जिल्हा नियोजनच्या निधीतून प्रत्येक पोलीस स्टेशनला नवीन वाहन देण्यात आले आहे. विविध प्रकारची 24 वाहने आणि 48 मोटारसायकली यांच्यामुळे जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यास मोठी मदत होणार आहे. जिल्हा नियोजन निधीमधून पोलीस विभागासाठी वाहने खरेदी करण्यात आली आहेत. ही वाहने पोलीस विभागाला पालकमंत्री ना. बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आली.
‘राज्यासह जिल्ह्यात दुसर्या लाटेत कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा क्रीडा संकुलातील बॅडमिंटन हॉलमध्ये सातारा जिल्हा कोविड रुग्णालय सुरू करण्यात आले आहे. या रुग्णालयात 78 ऑक्सिजन बेड असून कोरोना रुग्णांवर उपचार होणार आहे. रुग्णांना यामुळे निश्चितच एक दिलासा मिळणार आहे,’ असे प्रतिपादन पालकमंत्री ना. बाळासाहेब पाटील यांनी केले.
कोरोनाने सर्वत्र हाहाकार उडाला असून, ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे रुग्णांचे हाल होत आहेत. रुग्णालयात ऑक्सिजन मिळत नसल्याने रुग्ण दगावत आहेत. या गंभीर परिस्थितीवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पुढाकार घेतला असून, त्यांच्या माध्यमातून मेढा येथील ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजन निर्मिती प्लांट उभा राहणार आहे. या प्लांटसाठी आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी स्वतःच्या आमदार फंडातून निधी उपलब्ध करून दिला असून, लवकरच या प्लांटच्या उभारणीस प्रारंभ होणार आहे.
कोरोनामुळे मृत झालेल्या व्यक्तींच्या अंत्यसंस्कारावरील प्रत्यक्ष खर्च आणि सातारा पालिकेने काढलेल्या बिलात तफावत आहे. प्रत्येक मृत व्यक्तीमागे दोन हजार जादा खर्च होत असून आजअखेर दीड हजारांहून जास्त मृतांवर अंत्यसंस्कार झाले आहेत. म्हणजेच जवळपास 30 लाखांचा अपहार झाला असल्याचा आरोप अमित शिंदे, बाळासाहेब शिंदे व जितेंद्र वाडकर आदींनी केला आहे.
जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 1933 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 39 बाधितांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, यांनी दिली आहे.
राज्य उत्पादन शुल्क, साताराच्या भरारी पथकाने पांडे, ता. वाई आणि नायगाव, ता.कोरेगाव येथे छापे टाकून अवैधरित्या दारू विक्रीच्या बाटल्या व दोन कार असा एकूण अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
सैदापूर, ता. सातारा येथे तुंबलेल्या गटाराच्या सफाईचे काम थांबवण्याच्या कारणावरून महिला ग्रामपंचायत सदस्येला मारहाण केल्याप्रकरणी दोघांवर सातारा तालुका पोलीस गुन्हा दाखल झाला आहे. सुधाकर गोविंद थोपटे व जावेद शौकत चावडीवाले रा. दोन्ही सैदापुर, ता. जि. सातारा अशी दोघांची नावे आहेत.
जिल्ह्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने दिलेले आदेश धाब्यावर बसवणार्या सातार्यातील दोन व्यापार्यांवर शाहूपुरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. राहुल बाळासो पवार वय 27 वर्षे रा. यवतेश्वर ता. जि. सातारा आणि संतोष किसन जाधव वय -45 वर्षे रा अंबवडे, ता. सातारा अशी त्यांची नावे आहेत.
दरे तर्फ परळी येथील महादेव गोविंद तुपे यांचे घर डोंगराला लागलेल्या वणव्याच्या आगीत जळून खाक झाले आहे. यामध्ये दोन कडब्याच्या गंजी तसेच गोठ्यात बांधलेल्या तीन गाई भाजून जखमी झाल्या होत्या. त्यातील दोन गाई मृत झाल्या आहेत. या आगीमध्ये मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसानही झाले आहे.
लोणंद येथील पोलाद निर्मिती करणार्या सोना अलॉज कंपनीतील बंद असलेला ऑक्सिजन प्लांट कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा सुरू करण्यात आला.