महिला सबलीकरणासाठी सक्षम स्त्रीवर्गाने पुढे यावे
डॉ. चित्रा दाभोलकर यांचे आवाहन : महिला दिनी महिला कॉलेजमध्ये महिला कोरोना योद्ध्यांचा सन्मान
‘महिला सबलीकरणासाठी आजही अनेक उपक्रमांची आवश्यकता असून समाजातील सक्षम आणि आत्मनिर्भर स्त्रीवर्गाने यासाठी पुढे यावे,’ असे आवाहन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉ. चित्रा दाभोलकर यांनी केले.
सातारा : ‘महिला सबलीकरणासाठी आजही अनेक उपक्रमांची आवश्यकता असून समाजातील सक्षम आणि आत्मनिर्भर स्त्रीवर्गाने यासाठी पुढे यावे,’ असे आवाहन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉ. चित्रा दाभोलकर यांनी केले.
येथील रयत शिक्षण संस्थेच्या सावित्रीबाई फुले महाविद्यालयातील महिला विकास मंच, सांस्कृतिक विभाग आणि राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून त्या बोलत होत्या.
अध्यक्षस्थानी रयत शिक्षण संस्थेचे ऑडिटर व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवलिंग मेनकुदळे होते. कला शाखेच्या उपप्राचार्य डॉ. सुनीता घार्गे, वाणिज्य शाखेचे उपप्राचार्य डॉ. तुळशीराम महानवर यांची प्रमुख उपस्थिती होती.
महाविद्यालयाच्या वतीने यंदाचा जागतिक महिला दिन ‘महिला’ कोरोना योद्ध्यांच्या सत्काराने साजरा करण्यात आला.
यावेळी सातारा जिल्ह्यातील प्रमुख हॉस्पिटल्समध्ये कोरोना काळात कर्तव्य बजावणार्या डॉ. प्रियांका पवार, डॉ. अपर्णा जगताप, डॉ. शमिका गुरव, डॉ. अर्चना त्रिपुटे, डॉ. दुर्वा नलवडे तसेच सातारा हॉस्पिटल सातारा येथील संध्या लोहार, कोमल पाटील, सरोजिनी दणाणे, अंबिका गायकवाड, सविता माने, स्नेहल शहा, शाहिन, शिकलगार, संगीता कदम आदी परिचारिकांचा सत्कार करण्यात आला.
रयत शिक्षण संस्थेतील रेखा आवळे, संगीता खटावकर, नीता कोरे, जयश्री महापुरे, चंदा चावरे आदी महिला स्वच्छतादूतांना यावेळी सन्मानित करण्यात आले. महाविद्यालयातील सर्व महिला प्राध्यापक वृंद व महिला प्रशासकीय कर्मचार्यांसह गुणवंत विद्यार्थिनींचाही यावेळी सत्कार करण्यात आला.
अध्यक्षस्थानावरून बोलताना प्राचार्य डॉ. शिवलिंग मेनकुदळे यांनी स्त्री-पुरुष समानतेसाठी आणि स्त्री सक्षमीकरणासाठी नव्याने उपायोजना करण्याची आवश्यकता असल्याचे म्हटले. विशेषतः ग्रामीण भागातील महिलावर्गाला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सर्वांगीण प्रयत्नांची गरज असल्याचेही ते म्हणाले. आधुनिक भारताच्या इतिहासात परिवर्तनवादी चळवळींनी मोठी क्रांती केली असून, याच मार्गाने समताधिष्ठित समाजाचे ध्येय आपल्याला गाठायचे आहे असेही प्राचार्य डॉ. मेनकुदळे म्हणाले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचे स्वागत कला शाखेचा उपप्राचार्य डॉ. सुनीता घार्गे यांनी केले. प्रा. मंदाकिनी वर्णेकर यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. दिलीप पवार, डॉ. अभिजीत फटे, प्रा. गजानन खामकर, प्रा. प्रवीण रणबागले यांनी तंत्रसहाय्य केले. सांस्कृतिक विभागाच्या प्रमुख प्रा. प्रतिभा घाटगे यांनी आभार मानले.