कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता दहिवडी शहरामध्ये सलग तीन दिवसांचा लॉकडाऊन पाळण्यात आला. आज मुदत संपताच पुन्हा 10 दिवसांचा लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय प्रांताधिकार्यांच्या बैठकीत घेण्यात आला.
दहिवडी : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता दहिवडी शहरामध्ये सलग तीन दिवसांचा लॉकडाऊन पाळण्यात आला. आज मुदत संपताच पुन्हा 10 दिवसांचा लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय प्रांताधिकार्यांच्या बैठकीत घेण्यात आला.
दहिवडी शहरामध्ये कोरोनाचे संकट गडदच होत आहे. तीन दिवसांत 23 रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे ही साखळी तोडणे खूप गंभीर झाले आहे. दहिवडी येथील पंचायत समिती कार्यालयतील बचतभवनमध्ये आज पुन्हा आढावा घेण्यात आला.
यावेळी प्रांताधिकारी शैलेश सूर्यवंशी, पोलीस उपविभागीय अधिकारी डॉ. नीलेश देशमुख, नगराध्यक्ष धनाजी जाधव, सर्व नगरसेवक तसेच दहिवडी वैद्यकीय विभागाचे डॉ. हेमंत जगदाळे, व्यापारी, कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी आज जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त कोरोनाबाधित रुग्ण दहिवडी शहरात सापडत आहेत. त्यामुळे दहिवडी शहरातील नागरिकांनी याचे वेळीच गांभीर्य घ्यावे. जानेवारीपासून 105 कोरोना रुग्ण आढळले असून, 71 जण उपचार घेत आहेत. रोज हा आकडा वाढतच चालला आहे. त्यामुळे आणखी लॉकडाऊन वाढवावा, अशी मागणी होऊ लागली. त्यानंतर सर्व व्यापार्यांना विश्वासात घेऊन लॉकडाऊन आणखी 10 दिवस वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता आठवडी बाजारासह सर्व व्यवहार बंद तसेच भाजीपाला विक्रेत्यांना परवानगीनेच भाजी घरपोच द्यावी लागणार. दुकानदारांनाही किराणा घरपोच करावे, असा निर्णय घेण्यात आला आहे.
महाविद्यालये सुरू असल्याने कोरोना वाढण्याची शक्यता
दहिवडी शहर बंद असताना मात्र दहिवडी कॉलेज तसेच शाळा, महाविद्यालय सुरू असल्याने मोठ्या प्रमाणात कोरोना संसर्गाचा धोका निर्माण होऊ शकतो. याकडे देखील महाविद्यालय प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे.पोलीस प्रशासनाने लक्ष द्यावे..
जिल्ह्यातील कोरोनाच्या पहिल्या टप्प्यात सर्वात कमी रुग्ण असणार्या माण तालुक्यात आज जिल्ह्यातील सर्वात जास्ती रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे नियोजन शून्य कारभार सुरू असल्याने हा धोका वाढत आहे. दहिवडी शहर बंद असताना देखील चोरून दारू विक्री, मटका, गुटखा, मावा विक्री सुरू आहेच. याकडे देखील पोलीस प्रशासनाने लक्ष देऊन गुन्हे दाखल करण्याची मागणी होत आहे.