sports

पुसेगावात शिवसैनिकांनी महावितरणच्या वसुली अधिकार्‍यांची गाडी फोडली

वीजपुरवठा खंडित केल्याप्रकरणी केले कृत्य

कोरोना तसेच अवकाळीच्या पार्श्‍वभूमीवर पुसेगाव (ता. खटाव) सह परिसरातील सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक बजेट पूर्ण कोलमडले असतानाच महावितरणचे अधिकारी कोणतीही पूर्वकल्पना न देता ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करत आहेत. सोमवारी (ता. 15) महावितरणचे अधिकारी बोलेरो गाडीतून पुसेगाव येथे वीजतोडणीस जात असताना संतप्त शिवसैनिकांनी त्यांची गाडी फोडली. 

निढळ : कोरोना तसेच अवकाळीच्या पार्श्‍वभूमीवर पुसेगाव (ता. खटाव) सह परिसरातील सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक बजेट पूर्ण कोलमडले असतानाच महावितरणचे अधिकारी कोणतीही पूर्वकल्पना न देता ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करत आहेत. सोमवारी (ता. 15) महावितरणचे अधिकारी बोलेरो गाडीतून पुसेगाव येथे वीजतोडणीस जात असताना संतप्त शिवसैनिकांनी त्यांची गाडी फोडली. 

यावेळी गाडीत शैलेश राक्षे व इतर वसुली अधिकारी उपस्थित असतात. तसेच कुठल्याही परिस्थितीत पूर्व सूचना दिल्याशिवाय एकाही ग्राहकाचा वीज पुरवठा खंडित करू देणार नाही, असा इशारा शिवसैनिकांनी महावितरणच्या अधिकार्‍यांना दिला. 

यावेळी प्रताप जाधव म्हणाले, येथील नागरिक, व्यावसायिक, शेतकरी लॉकडाऊन तसेच अवकाळीच्या संकटातून सावरत असतानाच महावितरणने थकीत वीज ग्राहकांना कोणतीही पूर्व सूचना न देता अरेरावीची भाषा वापरत वीज तोडणीचा कार्यक्रम राबविण्यास सुरुवात केली आहे. 

महावितरणने ग्राहकांना वीज बील भरण्यासाठी किमान दोन दिवसांची मुदत तरी द्यावी. तसेच गोर-गरीब जनतेवर अरेरावी व दमदाटीच्या भाषेचा वापर करू नये. ग्रामीण भागातील आर्थिक परिस्थिती पाहता राज्य सरकारने दुष्काळी भागातील वीज तोडणीबाबत वेगळा निकष लावून दुष्काळी भागातील जनतेला न्याय द्यावा, अशी मागणी देखील यावेळी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली.

दरम्यान, महावितरणने आपल्या कारभारात सुधारणा न करता, तसेच पूर्वकल्पना न देता अरेरावीची भाषा वापरत एका जरी ग्राहकाची वीज तोडणी केली तर शिवसेना याचा तीव्र विरोध करेल, अशी माहिती जाधव यांनी यावेळी दिली.