sports

निझरे शाळेत शैक्षणिक साहित्याचे वाटप 

घणसोली बालाजी चॅरिटेबल ट्रस्टचा स्तुत्य उपक्रम

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, निझरे येथे घणसोली बालाजी चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून शाळेतील सर्व मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. 

कुडाळ : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, निझरे येथे घणसोली बालाजी चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून शाळेतील सर्व मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. 

यावेळी संस्थेचे कार्यवाह युवराज साळुंखे, राजू शेडगे, यदू शेडगे, बबन शेडगे, अनिल जाधव व इतर कार्यकर्ते उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुधाकर चिकणे हे होते.

मुख्याध्यापक अशोक दुधाणे यांनी सर्वांचे स्वागत केले. संजय धनावडे यांनी प्रास्ताविक करताना घणसोली बालाजी चॅरिटेबल ट्रस्ट व श्रीमती इंदुमती वसंतलाल शाह चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या कार्याचा आढावा विशद केला.

गेली चार वर्ष या संस्थेमार्फत जावळी तालुक्यातील अनेक शाळांमधील सर्वच विद्यार्थ्यांना शालेय शैक्षणिक साहित्य वाटप केले जात आहे. गोरगरीब मुलांना त्यांच्या शैक्षणिक वाटचालीत हातभार लावण्यासाठी या संस्थेने मोलाचे कार्य केले आहे. ज्यामुळे अनेक मुलांचा उत्साह वाढला, त्यांचे स्वाध्याय पूर्ण होऊ लागले. शाळेची गोडी वाढली परिणामी गुणवत्ता वाढली. या कार्याचे कौतुक करावे तेवढे थोडेच कारण केवळ एकाच शाळेला नव्हे तर जावळी, सातारा तालुक्यांतील किमान 100 शाळांना शैक्षणिक साहित्याचे वितरण गेली चार वर्षे केले जात आहे. 

संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दत्तात्रय बिरामणे हे निझरे गावचे सुपुत्र. सर्वसामान्य, मनमिळावू, मितभाषी व्यक्तिमत्त्व पण सर्वसामान्य व्यक्तीच असामान्य कार्य करतात हे त्यांनी त्यांच्या कार्याने सिद्ध केले. समाजाप्रती आपण काही देणे लागतो याची त्यांना जाणीव आहे. सतत समाजाचा विचार करणारे दत्तात्रय बिरामणे केवळ शैक्षणिक नव्हे तर आरोग्य, क्रीडा, सामाजिक विभागातही कार्याने श्रेष्ठ आहेत. मी, माझे कुटुंब इतकाच विचार करणार्‍या अनेकांना त्यांचे कार्य हे दीपस्तंभासारखे आहे.

घणसोली बालाजी चॅरिटेबल ट्रस्टने निझरे शाळेच्या रंगकामासाठी 20 हजार रुपये देऊन शाळेच्या शैक्षणिक उठावातही मोलाची भर घातली आहे. त्याबद्दल दत्तात्रय बिरामणे आणि त्यांच्या सर्व सहकार्‍यांचे विशेष कौतुक व आभार मानण्यात आले.