डॉ. नीलमताई गोर्हे यांच्या प्रयत्नातून चैतन्य रुग्णालय कोविडसाठी हस्तांतरित
शिवसेना उपजिल्हाप्रमुख संजय भोसले यांची माहिती
गोंदवले बुद्रुक (ता. माण) येथील ब्रह्मचैतन्य देवस्थान ट्रस्टचे चैतन्य रुग्णालय प्रशासनाने कोविड सेंटरसाठी अधिगृहित केले होते. विधान परिषदेच्या उपसभापती व शिवसेना उपनेत्या ना. डॉ. नीलमताई गोर्हे यांच्या प्रयत्नातून देवस्थान ट्रस्टचे पदाधिकारी तसेच प्रांताधिकारी शैलेश सूर्यवंशी यांच्या सहकार्याने आज चैतन्य रुग्णालय लोकांच्या सेवेसाठी कोविड सेंटर म्हणून आरोग्य विभागाकडे हस्तांतरित करण्यात आल्याची माहिती शिवसेना उपजिल्हाप्रमुख संजय भोसले यांनी दिली.
बिजवडी : गोंदवले बुद्रुक (ता. माण) येथील ब्रह्मचैतन्य देवस्थान ट्रस्टचे चैतन्य रुग्णालय प्रशासनाने कोविड सेंटरसाठी अधिगृहित केले होते. विधान परिषदेच्या उपसभापती व शिवसेना उपनेत्या ना. डॉ. नीलमताई गोर्हे यांच्या प्रयत्नातून देवस्थान ट्रस्टचे पदाधिकारी तसेच प्रांताधिकारी शैलेश सूर्यवंशी यांच्या सहकार्याने आज चैतन्य रुग्णालय लोकांच्या सेवेसाठी कोविड सेंटर म्हणून आरोग्य विभागाकडे हस्तांतरित करण्यात आल्याची माहिती शिवसेना उपजिल्हाप्रमुख संजय भोसले यांनी दिली.
संजय भोसले म्हणाले, ‘गोंदवलेतील चैतन्य रुग्णालय कोविड सेंटर करण्यासाठी ना. नीलमताई गोर्हे यांचे विशेष प्रयत्न आहेत. प्रांताधिकारी शैलेश सूर्यवंशी यांच्याशी यासंदर्भात चर्चा करून आज देवस्थानचे ट्रस्टी विश्राम पाठक व आरोग्य अधिकारी लक्ष्मण कोडलकर यांच्यात समन्वय साधून रुग्णालय हस्तांतरित करण्यात आले.’
गोंदवले देवस्थान ट्रस्टच्या चैतन्य रुग्णालयामध्ये पहिलेच 8 ऑक्सिजन बेड व इतर 21 बेडची सोय असून, याठिकाणी 25 रुग्णांची सोय होणार आहे. या ट्रस्टने आरोग्य खात्याकडे अधिकची 200 कॉट्स, गाद्या, बेडसीट व हजारो रुग्णांच्या जेवणाची सोय व्हावी, यासाठी शिधा देण्यात येण्याचे लेखी कळवले आहे.
याप्रसंगी माण तालुका आरोग्य अधिकारी डॉ. लक्ष्मण कोडलकर, देवस्थानचे ट्रस्टी विश्राम पाठक, शिवसेना उपजिल्हाप्रमुख संजय भोसले, गोंदवले विभागाच्या नोडल अधिकारी डॉ. तांबोळी, देवस्थान ट्रस्टचे कर्मचारीही उपस्थित होते.