जर तुम्हाला छातीत दुखण्यासह चक्कर येत असेल तर हे संकेत चांगले नाहीत. अशा वेळी तातडीने डॉक्टरांशी संपर्क साधावा. कारण हार्ट अटॅकपूर्वी हृदयाच्या पंपिंग क्षमतेवर परिणाम होतो आणि मेंदुपर्यंत रक्तपुरवठा होत नाही. त्यामुळे काही वेळा चक्कर येणं, बेशुद्ध पडणं अशी लक्षणं दिसतात. यापैकी कोणतीही लक्षणे दिसत असतील तर तात्काळ डॉक्टरांशी संपर्क साधावा आणि उपचार सुरू करावेत.
हृदयविकार हा गंभीर स्वरुपाचा आजार आहे. बदलती जीवनशैली, व्यायाम आणि पोषक आहाराचा अभाव, वाढते ताण-तणाव आदी कारणांमुळे हृदयविकार होण्याची शक्यता अधिक असते. हार्ट अटॅक अर्थात हृदयविकाराचा झटका हा जीवघेणा मानला जातो. हृदयाशी संबंधित कोणत्याही समस्येकडं वेळेवर लक्ष दिलं नाही, तर हार्ट अटॅकची शक्यता वाढते. छातीत दुखणं, डोकेदुखीसारखी लक्षणं ही हार्ट अटॅकची देखील असू शकतात. बऱ्याचदा ही लक्षणं सामान्य समजून त्याकडे दुर्लक्ष केलं जातं.त्यामुळे वेळेत तपासणी आणि उपचार केले जात नाहीत. हार्ट अटॅकची प्रमुख चार लक्षणं कोणती असतात, ते जाणून घेऊया. `द हेल्थ साइट डॉट कॉम`ने याविषयी माहिती दिली आहे.
उत्तम आरोग्यासाठी हृदय हेल्दी राहणं गरजेचं असतं. हृदयाशी संबंधित समस्या या खूप गंभीर असतात, त्यामुळे गुंतागुंत निर्माण होऊ शकते. हृदयविकार काहीवेळा जीवघेणा ठरू शकतो. त्यामुळे त्याकडे वेळेत लक्ष देणं गरजेचं असतं. उदाहरणार्थ छातीत वेदना होणं, डोकेदुखी ही लक्षणं बऱ्याचदा संभ्रम निर्माण करतात. ही लक्षणं गॅसेसशी संबंधित आहे की हृदयविकाराशी हे लवकर समजत नाही. मात्र याशिवाय हार्ट अटॅकची अन्य काही लक्षणं असतात. या लक्षणांकडे दुर्लक्ष करणं महागात पडू शकतं. ज्या लोकांचे वजन जास्त आहे, कुटुंबात हृदयविकाराची पार्श्वभूमी आहे किंवा ज्या लोकांची जीवनशैली सेडेंटरी अर्थात बैठी असते त्यांना हार्ट अटॅक, हृदयविकाराचा धोका जास्त असतो.
खांदे किंवा मान दुखणं हे हार्ट अटॅक येण्यापूर्वीचं सामान्य लक्षण आहे. अनेकदा मान आणि खांद्यांच्या आसपास वेदना जाणवतात. छाती दुखण्यासह खांदे किंवा मानेजवळचा भाग दुखत असेल किंवा छातीपेक्षा खांदा आणि मानेत वेदना जास्त असतील तर अशी स्थिती सामान्य नक्कीच नसते. तुम्हाला अशा प्रकारचा त्रास जाणवत असेल तर तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
मळमळणं, उलट्या होणं ही देखील सामान्य समस्या आहे. सर्वसामान्यपणे पोटाशी संबंधित आजारामुळे ही लक्षणं दिसतात. पण काही वेळा हृदयविकारामुळे अस्वस्थ वाटणं, मळमळ किंवा उलटी होणं अशी लक्षणं दिसतात. काही लोकांमध्ये हार्ट अटॅक येण्यापूर्वी उलटीसारखे संकेत जाणवू लागतात. त्यामुळे छातीत वेदना होण्यासह अस्वस्थ वाटणं किंवा उलट्या होत असतील तर तातडीने डॉक्टरांशी संपर्क साधावा.
हार्ट अटॅक येण्यापूर्वी तुम्हाला छातीत दुखणं तसेच दम लागणं यासारख्या समस्या जाणवू शकतात. जेव्हा हृदय पुरेशा प्रमाणात शरीरातील विविध अवयवांना रक्तपुरवठा करू शकत नाही, तेव्हा अवयवांमधील ऑक्सिजनचं प्रमाण कमी होऊ लागते. ऑक्सिजनची कमतरता जाणवू लागताच आपलं शरीर त्यावर प्रतिक्रिया देतं आणि अधिक ऑक्सिजन घेण्यासाठी श्वासोच्छवासाचा वेग वाढवतं. या क्रियेमुळे दम लागतो.
जर तुम्हाला छातीत दुखण्यासह चक्कर येत असेल तर हे संकेत चांगले नाहीत. अशा वेळी तातडीने डॉक्टरांशी संपर्क साधावा. कारण हार्ट अटॅकपूर्वी हृदयाच्या पंपिंग क्षमतेवर परिणाम होतो आणि मेंदुपर्यंत रक्तपुरवठा होत नाही. त्यामुळे काही वेळा चक्कर येणं, बेशुद्ध पडणं अशी लक्षणं दिसतात. यापैकी कोणतीही लक्षणे दिसत असतील तर तात्काळ डॉक्टरांशी संपर्क साधावा आणि उपचार सुरू करावेत.