sports

टाकेवाडी ग्रामपंचायतीवर ‘राष्ट्रीय काँग्रेस’चा झेंडा

सरपंचपदी नीलेश दडस तर उपसरपंचपदी सीमा ताटे यांची निवड

टाकेवाडी (ता. माण) येथील ग्रामपंचायतीच्या सरपंच व उपसरंपचपदाच्या निवडीवर अनपेक्षितपणे राष्ट्रीय युवक काँग्रेसचे प्रदेश चिटणीस दादासो काळे यांनी बाजी मारली. त्यांचे खंदे समर्थक नीलेश अंकुश दडस यांची सरपंचपदी तर सीमा शिवाजी ताटे यांची उपसरपंचपदी निवड करण्यात आली असून, ग्रामपंचायतीवर राष्ट्रीय काँग्रेसचा झेंडा रोवण्याचे काम दादासो काळेंनी करून दाखवले.

बिजवडी : टाकेवाडी (ता. माण) येथील ग्रामपंचायतीच्या सरपंच व उपसरंपचपदाच्या निवडीवर अनपेक्षितपणे राष्ट्रीय युवक काँग्रेसचे प्रदेश चिटणीस दादासो काळे यांनी बाजी मारली. त्यांचे खंदे समर्थक नीलेश अंकुश दडस यांची सरपंचपदी तर सीमा शिवाजी ताटे यांची उपसरपंचपदी निवड करण्यात आली असून, ग्रामपंचायतीवर राष्ट्रीय काँग्रेसचा झेंडा रोवण्याचे काम दादासो काळेंनी करून दाखवले.

टाकेवाडी (ता. माण) ही ग्रामपंचायत आंधळी जि. प. गटातील महत्त्वाची ग्रामपंचायत. आजपर्यंत याठिकाणी आ. जयकुमार गोरे यांचे एकहाती वर्चस्व होते. मात्र, यावेळी ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करून ग्रामस्थांनी एक आदर्श घालून दिला होता. 

या ग्रामपंचायतीवर आ. गोरे दावा करत होते. मात्र, दादासो काळेंनी या ग्रामपंचायतीवर वर्चस्व दाखवल्याने ही महत्त्वाची ग्रामपंचायत आ. गोरेंच्या ताब्यातून गेल्याचे दिसून येते. दादासो काळे यांनी आंधळी गटाचे अनेकदा नेतृत्व केले आहे. आमदारांचे कट्टर समर्थक म्हणून दादासो काळे यांची ओळख होती. मात्र, आमदारांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर दादासो काळे त्यांच्यासोबत गेले नाहीत. त्यांनी निष्ठावंताची भूमिका घेत काँग्रेसमध्येच राहणे पसंत केले.

युवकांच्या माध्यमातून काँग्रेसला गतवैभव मिळवून देण्यासाठी त्यांचे प्रयत्न टाकेवाडीच्या निवडीवरून दिसून आले. 
या ग्रामपंचायतीच्या सदस्यपदी दादा दडस, महावीर शिंदे, रूपाली दडस, शशाबाई दडस, सतीश सस्ते, रेखा दडस, विद्या घोरपडे हे सदस्य निवडून आले आहेत.

नूतन सरपंच नीलेश दडस, उपसरपंच सीमा ताटे यांचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज मोरे, जि. प. सदस्य निवास थोरात, युवक काँग्रेसचे दादासाहेब काळे, जिल्हा उपाध्यक्ष एम. के. भोसले, युवकचे जिल्हाध्यक्ष विराज शिंदे, महिला अध्यक्ष नकुसा जाधव तसेच जिल्हा व तालुका पातळीवरील सर्व पदाधिकार्‍यांनी, कार्यकर्त्यांनी व ग्रामस्थांनी अभिनंदन केले.


दादासो काळे तालुकाध्यक्ष पदाचे प्रबळ दावेदार....
माण तालुक्यात काँग्रेसची अवस्था दयनीय असताना पक्षाची पुर्नबांधणी करत गतवैभव मिळवून देण्यासाठी दादासो काळेंसारखे निष्ठावंत नेतेमंडळी प्रयत्न करत आहेत.अशा पडत्या काळात काँग्रेसला एकाही ग्रामपंचायतीवर आपले एकहाती वर्चस्व दाखवता येत नव्हते. मात्र, ही किमया युवक काँग्रेसचे दादासो काळे यांनी करून दाखवली आहे. माण तालुक्याचे त्यांच्याकडे नेतृत्व दिल्यास ते निश्‍चितच तालुक्यात कॉँग्रेसची ताकद वाढवत पक्षाला गतवैभव प्राप्त करून देतील, असेही कार्यकर्त्यांतून बोलले जात आहे.