कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासनाने कठोर भूमिका घ्यावी
शेखर सिंह यांचे आवाहन : कोरेगाव तालुक्यातील कोरोनाचा घेतला आढावा
कोरेगाव तालुक्यात कोरोनाचा प्रसार वेगाने होत असून, त्याला रोखणे सर्वांचे कर्तव्य आहे. प्रशासकीय अधिकार्यांनी कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर भर द्यावा, त्याचबरोबर बाजारपेठेतील वाढत्या गर्दीला आवर घालणे आवश्यक आहे. गर्दी टाळण्यासाठी थेट कारवाई करा, दंडात्मक कारवाईवर जोर द्यावा,’ असे आदेश जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिले.
कुमठे : ‘कोरेगाव तालुक्यात कोरोनाचा प्रसार वेगाने होत असून, त्याला रोखणे सर्वांचे कर्तव्य आहे. प्रशासकीय अधिकार्यांनी कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर भर द्यावा, त्याचबरोबर बाजारपेठेतील वाढत्या गर्दीला आवर घालणे आवश्यक आहे. गर्दी टाळण्यासाठी थेट कारवाई करा, दंडात्मक कारवाईवर जोर द्यावा,’ असे आदेश जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिले.
कोरेगाव तालुक्यातील कोरोनाचा आढावा घेण्यासाठी गुरुवारी दुपारी जिल्हाधिकारी प्रांताधिकारी कार्यालयात आले होते, त्यावेळी प्रशासकीय अधिकार्यांच्या बैठकीत त्यांनी सूचना दिल्या.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, जिल्हा पोलीस प्रमुख अजयकुमार बन्सल, प्रांताधिकारी ज्योती पाटील, पोलीस उपअधीक्षक गणेश किंद्रे, तहसीलदार अमोल कदम, गटविकास अधिकारी क्रांती बोराटे, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. युवराज करपे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र जाधव, डॉ. संजय चिवटे, मुख्याधिकारी विजया घाडगे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
कोरेगाव तालुक्यात कोरोना रुग्णांच्या वाढीचा वेग अन्य तालुक्यांपेक्षा जास्त आहे. महसूल प्रशासनासह अन्य विभागांनी जबाबदारी न झटकता राष्ट्रीय कर्तव्य म्हणून काम करणे अभिप्रेत आहे. बाजारपेठेत होणारी गर्दी आणि विना मास्क फिरत असलेल्या लोकांमुळे कोरोनाचा प्रसार होत आहे, त्यामुळे नगरपंचायतीसह ग्रामपंचायतीने कठोर कारवाईला सुरुवात केली पाहिजे. विना मास्क फिरणार्यांबरोबरच शासनाच्या नियमांचे उल्लंघन करणार्यावर दंडात्मक कारवाई झालीच पाहिजे, त्यासाठी कोणाचाही मुलाहिजा ठेवू नका, अशी सूचना शेखर सिंह यांनी दिल्या.
येत्या 28 तारखेला विवाह मुहूर्तांची संख्या जास्त आहे, त्यामुळे तातडीने शासकीय नियमांच्या आधारे मंगल कार्यालये, हॉटेल्स यांना नोटीसा बजावा, त्यांनी नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई करा, कोणत्याही परिस्थितीत नियमांचे पालन झालेच पाहिजे, विवाह सोहळ्यावेळी पाहणी करण्यासाठी पथके तैनात करा, परवानगी पेक्षा जास्त लोक आढळून आल्यास तात्काळ कारवाई करा, अशा सूचना त्यांनी दिल्या.
यावेळी विनय गौडा यांनी पंचायत समिती आणि ग्रामपंचायत स्तरावरील आढावा तर अजयकुमार बन्सल यांनी पोलीस दलाच्या कामगिरीचा आढावा घेतला. पोलीस ठाण्यांच्या प्रभारी अधिकार्यांसह मुख्याधिकार्यांनी आजवर केलेल्या दंडात्मक कारवाईचा आढावा सादर केला. कोरेगाव तालुक्यात घेण्यात येत असलेली खबरदारी, करण्यात आलेली कारवाई याबाबतची माहिती ज्योती पाटील, गणेश किंद्रे, अमोल कदम, डॉ. युवराज करपे, डॉ. राजेंद्र जाधव यांनी दिली.