sports

आजपासून सलग तीन दिवस दहिवडी शहर बंद

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे दहिवडी नगरपंचायतीचा निर्णय

दहिवडी शहरात कोरोनाचा वाढता कहर पाहून प्रशासन खडबडून जागे झाले आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी दि. 20, 21 व 22 फेब्रुवारी रोजी संपूर्ण शहर बंद ठेवण्याचा निर्णय नगरपंचायत प्रशासनाने घेतला आहे.

दहिवडी : दहिवडी शहरात कोरोनाचा वाढता कहर पाहून प्रशासन खडबडून जागे झाले आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी दि. 20, 21 व 22 फेब्रुवारी रोजी संपूर्ण शहर बंद ठेवण्याचा निर्णय नगरपंचायत प्रशासनाने घेतला आहे.

मागील काही दिवसात शहरातील कोरोना रुग्णांचा आकडा झपाट्याने वाढला आहे. त्यातच एका कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासन तसेच तालुका प्रशासनाची तारांबळ उडाली आहे. शहरातील कोरोना रुग्णांची संख्या आजअखेर 412 इतकी झाली आहे. त्यापैकी 338 रुग्ण बरे झाले आहेत. सध्या 65 रुग्ण उपचार घेत आहेत. तर एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. नगरपंचायत प्रशासनाने पोलिसांच्या सहकार्याने वारंवार कडक भूमिका घेत नियम मोडणार्‍यांवर दंडात्मक कारवाई केली आहे. त्यामुळेच जिल्ह्यात सर्वाधिक 5, 60, 600 रुपये इतक्या रकमेचा दंड वसूल करण्यात आला आहे.

प्रशासनाने कारवाया केल्यातरी नागरिकांचा निष्काळजीपणा व नियम मोडण्याची वृत्ती कमी होताना दिसत नाही. त्याचाच दुष्परिणाम म्हणून मागील काही दिवसात शहरात मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण वाढले आहेत. 

या पार्श्‍वभूमीवर नगराध्यक्ष धनाजी जाधव यांनी आज विविध विभागांच्या बैठका घेतल्या. नगराध्यक्ष जाधव यांनी आज व्यापारी, अंगणवाडी कर्मचारी, आशा सेविका यांच्या बैठका घेतल्या. अंगणवाडी कर्मचारी व आशा सेविका यांना संपूर्ण शहराचा सर्व्हे करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच सर्व व्यापार्‍यांनी ठढझउठ चाचणी करून घेण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

या बैठकीत ठरल्यानुसार शहर येत्या शनिवार, रविवार, सोमवार हे तीन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, बाहेर पडताना मास्कचा वापर करावा व सुरक्षित अंतर ठेवावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. 
 
या बैठकीस नगराध्यक्ष धनाजी जाधव, नगरसेवक, मुख्याधिकारी अवधूत कुंभार, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण कोडलकर आदी मान्यवर उपस्थित होते.