sports

सततच्या पावसाने नुकसान झालेल्या पिकांची भरपाई मिळावी

कृषी सभापती मंगेश धुमाळ यांची मागणी

कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागात गेल्या काही दिवसांपासून पडणार्‍या संततधार पावसामुळे शेतातील पिकात पाणी साचून घेवडा, वाटाणा, बटाटा यांसह आणखी काही पिकांचे मोठे नुकसान झाले असल्याने प्रशासकीय यंत्रणेने संबंधित शेतकर्‍यांना त्वरित नुकसान भरपाई मिळविण्याबाबत कार्यवाही करण्याची मागणी जिल्हा परिषद कृषी सभापती मंगेश धुमाळ यांनी केली आहे.

पिंपोडे बुद्रुक : कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागात गेल्या काही दिवसांपासून पडणार्‍या संततधार पावसामुळे शेतातील पिकात पाणी साचून घेवडा, वाटाणा, बटाटा यांसह आणखी काही पिकांचे मोठे नुकसान झाले असल्याने प्रशासकीय यंत्रणेने संबंधित शेतकर्‍यांना त्वरित नुकसान भरपाई मिळविण्याबाबत कार्यवाही करण्याची मागणी जिल्हा परिषद कृषी सभापती मंगेश धुमाळ यांनी केली आहे.
कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागात गेल्या काही दिवसांपासून परिसरासह जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला आहे. जोरदार पावसामुळे शेतात बहुतांशी ठिकाणी पाणी साचून राहिले आहे. त्याचा फटका पिकांना बसला आहे. सद्य:स्थितीत खरीप हंगामातील महत्त्वाचे पीक समजले जाणारा घेवडा (राजमा) परिपक्व होण्याच्या अवस्थेत तर वाटाणा काढणीच्या अवस्थेत आहे. परंतु, शेतात पाणी साचून राहिल्याने घेवडा, वाटाणा तसेच सोयाबीन पिकांच्या शेंगा कुजल्या आहेत तर काही ठिकाणी कुजण्याच्या स्थितीत आहेत. यामुळे शेतकर्‍यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, कोरोना महामारीच्या पार्श्‍वभूमीवर सर्वच स्तरावरील आणीबाणीला तोंड देणार्‍या बळीराजासमोर या अस्मानी संकटाने आव्हान निर्माण केले आहे. याची दखल घेत सातारा जिल्हा परिषद कृषी सभापती मंगेश धुमाळ यांनी नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना त्वरित नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी राज्य कृषी विभाग व जिल्हाधिकार्‍यांकडे केली आहे. त्याअनुषंगाने जिल्हा परिषद कृषी समितीने ठरावही केला आहे.
दरम्यान, कोविड 19 विषाणू संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर लागू केलेल्या निर्बंधामुळे शेतीचे पर्यायाने शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे.अशा परिस्थितीत देखील बळीराजा जगण्याचा संघर्ष करत असताना जास्तीच्या पावसाने शेतकरी वर्गाला मोठा फटका बसला आहे. याचा विचार करून शेतकर्‍यांना अतिवृष्टी काळात होणार्‍या नुकसानाची भरपाई मिळवण्यासाठी लावले जाणारे निकष बाजूला ठेवून प्रशासनाने त्वरित सकारात्मक कार्यवाही करावी, अशी मागणी जिल्हा परिषद कृषी सभापती मंगेश धुमाळ यांनी केली आहे.