sports

माणचे प्रशासन कोरोना सेंटर सुरू करण्यास दिरंगाई का करतेय?

उपजिल्हाप्रमुख संजय भोसले यांचा टोला 

माण तालुक्यात कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचा कहर सुरू असून, सामान्य रुग्णांना बेड मिळणे फार जिकिरीचे होऊन बसले आहे. जनतेसाठी ब्रम्हचैतन्य देवस्थान गोंदवले या ट्रस्टने उदारहेतूने चैतन्य रुग्णालयात कोविड सेंटर सुरू करण्यासाठी ते रुग्णालय शासनाकडे हस्तांतरित करून दिले आहे. बेडसाठी बाधित रुग्ण वणवण फिरत असताना माणचे प्रशासन याठिकाणी कोरोना सेंटर सुरू करण्यास दिरंगाई का करीत आहे, हे न समजणारे कोडे असल्याचा उपहासात्मक टोला शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संजय भोसले यांनी प्रशासनाला प्रसिद्धी पत्रकाद्वारे लगावला

बिजवडी : माण तालुक्यात कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचा कहर सुरू असून, सामान्य रुग्णांना बेड मिळणे फार जिकिरीचे होऊन बसले आहे. जनतेसाठी ब्रम्हचैतन्य देवस्थान गोंदवले या ट्रस्टने उदारहेतूने चैतन्य रुग्णालयात कोविड सेंटर सुरू करण्यासाठी ते रुग्णालय शासनाकडे हस्तांतरित करून दिले आहे. बेडसाठी बाधित रुग्ण वणवण फिरत असताना माणचे प्रशासन याठिकाणी कोरोना सेंटर सुरू करण्यास दिरंगाई का करीत आहे, हे न समजणारे कोडे असल्याचा उपहासात्मक टोला शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संजय भोसले यांनी प्रशासनाला प्रसिद्धी पत्रकाद्वारे लगावला आहे.

माण तालुक्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असतानाच माणचे उपविभागीय अधिकारी शैलेश सूर्यवंशी आणि तहसीलदार बाई माने हे दोघे देखील कोरोना सेंटर व रुग्णांसाठीच्या उपाययोजना करताना सतर्क व सक्रिय नसल्याचे या प्रकारावरून स्पष्ट होत आहे. ब्रम्हचैतन्य देवस्थानचे ट्रस्टी विश्राम पाठक यांनी देवस्थानकडून रुग्णांना मदत व्हावी, यासाठी दि. 20 एप्रिल 2021 रोजी देवस्थानचे चैतन्य रुग्णालय सर्व उपकरणांसहीत व अन्य 200 कॉट्स, गाद्या, बेडसिट्स ताब्यात देण्याचे लेखी कळवून देखीलही या ढिम्म प्रशासनाकडून कोणतीच कार्यवाही दिसून आली नाही. 

जनतेची अडचण लक्षात घेता विधान परिषदेच्या उपसभापती ना. डॉ. नीलमताई गोर्‍हे यांना समजताच त्यांच्या मध्यस्थितीने मी स्वत: गोंदवले येथे जाऊन या रुग्णालयाचे हस्तांतरण करताना माणचे आरोग्य अधिकारी डॉ. कोडलकर व ट्रस्टी यांना बोलावून दि. 26 एप्रिल रोजी रुग्णालयाचा प्रशासनाकडे ताबा दिला खरा, परंतु आज 29 एप्रिल 2021 अखेर गेली 9 दिवस या रुग्णालयामध्ये संबंधित निष्क्रिय अधिकार्‍यांच्या अनास्थेमुळेच कोरोना केअर सेंटर सुरू होऊ शकले नाही, हे अतिशय दु:खद व खेदजनक असून, जनतेच्या जीवाशी खेळण्याचा हा प्रकार असू शकतो.

आपण मुख्यमंत्री ना. उद्धव ठाकरे, जिल्हा प्रशासन, आयुक्त यांनी या प्रकरणांची सखोल चौकशी करावी, या मागणीची निवेदने सादर केली असून, वरिष्ठ पातळीवरून  माणच्या जनतेला कोरोना काळात दिलासा मिळावा, अशी मागणी देखील केली आहे.

जनतेचे बळी जाऊ न देता रुग्णांना न्याय व सेवा कशी देता येईल, यासाठी जिल्हाधिकारी शेखर सिंह  स्वत: पुढाकार घेऊन येथे रुग्णांना मदत व्हावी म्हणून तत्काळ कोरोना सेंटर उभे करतील काय?, हेच पाहणे आता औत्सुक्याचे ठरणार आहे.

 
गोंदवले देवस्थानला बदनाम करण्यात माणचा एक नेता?
गोंदवले येथे कोरोना सेंटर सुरू करण्यासाठी यापूर्वी संबंधितांनी केलेला अट्टाहास व त्यासाठीच नाचविलेले कागदी घोडे व उभा केलेला देखावा हा देवस्थानला बदनाम करण्याचा कुटील डाव आहे. या प्रश्‍नाबरोबरच या प्रकरणात माणमधला एक कर्ता करविता नेता असून, त्यांच्याच सांगण्यावरून देवस्थानला बदनाम करण्याचा डाव रचण्यात आला आहे. तर त्यांच्याचमुळे प्रशासन झोपेचे सोंग घेत आहे. याचा तोटा सर्वसामान्य जनतेला होताना दिसून येत आहे.
- संजय भोसले, उपजिल्हाप्रमुख, शिवसेना, सातारा.