मराठी भाषेचे आपल्यावर अनंत उपकार
प्रा. श्रीधर साळुंखे यांचे प्रतिपादन : महिला कॉलेजमध्ये मराठी भाषा गौरव दिन साजरा
‘मराठी भाषेचे आपल्यावर अनंत उपकार असून, या भाषेमुळेच अकरा कोटी मराठी जनतेला जीवनाचा आनंद घेता येत आहे, हजारो वर्षांपासून मराठी भाषेने आपली ज्ञान परंपरा जपली आहे. या भाषेचा गौरव, रक्षण व जतन करणे, हे आपले परम कर्तव्य आहे,’ असे प्रतिपादन सुप्रसिद्ध वक्ते व साहित्यिक प्रा. श्रीधर साळुंखे यांनी केले.
सातारा : ‘मराठी भाषेचे आपल्यावर अनंत उपकार असून, या भाषेमुळेच अकरा कोटी मराठी जनतेला जीवनाचा आनंद घेता येत आहे, हजारो वर्षांपासून मराठी भाषेने आपली ज्ञान परंपरा जपली आहे. या भाषेचा गौरव, रक्षण व जतन करणे, हे आपले परम कर्तव्य आहे,’ असे प्रतिपादन सुप्रसिद्ध वक्ते व साहित्यिक प्रा. श्रीधर साळुंखे यांनी केले.
येथील रयत शिक्षण संस्थेच्या सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालयात मराठी विभागाच्या वतीने आयोजित मराठी भाषा गौरव दिन समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने महाविद्यालयात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. ग्रंथालय विभागाच्या वतीने ग्रंथप्रदर्शन व मराठी स्वाक्षरी-मराठी सन्मान उपक्रम राबविण्यात आले. ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन प्रा. श्रीधर साळुंखे यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रयत शिक्षण संस्थेचे ऑडिटर व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवलिंग मेनकुदळे होते तर कला शाखेच्या उपप्राचार्या डॉ. सुनीता घार्गे व वाणिज्य शाखेचे उपप्राचार्य डॉ. तुळशीराम महानवर यांची प्रमुख उपस्थिती होती.
अध्यक्षस्थानावरून बोलताना प्राचार्य डॉ. शिवलिंग मेनकुदळे यांनी मराठी भाषा क्षेत्रातील रोजगाराच्या विविध संधींचा नव्या पिढीने लाभ घ्यावा, असे आवाहन केले. जागतिकीकरणाच्या लाटेवर स्वार होऊन ‘लोकल ते ग्लोबल’ ही पद्धत अवलंबली तर मराठी भाषा आणि संस्कृती संवर्धन होईल, असेही प्राचार्य डॉ. मेनकुदळे म्हणाले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी विभाग प्रमुख प्रा. घनश्याम गिरी यांनी केले. पाहुण्यांचे स्वागत ग्रंथालय विभागाच्या प्रमुख प्रा. आशा जिरगे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मानसशास्त्र विभाग प्रमुख प्रा. दिलीप पवार यांनी केले. प्रा. डॉ. अभिजित फटे व प्रा. श्रीमंत निकम यांनी तंत्र सहाय्य केले.
कार्यालयीन सेवक शशिकांत घोरपडे, बबन भोसले, दत्तात्रय सकटे, विलास भिसे यांनी कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रयत्न केले. प्रा. निरंजन फरांदे यांनी आभार मानले.
ग्रंथप्रदर्शनास विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद..
मराठी राजभाषा दिन व थोर साहित्यिक वि. वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त सातारा येथील रयत शिक्षण संस्थेच्या सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालयात ग्रंथालय विभागाच्या वतीने दि. 27 फेब्रुवारी रोजी ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या ग्रंथप्रदर्शनात विद्यार्थी व ग्रंथप्रेमींनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवत दुर्मीळ ग्रंथांसह, विश्वकोश, ज्ञानकोश, भारतीय संस्कृतिकोश, भारतीय सरिताकोश, विज्ञान कोश, मराठी साहित्य इतिहासाचे खंड आदींची माहिती करून घेतली.