‘बचतगटा’च्या माध्यमातून महिलांना स्वयंपूर्ण करणार्या ‘शीतलताई’..!
विंगच्या महिलेची प्रेरणादायी कहाणी : महिलांच्या कलागुणांना दिला वाव; बचतगटातून राबवताहेत विविध उपक्रम...
‘त्यांना’ ‘बचती’चं ‘बाळकडू’ लहानपणीच मिळालं अन् तीच ‘बचत’ आता त्यांची सवय झालीय. त्याच ‘बचती’च्या संकल्पनेतून ‘त्यांनी’ ग्रामीण भागात एक नव्हे तर चक्क चार ‘महिला बचत गटां’ची स्थापना करून महिलांचं एक नवीन जाळं विणलंय. याच बचतगटाच्या माध्यमातून ‘त्या’ नवनवीन उपक्रम राबवून महिलांच्या कलागुणांना वाव देत ‘त्यांना’ स्वयंपूर्ण/आत्मनिर्भर करताहेत...त्याच ‘शीतल’ताईंच्या प्रेरणादायी कहाणीवर 8 मार्च ‘जागतिक महिला दिना’च्या पूर्वसंध्येला टाकलेली ही अल्पशी नजर...
विकी जाधव
सातारा : ‘त्यांना’ ‘बचती’चं ‘बाळकडू’ लहानपणीच मिळालं अन् तीच ‘बचत’ आता त्यांची सवय झालीय. त्याच ‘बचती’च्या संकल्पनेतून ‘त्यांनी’ ग्रामीण भागात एक नव्हे तर चक्क चार ‘महिला बचत गटां’ची स्थापना करून महिलांचं एक नवीन जाळं विणलंय. याच बचतगटाच्या माध्यमातून ‘त्या’ नवनवीन उपक्रम राबवून महिलांच्या कलागुणांना वाव देत ‘त्यांना’ स्वयंपूर्ण/आत्मनिर्भर करताहेत...त्याच ‘शीतल’ताईंच्या प्रेरणादायी कहाणीवर 8 मार्च ‘जागतिक महिला दिना’च्या पूर्वसंध्येला टाकलेली ही अल्पशी नजर...
सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील एका सर्वसामान्य कुटुंबात 4 ऑक्टोबर 1981 रोजी ‘शीतल’ताईंचा जन्म झाला. वडील सामान्य शेतकरी तर आई गृहिणी. ‘शीतल’ताईंचं पहिली ते चौथीपर्यंतचं शिक्षण वाईतील महिला समाज विद्यामंदिरात झाले. तर 5 वी ते 10 वीपर्यंतचं शिक्षण कन्या शाळेत पूर्ण केले. पुढे त्यांचे 11 वी ते बी. ए. भाग-दोन पर्यंतचे शिक्षण किसनवीर महाविद्यालयात झाले.
दरम्यानच्या काळात त्यांनी अनेक कलाकौशल्य आत्मसात केली. काही कलावधीनंतर त्यांचं खंडाळा तालुक्यातील ‘विंग’ गावातील भरत महांगरे यांच्याशी लग्न झाले. त्यानंतर त्या प्रथमच शहरी भागातून ग्रामीण भागात आल्यानं त्यांना येथील वातावरण नवीन वाटू लागलं. तसेच त्यांच्या अंगी कला व शिक्षणाची सोबत होतीच; पण या ग्रामीण भागात नेमकं करायचं काय?, हा प्रश्न त्यांना सतावत राहिला.
त्यानंतर त्यांनी पती व सासू-सासर्यांशी चर्चा करून घरीच एका छोट्या रुममध्ये ‘पार्लर’ सुरू करण्याचं ठरवलं. नंतर ‘पार्लर’च्या उभारणीसाठी त्यांच्या यजमानांनी भांडवल उपलब्ध करून दिलं. हळूहळू त्यांच्या ‘पार्लर’चा जम बसत गेला. ‘पार्लर’मध्ये महिलांचं येणं-जाणं सुरू झालं. दरम्यानच्या काळात तेथे येणार्या महिलांच्या बोलण्या-चालण्यावरून ‘शीतल’ताईंना त्या महिलांच्या सामाजिक, कौटुंबिक व आर्थिक अडचणी समजू लागल्या. मुळात त्या अडचणी सोडवण्यासाठी ‘शीतल’ताईंसमोर अनेक पर्याय होते.
परंतु, त्यांनी लहानपणीच बाळकडू मिळालेल्या ‘बचतगटा’तूनच महिलांच्या अडचणी सोडवण्याचा पर्याय निवडला. नंतर त्यांनी समाजातील काही निवडक अनुभवी व्यक्तींकडून महिला बचत गटाची पुरेपूर माहिती मिळवून बचत गटाची स्थापना करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्यांनी ‘पार्लर’मध्ये येणार्या प्रत्येक महिलेला ‘महिला बचत गटा’ची संकल्पना समजून सांगितली.
या गटाच्या माध्यमातून तुमच्या अनेक अडचणी सुटतील. तुम्ही स्वत:च्या पायावर उभे राहून नवीन व्यवसाय करू शकाल, असा विश्वास त्यांनी महिलांमध्ये निर्माण केला. काही कालावधीनंतर त्यांनी 2010 मध्ये पहिल्या ‘भावना’ या महिला बचत गटाची स्थापना केली. प्रारंभी त्यांनी या गटात पन्नास रुपयांपासून बचत करण्यास सुरुवात केली. नंतर त्यांनी स्वतःच या बचत गटातून कर्ज उचलून त्या पैशाचा योग्य वापर करत ते कर्ज वेळेत फेडलेही. त्यामुळे झाले असे की, कर्ज उचलणे व फेडणे ही संकल्पना गटातील महिलांना समजली. पुढे हा बचतगट जसा प्रगतिपथावर येऊ लागला तसा ‘शीतल’ताईंनी 2016 मध्ये ‘श्री रसाई देवी’ नावाच्या दुसर्या महिला बचतगटाची स्थापना केली. या गटात प्रामुख्याने ज्येष्ठ व तरुण महिलांचा समावेश आहे. नंतर त्यांनी 2017 मध्ये ‘दत्ताई’ या तिसर्या महिला बचतगटाची स्थापना केली, यात मुख्यतः तरुण उद्योजिका महिलांचा समावेश आहे.
या गटाच्या माध्यमातून महिलांना उद्योग-व्यवसायासाठी कर्ज दिले जाते. त्याचबरोबर त्यांनी 2018 मध्ये ‘आत्मां’तर्गत ‘कृषिकन्या’ या चौथ्या महिला बचतगटाची स्थापना केली. यात विंग गावातील शेतकरी महिलांचा समावेश आहे. या गटातील महिला ‘आत्मा’च्या विविध शेतीविषयक योजनेतून सध्या आधुनिक पद्धतीने शेती करताहेत.

मुख्यत: ‘शीतल’ताईंनी स्थापन केलेल्या बचतगटांच्या मीटिंग या कोविड काळापूर्वी दर महिन्याला प्रत्येक महिलेच्या घरी व्हायच्या. संबंधित महिलेच्या घरी मीटिंग आयोजित केली आहे, त्या महिलेला गटातील महिलांचा पाहुणचार केल्याबद्दल समाधान वाटायचे. त्याचबरोबर शीतलताईंनी बचतगटाच्या माध्यमातून दर महिन्याला 100 ते 200 रु. बचत करण्याचे ठरवले. याला सर्व महिलांची संमती होती.
तसेच गटातील महिलांना कर्ज वाटप करताना शीतलताईंनी पारदर्शक व्यवहार करण्यास सुरुवात केली. त्याचबरोबर हे चारही बचतगट सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेशी संग्लन असल्याने या गटांचा व्यवहार आणखी पारदर्शकपणे होण्यास मदत होतेय.
अशाप्रकारे शीतलताईंनी स्वतः स्वयंपूर्ण होत, विंग गावातील अनेक महिलांना बचतगटाच्या माध्यमातून स्वयंपूर्ण केलं, समाजात त्यांना एक वेगळी प्रतिष्ठा मिळवून दिली. मुख्यतः त्यांनी बचतगटात देवाणघेवाण व्यवहार पैशाचा न ठेवता विचारांचा ठेवला. यातूनच त्यांची महिलांविषयी असणारी तळमळ दिसून येते. तसेच त्यांनी महिलांच्या उन्नतीसाठी केलेल्या विधायक कार्याची अनेक सामाजिक संस्थांनी देखील दखल घेत त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित केलंय. अशा या ‘शीतल’ताईंच कार्य खरंच इतर महिलांसाठी प्रेरणादायी व त्यांच्या पंखांना बळ देणारं आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही..!
सहिलींमध्ये महिलांनी केली मौज-मस्ती..
शीतलताईंनी विंग सारख्या ग्रामीण भागात बचतगट स्थापन करून महिलांच्या कलागुणांना वाव तर दिलाच; पण महिलांना दैनंदिन कामातून मोकळीक मिळावी, त्यांनी एक-दोन दिवस का असेना मनासारखं जीवन जगावं यासाठी महिला बचतगटाच्या माध्यमातून विविध धार्मिक ठिकाणी सहलींचं आयोजन करून त्यांच्या जगण्याला एक नवी दिशा दिली. त्यामुळं महिलांना मनासारखी मौज-मस्ती करता आली.
बचतगटाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवून महिलांचे सक्षमीकरण
शीतलताई महांगरे या महिला बचतगटांच्या माध्यमातून सर्व सण-उत्सव पारंपरिक पद्धतीने साजरे करणे, आरोग्य शिबिर, शिवणकला शिबिर, तरुणींसाठी योगा शिबिराचे आयोजन तसेच वृक्षसंवर्धनासाठी विविध ठिकाणी वृक्षारोपण, महिलांच्या कौटुंबिक जीवनातील अडचणी सोडवणे आदी समाजोपयोगी उपक्रम राबवून त्या महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करताहेत.
‘आई’कडूनच मिळालं ‘बचती’चं बाळकडू..!
खरं सांगायचं म्हटलं तर माझ्या आजपर्यंतच्या प्रवासात ‘आई’ हेच माझं प्रेरणास्थान आहे. तिच्याकडून मी प्रत्येक गोष्ट शिकत गेले. संकटकाळी न डगमगता त्या संकटाचा धैर्यानं सामना करण्याची ऊर्जा मला आईकडूनच मिळाली. तसेच आज ग्रामीण भागात बचत गटांचं जे जाळं विणलंय ‘त्या’ ‘बचती’चं बाळकडू ही आईकडूनच मिळालं. त्यामुळं आज सर्व बचत गटांचं कार्य सुरळीतपणे सुरू आहे.
- शीतल भरत महांगरे, विंग, ता. खंडाळा.


