पुसेगावमधील एक विद्यालय बनले कोरोनाचे ‘हॉटस्पॉट’
नव्याने 14 विद्यार्थी बाधित : बाधितांचा एकूण आकडा 23; काळजी घेण्याचे आवाहन
पुसेगाव येथील एका विद्यालयामध्ये कोरोनाचे आणखी 14 विद्यार्थी सापडल्याने ते विद्यालय कोरोनाचे हॉटस्पॉट बनू लागले आहे. त्यामुळे आता कोरोनाबाधित विद्यार्थ्यांची एकूण संख्या 23 झाली आहे. त्यामुळे शिक्षण व आरोग्य प्रशासनाने अधिक काळजी घेणे गरजेचे बनले आहे.
निढळ : पुसेगाव येथील एका विद्यालयामध्ये कोरोनाचे आणखी 14 विद्यार्थी सापडल्याने ते विद्यालय कोरोनाचे हॉटस्पॉट बनू लागले आहे. त्यामुळे आता कोरोनाबाधित विद्यार्थ्यांची एकूण संख्या 23 झाली आहे. त्यामुळे शिक्षण व आरोग्य प्रशासनाने अधिक काळजी घेणे गरजेचे बनले आहे.
पुसेगाव येथील विद्यालयात पुसेगावसह बुध, नेर, वेटणे पंचक्रोशीतील 739 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या शाळेत पहिला कोरोना बाधित विद्यार्थी दि. 13 फेब्रुवारी रोजी सापडला. शाळा प्रशासन व आरोग्य विभागाने तातडीने पावले उचलून सर्व विद्यार्थ्यांची कोरोना तपासणी करण्याचा निर्णय घेतला. दररोज 50 ते 55 विद्यार्थ्यांची करून तपासणी आरोग्य विभागाच्या वतीने केली जात होती.
गटविकास अधिकारी रमेश काळे यांनी कोरोना परिस्थितीची माहिती जाणून घेण्यासाठी सेवागिरी विद्यालयास भेट दिली. त्यावेळी एकूण 739 विद्यार्थ्यांपैकी 395 विद्यार्थ्यांची आरटीपीसीआर तपासणी करण्यात आली होती. त्यापैकी 9 विद्यार्थी कोरोना बाधित आढळून आले होते.
रमेश काळे यांनी मुख्याध्यापिका संध्या चौगुले यांना उर्वरित राहिलेल्या विद्यार्थ्यांची दोन दिवसांत तपासणी तातडीने करून घ्या, अशी सूचना केली. त्यानुसार शाळा प्रशासनाने उर्वरित विद्यार्थ्यांच्या पालकांना कोरोना तपासणी करण्यासंदर्भात ठोस पावले उचलली. काल आरटीपीसीआर 69 तर अँटीजन 11 असे एकूण 80 विद्यार्थ्यांची कोरोना तपासणी करण्यात आली. त्यामध्ये आरटीपीसीआर तपासणी केलेल्या 69 पैकी 14 विद्यार्थी कोरोना बाधित आढळले आहेत. त्यामुळे पालक वर्गामध्ये खळबळ उडाली आहे.
आज आरटीपीसीआर 91 तर अँटीजन 7 असे एकूण 98 विद्यार्थ्यांची कोरोना तपासणी करण्यात आली. बाधित विद्यार्थ्यांच्या हाय रिस्क कॉन्टॅक्ट मधील सर्व लोकांची आरोग्य विभागाकडून तपासणी केली जात आहे. सध्या एकूण 739 विद्यार्थ्यांपैकी आजअखेर 493 विद्यार्थ्यांची आरटीपीसीआर तपासणी करण्यात आली आहे.
उर्वरित राहिलेल्या 246 विद्यार्थ्यांची दोन तपासणी करण्याचे नियोजन आरोग्य विभागाने केले आहे. पूस सेवागिरी विद्यालयात पहिला कोरोना बाधित 13 तारखेला सापडल्या पासून शाळा बंद आहे. तरीदेखील विद्यार्थी बाधित संख्या वाढत आहे.