‘सौ चुहे खाकर..बिल्ली हज को चली’ अशी अवस्था ‘त्या’ बारा नगरसेवकांची
कुमार शिंदे यांनी पत्रकार परिषदेत विरोधी नगरसेवकांवर लगावला प्रतिटोला
नगराध्यक्षांवर भ्रष्टाचाराचे आरोप करणे म्हणजेच ‘सौ चुहे खाकर..बिल्ली हज को चली,’ अशी अवस्था ‘त्या’ बारा नगरसेवकांची झाली असून, त्यांनी स्वतः प्रथम आत्मपरीक्षण करावे नंतर नगराध्यक्षांवर भ्रष्टाचाराचे आरोप करावे, असा प्रतिटोला नगरसेवक कुमार शिंदे ऑनलाइन सभेस विरोध केलेल्या ‘त्या’ बारा नगरसेवकांना लगावला आहे.
महाबळेश्वर : नगराध्यक्षांवर भ्रष्टाचाराचे आरोप करणे म्हणजेच ‘सौ चुहे खाकर..बिल्ली हज को चली,’ अशी अवस्था ‘त्या’ बारा नगरसेवकांची झाली असून, त्यांनी स्वतः प्रथम आत्मपरीक्षण करावे नंतर नगराध्यक्षांवर भ्रष्टाचाराचे आरोप करावे, असा प्रतिटोला नगरसेवक कुमार शिंदे ऑनलाइन सभेस विरोध केलेल्या ‘त्या’ बारा नगरसेवकांना लगावला आहे. यातील काही नगरसेवकांच्या बेकायेदशीर बांधकामांची चौकशी करण्याची मागणी आपण जिल्हाधिकार्यांकडे करणार असल्याची माहिती कुमार शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना करणे व शहरातील कोरोना रुग्णांना ऑक्सिजन बेड व व्हेंटिलेटर सुविधा पुरवण्याबाबत निर्णय घेण्यासाठी पालिकेची ऑनलाइन सभा नगराध्यक्षा स्वप्नाली शिंदे यांनी आयोजित केली होती. परंतु, पालिकेतील 12 नगरसेवकांनी या सभेला विरोध करून नगराध्यक्षांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले.
या आरोपांचे खंडन करताना नगराध्यक्षांचे पती नगरसेवक कुमार शिंदे यांनी भ्रष्टाचाराचे आरोप करणार्या नगरसेवकांचा जोरदार समाचार घेतला. हे बारा नगरसेवकांच्या गटाचे प्रमुख म्हणून काम पाहत असलेले उपनगराध्यक्ष सुतार यांची निवडून येण्याची लायकी नव्हती. यापूर्वी ते तीन वेळा पडले होते; या वेळी ते आमच्याकडे आल्यामुळेच ते निवडून आले आहेत.निवडून आल्यानंतर त्यांना उपनगराध्यक्ष कोणी केले, याचा सोईस्कर विसर त्यांना पडला असेल. परंतु, जनता विसरली नाही.
उपनगराध्यक्ष अफजल सुतार, नासिर मुलाणी व रवींद्र कुंभारदरे हे आपली बेकायेदशीर बांधकामे व काळे धंदे लपवण्यासाठीच नगरसेवक होतात, असा आरोप करून कुमार शिंदे यांनी या तीनही नगरसेवकांच्या बेकायदेशीर बांधकामाची माहिती पत्रकार परिषदेत दिली. ते म्हणाले, ‘अफजल सुतार हे बिल्डर आहेत. उपनगराध्यक्ष पदाचा गैरवापर करून त्यांनी अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर विनापरवाना बांधकामे केली आहेत. स्थानिक लोकांची कामे घेऊन ती अर्धवट बांधून त्यांनी अनेकांचे संसार उद्ध्वस्त केले आहेत. शहरात 30 मीटर उंचीची मर्यादा असताना सि.स.नं 400 मध्ये पाच मजली इमारत उभी केली तसेच सि.स.नं 210 मध्ये पदाचा गैरवापर करून पाच बंगले विनापरवाना बांधले. वेण्णा नदीपात्रात वन सदृश्य मिळकतीमध्ये व हेरिटेज भागात मोठ्या प्रमाणावर विनापरवाना बांधकामे करून करोडोंची माया गोळा केली आहे तर नासिर मुलाणी यांचे वेण्णालेक परिसरात भले मोठे हॉटेल व बेकायदेशीर दोन बंगले बांधले आहेत. पन्नास लाखांच्या आलिशान गाड्या ते वापरतात. मुलांच्या लग्नात लाखो रुपयांचा खर्च केला ही माया कोठून आली याचे उत्तर नासिर मुलाणी देऊ शकतात का? याचे तर उत्तर त्यांच्याकडे नाहीच; परंतु गेली पंधरा वर्षे तुम्ही नगरसेवक आहात, या पंधरा वर्षांत मुलाणी यांनी काय केले याचे उत्तर तरी ते देतील काय, असा सवालही नगरसेवक कुमार शिंदे यांनी उपस्थित केला.
नगरसेवक रवींद्र कुंभारदरे हे देखिल बिल्डर आहेत. आपल्या पदाचा गैरवापर करून त्यांनीही या धंद्यात करोडोंची माया गोळा केली आहे. हे शहरवासीयांना माहीत आहे. यांची दोन हॉटेल आहेत. या दोन्ही ठिकाणी त्यांनी विनापरवाना बांधकामे केली आहेत. बाजारपेठेत यांचा एक मॉल आहे. या मॉलमधील वाहनतळात वाणिज्य गाळे बांधून ते विकले आहेत. सि.स.नं 210 मध्ये पाच हजार फुटांचा विनापरवाना बंगला बांधला आहे. सध्या ते ज्या ठिकाणी राहत आहेत, ती जागा अनाथाश्रमाची आहे. याही ठिकाणी वाहनतळाच्या जागेत वाणिज्य गाळे तयार करून ते विकून लोकांची फसवणूक केली आहे. याबाबत आपण जिल्हाधिकार्यांकडे रितसर अर्ज करून या सर्वांच्या चौकशीची मागणी करणार असल्याचेही कुमार शिंदे यांनी सांगितले. आमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत तेव्हा कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्यास आम्ही तयार आहोत, असे देखील नगरसेवक कुमार शिंदे यांनी सांगितले.