sports

रुग्ण व नातेवाइकांची धावपळ कमी करण्याचा प्रयत्न करा

आ. शशिकांत शिंदे यांचे आवाहन : वडूज येथे कोरोनाबाबत आढावा बैठक संपन्न

‘खटाव तालुक्यात दररोज सरासरी किती नवीन कोरोना रुग्ण सापडत आहेत. सद्य:स्थितीतील उपाययोजना, उपलब्ध साधन सामग्री याचा आरोग्य विभाग व प्रशासनाने रोजच्या रोज आढावा घ्यावा. तसेच रुग्ण व नातेवाइकांची इतर ठिकाणी होणारी धावपळ कमी करण्याचा प्रयत्न करावा,’ असे आवाहन आ. शशिकांत शिंदे यांनी केले.

वडूज : ‘खटाव तालुक्यात दररोज सरासरी किती नवीन कोरोना रुग्ण सापडत आहेत. सद्य:स्थितीतील उपाययोजना, उपलब्ध साधन सामग्री याचा आरोग्य विभाग व प्रशासनाने रोजच्या रोज आढावा घ्यावा. तसेच रुग्ण व नातेवाइकांची इतर ठिकाणी होणारी धावपळ कमी करण्याचा प्रयत्न करावा,’ असे आवाहन आ. शशिकांत शिंदे यांनी केले.

येथील पंचायत समिती सभागृहात तालुक्यातील कोरोना स्थितीचा आढावा बैठक झाली. याप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रदीप विधाते, तहसीलदार किरण जमदाडे, गटविकास अधिकारी रमेश काळे, सभापती जयश्री कदम, उपसभापती हिराचंद पवार, माजी सभापती संदीप मांडवे, जिल्हा परिषद सदस्या सुनीता कचरे, नंदकुमार मोरे, शिवाजीराव सर्वगोड, सदस्य संतोष साळुंखे, आनंदराव भोंडवे, रमेश उबाळे, अ‍ॅड. रोहन जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.

आ. शिंदे म्हणाले, ‘कोरोना संसर्ग वाढू लागला आहे. वाढत्या संसर्गावर मात 
करण्यासाठी शासन, प्रशासन यंत्रणेच्या वतीने प्रयत्न करण्यात येत आहेत. लोकांनी शासनाने दिलेल्या सूचनांचे पालन व नियमांची काटेकोर अंमलबजावणी करून सहकार्य करणे गरजेचे आहे. वडूज, पुसेगाव, खटाव, मायणी येथे सध्या कोविड सेंटर सुरू आहेत. मात्र, कोरोना बाधितांच्या वाढत्या संख्येमुळे जिल्हास्तरावरील कोविड सेंटरवर ताण येत आहे. त्यामुळे तालुका प्रशासनाने तालुका पातळीवरच नव्या कोविड सेंटरचा प्रस्ताव करावा. कलेढोणच्या कुटीर रुग्णालयात कोविड सेंटर सुरू करण्याबाबत कार्यवाही करावी.’ 

तालुक्याचे मुख्यालय असणार्‍या वडूज शहराच्या लोकसंख्येचा विचार करता ग्रामीण रुग्णालयातील ऑक्सिजन बेडची संख्या वाढवावी. औंध, पुसेसावळी येथे कोविड सेंटरचा प्रस्ताव करावा. पुसेगाव, खटाव येथील कोविड सेंटरला अखंडित वीज पुरवठा करावा. तालुक्यातील वाढत्या कोरोना संसर्गाला रोखण्यासाठी प्रस्ताव तयार करावा. त्यासाठी आपण जिल्हा ते राज्य पातळीवर पाठपुरावा करू. कोरोना परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी जिल्हा परिषदेच्या वतीने योग्य ती खबरदारी घेण्यात आली आहे. तसेच भविष्यकालीन उपाययोजना म्हणून पुसेगाव येथील पब्लिक स्कूल, खटाव येथे मुलांचे वसतिगृह, औंध, मायणी याठिकाणी ऑक्सिजन बेडचे नियोजन करण्यात आले आहे. 

माजी सभापती संदीप मांडवे यांनी कलेढोण येथील कुटीर रुग्णालयात कोविड सेंटर सुरू करावे, तसेच अन्य कोरोना सेंटरलाही पोलीस बंदोबस्त ठेवण्याची मागणी केली. सुनीता कचरे यांनी बुध, ललगुण भागांत वाढती कोरोना बाधितांची संख्या लक्षात घेऊन डिस्कळ येथे कोविड सेंटर सुरू करण्याची मागणी केली. 

सभापती कदम यांनी पुसेसावळीत सेंटर सुरू करण्याची मागणी केली. गटविकास अधिकारी रमेश काळे यांनी स्वागत केले. सहायक गटविकास अधिकारी नरेंद्र मेढेवार यांनी प्रास्ताविक केले. तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. युनूस शेख यांनी तालुक्यातील कोरोना स्थितीबाबत माहिती दिली.


उपाध्यक्ष, आमदारांमध्ये 60 टक्के का?
बैठकीत पुसेगाव, डिस्कळ, पुसेसावळी, कातरखटाव, मायणी, खटाव या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला. त्यामध्ये खटाव केंद्राचे लसीकरण 60 टक्के अधिक तर इतर प्रा. आ. केंद्राचे काम 35 ते 40 टक्क्याच्या आसपास असल्याची माहिती समोर आली. यावर मिश्किलपणे आ. शिंदे म्हणाले, खटावला जि. प. चे उपाध्यक्ष तथा आरोग्य कमिटीचे सभापतीपद व स्थानिक आमदार असल्याने अधिक काम झाले. त्यांच्या या प्रश्‍नावर सभागृहामध्ये खसखस झाली. मात्र, लोक जागृत असल्याचे सांगत उपाध्यक्ष प्रदीप विधाते यांनी हजरजबाबीपणा दाखवला. तर डिस्कळ येथील आढाव्यात वैद्यकीय अधिकारी डॉ. पाटील या विचारलेला मुद्दा सोडून दुसरीच उत्तरे देत असल्याचा प्रकार झाला.