sports

खटाव तालुक्यातील प्रवास धोक्याचा; वठलेली धोकादायक झाडे, झुडपे ठरताहेत मृत्यूचा सापळा

बांधकाम विभागाचे दुर्लक्ष ः संघटना आंदोलनाच्या पावित्र्यात

आपत्ती व्यवस्थापन बैठकीत खटाव प्रांताधिकारी जनार्दन कासार यांनी रस्त्याकडेला असणारी झुडपे काढण्याबाबत सूचना दिल्या होत्या. मात्र संबंधित विभागाने अजून काहीच कार्यवाही केली नसल्याचे चित्र आहे. याबाबत प्रांताधिकारी जनार्दन कासार यांना संपर्क साधला असता या संदर्भात अहवाल मागवून घेऊ तसेच प्रत्यक्षात कामास सुरुवात नसेल तर त्यांना पुन्हा एकदा या विभागाला सूचना दिल्या जातील अशी प्रतिक्रिया श्रीफ कासार यांनी दिली

खटाव तालुक्यातील रस्त्याच्या कडेला झाडे झुडपे मोठ्या प्रमाणात वाढल्याने अपघात वाढले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे ही वाढलेली झुडपे मृत्यूचे सापळे बनले असल्याने या विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे सामाजिक संघटना संतप्त झाल्या आहेत. या बाबत काही सामाजिक संघटना आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की खटाव तालुक्यातील बहुतांशी गावाला जाणार्‍या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात झुडपे वाढली आहेत. रस्त्याच्या दुतर्फा काटेरी झुडपामुळे रस्ते अरुंद झाले आहेत. या रस्त्यावरून प्रवास करत असताना वाहनधारक तसेच नागरिकांना मोठी कसरत करावी लागत आहे. या कसरतीत अनेकवेळा अपघात ही घडले आहेत तर काही जणांना जीवाला मुकावे लागले आहे. असे असतानाही या गंभीर विषयाकडे सार्वजनिक बांधकाम विभाग झोपेच्या सोंगेत असल्याच्या तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. सध्या वातावरणात बदल होत असल्याने सुसाट वारा आणि पाऊस याचा प्रत्यय ही तालुक्यातील लोक अनुभवत असतानाच काही रस्त्यावर मोठी धोकादायक वाळलेली झाडे आहेत. ही झाडे अशा वार्‍याने पडली जाण्याची दाट शक्यता आहे. या मुळे या रस्त्यावरून वाहतूक करणार्‍या वाहनधारकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. येरळवाडी - बनपुरी रस्त्यावरील मोठ्या प्रमाणात वाढलेली झुडपे ही अपघातास कारणीभूत ठरत आहेत.

याबाबत ग्रामपंचायतीचे सरपंच योगेश जाधव यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे लेखी पत्र व्यवहार ही केला आहे. मात्र संबंधित बांधकाम विभागाच्या श्री. देसाई यांनी या पत्राला कोणताच प्रतिसाद दिला नाही तर सरपंच जाधव यांनी फोन वरून संपर्क साधला असता हा विषय माझ्याकडचा नाही, मी काहीही करू शकत नाही, असें म्हणत उडवाउडवीची उत्तरे दिली असल्याचे सरपंच श्रीफ जाधव यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना सांगितले.

विशेषतः या विभागाच्या अखत्यारीत येणार्‍या काही रस्त्यांची अवस्था म्हणजे न बोलेलच बर अशी प्रतिक्रिया काहीजण व्यक्त करीत आहेत. तालुक्याचे मुख्यालय म्हणून वडूज शहराला ओळखले जाते. त्यामुळे तालुक्यातील इतर भागातून वडूज याठिकाणी शासकीय व इतर कामासाठी येणार्‍या वाहनधरकांची संख्या अधिक आहे. मात्र अशा प्रवासात येत असताना रस्त्याच्या कडेला वाढलेली झुडपे वाहनधारकांना अपघातास निमंत्रण देत आहेत. या झुडपांमुळे रस्ते अरुंद झाल्याने वाहने समोरासमोर आल्यानंतर मोठी अडचण निर्माण होत आहे. या गंभीर विषयाकडे बांधकाम विभागाने लक्ष न दिल्यास तीव्र आंदोलन करू असा इशारा खटाव पंचायत समितीचे माजी उपसभापती नाना पुजारी यांनी दिला आहे.