sports

खटाव तालुक्यातील ७१ गावांत विलगीकरण कक्ष सुरू

एकूण ८६ गावे कोरोना बाधित : प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद

खटाव तालुक्यातील गावांना विलगीकरण कक्ष सुरू करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले होते. या आवाहनाला तालुक्यातील ग्रामपंचायतींनी साथ दिली असून आता पर्यंत तालुक्यातील ८६ बाधित गावांपैकी ७१ गावात विलगीकरण कक्ष सुरू झाले आहेत. तसेच उर्वरित गावांनीही विलगीकरण कक्ष सुरू करण्याची प्रक्रिया राबविल्याची माहिती तहसीलदार किरण जमदाडे यांनी दिली. तालुक्यात कोरोना बाधित रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन तालुक्यातील प्रत्येक गावात विलगीकरण कक्ष सुरू करण्याचे आवाहन परिवीक्षाधिन प्रांताधिकारी जनार्दन कासार यांनी केले होते. त्यानुसार तहसिलदार श्री. जमदाडे यांनी याबाबत तालुक्यातील प्रत्येक गावांत विलगीकरण कक्ष सुरू करण्याबाबत सांगितले होते. प्रशासनाच्या आवाहनाला तालुक्यातील गावागावांनी चांगला प्रतिसाद दिल्याचे दिसून येत आहे. तालुक्यातील ८६ कोरोना बाधित गावांपैकी ७१ गावांत विलगीकरण कक्ष सुरू करण्यात आले आहेत. तालुक्यातील चिंचणी, ललगुण, नवलेवाडी, डिस्कळ, चोराडे, जयराम स्वामींचे वडगाव, गोरेगाव (वांगी), सातेवाडी, नायकाचीवाडी, वडूज (हुतात्मा परशुराम विद्यालय, जिल्हा परिषद शाळा क्रमांक ३), पेडगाव, वर्धनगड, पुसेगाव, शिरसवडी, गुरसाळे, अंबवडे, निमसोड, शेनवडी, बनपूरी, पळसगाव, दातेवाडी, मानेवाडी, तुपेवाडी, विखळे, बोंबाळे, कातरखटाव, तडवळे, डांभेवाडी, वेटणे, बुध, मांजरवाडी, कातळगेवाडी, खातगुण, निढळ, बेलेवाडी, पुसेसावळी, वडी, थोरवेवाडी, नागाचे कुमठे, सिद्धेश्वर कुरोली, दरूज, शास्त्रीनगर, नढवळ, हिंगणे, येरळवाडी, गोसाव्याचीवाडी, मोराळे, गुंडेवाडी, म्हासुर्णे, येरळानगर, हनुमाननगर, चितळी, जांब, जाखणगाव, विसापूर, येळीव, कोकराळे, जायगाव, भोसरे, औंध, मायणी या गावांत ग्रामस्थांनी स्वयंस्फूर्तीने विलगीकरण कक्ष सुरू केले आहेत. याशिवाय तालुक्यातील उर्वरीत काही बाधित गावांतही विलगीकरण कक्ष सुरू करण्याची प्रक्रिया सुरू आहे. विलगीकरण कक्ष सुरू करण्यात आलेल्या ठिकाणी प्रांताधिकारी श्री. कासार, तहसिलदार श्री. जमदाडे, गटविकास अधिकारी रमेश काळे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. युनूस शेख, वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष मोरे, तसेच प्रशासनाचे अधिकारी, कर्मचारी भेटी देत आहेत. कोट : श्री. किरण जमदाडे (तहसिलदार, खटाव) प्रांताधिकारी श्री. कासार यांनी तालुक्यातील नागरिकांना गावोगावी विलगीकरण कक्ष सुरू करण्याचे आवाहन केले होते. त्यास ग्रामस्थांनी चांगला प्रतिसाद दिला आहे, त्यामुळे कोरोनाला गावपातळीवरच प्रतिबंध करण्यास मोठी मदत झाली आहे. चौकट : प्रशासनातील समन्वय व नागरिकांचा प्रतिसाद महसूल विभाग, पंचायत समिती व आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी यांच्यात गावोगावी विलगीकरण कक्ष सुरू करण्यासंदर्भात चांगला समन्वय आढळून येत आहे. त्यास गावोगावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामदक्षता कमिटी तसेच गावातील मान्यवरांसह सर्वसामान्य घटकांतील नागरिकांनीही दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद कौतुकास्पद ठरत आहे.