महाराष्ट्रात लाखो भाविक कित्येक दिवस पायी चालत त्या विठूरायाच्या दर्शनाला जातात. राज्याच्या कानाकोपऱ्यातून येणारे हे भाविक पंढरपूरला विठ्ठलाचे दर्शन मिळेपर्यंत या दिवशी अतिशय भक्तीभावाने उपवास करतात. प्रत्येकाला वारीला जायला जमतेच असे नाही. पण विठ्ठलावर असलेली भक्ती आणि मोठी एकादशी म्हणून आपण हा आषाढी एकादशीचा उपवास आवर्जून करतो. एकादशी दुप्पट खाशी असं आपल्याकडे उपहासाने म्हटलं जातं. मात्र तसं न करता तब्येतीला झेपेल असा आहार घ्यायला हवा. आता उपवास म्हटल्यावर रोजच्यापेक्षा आहारात थोडे बदल केले जातात. पण ऐन पावसाळ्यात आषाढीचा उपवास करताना आहाराबाबत काळजी घ्यायला हवी (Fasting Diet Tips). पावसाळ्यात पचनशक्ती क्षीण होत असल्याने तसेच वात किंवा गॅसेसच्या समस्यांमध्ये वाढ होत असल्याने पुरेशी काळजी घ्यायला हवी.
उपवासाच्या नावाखाली पोटाला ताण पडला तर तब्येत खराब होण्याची शक्यताच अधिक. त्यामुळे एकादशीचा उपवास करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात याविषयी पावसाळ्याच्या दिवसांत आपल्याला साधारणपणे गरम काहीतरी प्यावेसे वाटते. अशावेळी सतत चहा-कॉफी न घेता गरम दूध, आमसूलाचे सार, दाण्याची आमटी, ताकाची कढी असं काही घेता आलं तर त्याचा निश्चितच फायदा होईल. एखाद दुसरा कप चहा-कॉफी ठिक आहे पण सतत चहा कॉफी प्यायल्याने अॅसिडीटी व्हायची शक्यता जास्त असते.
१. पावसाळ्याच्या दिवसांत आपल्याला साधारणपणे गरम काहीतरी प्यावेसे वाटते. अशावेळी सतत चहा-कॉफी न घेता गरम दूध, आमसूलाचे सार, दाण्याची आमटी, ताकाची कढी असं काही घेता आलं तर त्याचा निश्चितच फायदा होईल. एखाद दुसरा कप चहा-कॉफी ठिक आहे पण सतत चहा कॉफी प्यायल्याने अॅसिडीटी व्हायची शक्यता जास्त असते.
२. उपवास हा आपल्या धार्मिक भावना जपण्यासाठी असला तरी जीवाला त्रास होईल अशा पद्धतीने उपवास करु नये. अनेक जण निर्जल किंवा काहीही न खाता पिता उपवास करतात. पोटाला आराम देण्यासाठी एक दिवस असे करणे चांगले असले तरी आपल्याला ते झेपणारे आहे ना याचा अंदाज घेऊन मगच उपवास करायला हवा. ज्यांना डायबिटीस, हृदयरोग, रक्तदाब अशा प्रकारच्या समस्या अनेक वर्षांपासून आहेत त्यांनी उपवास करताना आपल्या तब्येतीचा योग्य पद्धतीने विचार करुन मगच उपवास करावा. तब्येतीला झेपणारे नसेल तर उपवासाचा अट्टाहास नको.
३. उपवास म्हणजे साधारणपणे साबुदाणा, बटाटा, दाणे असे वातूळ पदार्थ प्रामुख्याने खाल्ले जातात. पण पावसाळ्याच्या दिवसांत आधीच पचनशक्ती क्षीण झालेली असते. त्यात गॅसेसचा त्रास होत असेल तर वातूळ पदार्थांचे प्रमाण कमी राहील असे पाहावे.
४. उपवासाला अनेकदा तळलेले वडे, चिवडा, पापड्या, वेफर्स असेही खाल्ले जाते. पण गारठ्यामुळे आपल्याला खोकला झाला असेल तर असे तळकट पदार्थ खाणे टाळावे. शक्यतो या गोष्टी घरात तळून खाव्यात कारण बाहेर कशाप्रकारचे तूप, तेल वापरतात आपल्याला माहित नसते. तसेच पावसाळ्याच्या दिवसांत बाहेरचे न खाल्लेलेच जास्त चांगले. त्यापेक्षा खजूर, राजगिऱ्याचे लाडू, सुकामेवा हे खायला हवे. याबरोबरच काकडी, रसदार फळे यांचाही आहारात समावेश वाढवायला हवा. म्हणजे उपवासाचा त्रास न होता उपवासाचा दिवस सगळ्या अर्थाने चांगला होईल.