कोरोना संसर्गाबाबत आढावा बैठक संपन्न

‘जिल्ह्यात कोरोना संसर्ग रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. सर्व यंत्रणांनी कोरोना संसर्ग रुग्णांचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रभावीपणे काम करावे,’ अशा सूचना जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केल्या.

सातारा : ‘जिल्ह्यात कोरोना संसर्ग रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. सर्व यंत्रणांनी कोरोना संसर्ग रुग्णांचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रभावीपणे काम करावे,’ अशा सूचना जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केल्या.

कोरोना संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव नियंत्रणासाठी उपाययोजना राबविण्याबाबतची बैठक स्व. यशवंतराव चव्हाण बहुद्देशीय सभागृहात जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी ते बोलत होते. 

या बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी सुनील थोरवे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये आदी उपस्थित होते.

सध्या ग्रामीण भागात कोरोना संसर्गाचे रुग्ण वाढत आहेत, हे कमी करण्यासाठी ग्राम दक्षता समिती केंद्रस्थानी ठेवून प्रभावीने कार्यान्वित करा. मंगल कार्यालय, रेस्टॉरंट, मोकळ्या जागते लग्न समारंभ होत आहे. या समारंभांमध्ये शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन होते का, हे पाहावे. जेथे नियमांचे पालन होत नाही तेथे कारवाई करावी. ज्या भागामध्ये 15 पेक्षा जास्त कोरोना संसर्गाचे रुग्ण आढळले तर त्या ठिकाणी सूक्ष्म कंटेन्मेट झोन जाहीर करावा. 

खासगी डॉक्टरांकडे कोरोनाची लक्षणे असलेले रुग्ण जातात, त्यांनी तत्काळ रुग्णालयात कोरोना टेस्ट करून घेण्याविषयी सांगावे. या संदर्भात  प्रत्येक तहसीलवर खासगी डॉक्टरांची बैठक घ्यावी. जो मास्क घालणार नाही त्याच्यावर दंडात्मक कारवाई करावी, ही मोहीम प्रभावीपणे राबवावी. हॉटेल चालकांना 50 टक्के ग्राहकांच्या अटीवर हॉटेल सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे, याचे पालन करतात का व वेळेचे बंधन पाळतात का यावर पोलीस विभागाने लक्ष ठेवावे. जे रुग्ण गृह विलगीकरणात आहेत, ते रुग्ण प्रशासनाने घालून दिलेले नियम पाळतात का, यावर आरोग्य विभागाने लक्ष द्यावे. कोणी नियम पाळत नसेल तर त्याला संस्थात्मक विलगीकरणात दाखल करावे, अशा सूचनाही जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी बैठकीत दिल्या.

या बैठकीला सर्व प्रांताधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, नगरपालिकांचे मुख्याधिकारी तसेच आरोग्य विभागातील अधिकारी उपस्थित होते.